नवीन लेखन...

वैद्यकीय ‘मेवा’ !

डॉक्टरांना देव मानण्याचा आपल्या समाजात प्रघात आहे.. प्रचंड विश्वास आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव यामुळे हि उपाधी डॉक्टरांना मिळाली. असं म्हटलं जातं, देवानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो म्हणजे डॉक्टरांचा..कारण, देव आपल्या प्राणाचं रक्षण करतो, हि जशी श्रद्धा आहे. तसाच डॉक्टर आपले प्राण वाचवू शकतो हा विश्वास समाजाचा आहे. त्याचमुळे डॉक्टरांना समाजात सन्मानाचे स्थान दिल्या जाते..त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो. मात्र अलीकडच्या काळात या पवित्र क्षेत्रातही काही अपप्रवृत्तीनी शिरकाव केला आहे. वैद्यकीय क्षेत्र ‘सेवा’ करण्यासाठी नाही तर ‘मेवा’ खाण्यासाठी असल्याच्या समज असणारे काही लोक या क्षेत्रात आले, आणि वैद्यकीय सेवेचा व्यवसाय केंव्हा बनला, व व्यवसायाचा धंदा केंव्हा झाला, हे कुणालाच कळले नाही. नीतिमत्तेचे सर्व संकेत गुंढाळून रुग्नाचा खिसा कापण्याचे उद्द्योग या क्षेत्रात इमाने-इतबारे सुरु झाले. रुग्नाची लुबाडणूकच नाही तर सामाजिक संकेत पायंदळी तुडवून अवैध गर्भपातासारखे कृत्य करण्यासही मग हि मंडळी मागे राहिली नाही. रुग्नांच्या सुविधेसाठी आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग पैसा कमविण्यासाठी केल्या जाऊ लागला.लिंगचाचणी स्त्री भ्रूणहत्या सारखे प्रकार समोर येऊ लागले. त्यामुळे कायद्यानेही या क्षेत्राकडे आपले डोळे वटारले. वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी विविध नियम कायदे बनविल्या गेले. मात्र मेव्याच्या लोभापुढे कायदेही खुजे पडत असल्याचे दिसत आहे. लोणार येथील अवैध गर्भपाताची घटना, तद्वातच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे उघडकीस आलेलं बेकायदेशीर गर्भपात केंद्र, या घटना वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

भ्रूणहत्या,अवैध गर्भपाताच्या समश्येचं एक आव्हानच आज समाजासमोर उभे राहिले आहे. गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा आणि सुरक्षित गर्भपात कायदा येऊन वीस वर्षांहून अधिक काळ गेला. मात्र त्याचा गैरवापर अजूनही थांबलेला नाही, हे वास्तव आहे. आठ दिवसापूर्वी लोणार तालुक्यात अवैध गर्भपातादरम्यान एका १५ वर्षीय मुलीचा मृत्य झाल्याची घटना समोर आली. या बातमीची शाली वाळते ना वाळते तोच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे बेकायदेशीर गर्भापात केंद्र सूर असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. जिल्हा श्यल्य चिक्तिस्तकांनी या दवाखान्यावर छापा टाकला असता याठिकाणी राजरोसपणे गर्भापात केले जात असल्याचे समोर आले. गर्भपातासाठी लागणारे साहित्य, औषधें, किट असे भले मोठे साहित्य या कारवाईत जप्त करण्यात आले आहे. गर्भ अथवा भ्रूण अस्तित्वातच सजीव अवस्थेत येतो, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे..गर्भ पूर्णत्वास येऊन सजीव म्हणून जन्माला येण्याच्या प्रक्रियेवर प्रहार करण्याची क्रिया म्हणजे एकप्रकारे त्या सजीवाची हत्याच म्हटली पाहिजे. अपवाद वगळल्यास प्रत्येक गर्भाला जन्माला येण्याची संधी देणेच कायद्याला अभिप्रेत आहे. त्यासाठीच गर्भपात कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. गर्भपात करायचा असेल तर त्यासाठी काही नियम कायद्याने घालून दिले आहेत.. त्यानुसार गर्भपात करता येतो. मात्र तरीही लोक अवैध गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांकडे जातात आणि डॉक्टर गर्भपात करतात. यासाठी जेवढा दोष डॉक्टरांना दिला जातो, तितकाच दोष त्यांच्याकडे जाणाऱ्यानाही दिला गेला पाहिजे.

कुठल्याही अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा पुरेसा नसतो तर त्याला समाजाचा धाकही आवश्यक असतो. लिंगनिदान, स्त्री भ्रूण हत्या आणि गर्भपात सारख्या सामाजिक समश्याना प्रतिबंध घालण्यासाठी समाजालाच पुढाकार घ्यावा लागेल. मानसिकतेत बदल झाल्याशिवाय या समश्या संपणार नाहीत. त्यासाठी व्यापक मोहीम उघडण्याची गरज आहे. अर्थात, याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागरन केल्या गेले, आजही केल्या जात आहे. मात्र अपेक्षित यश अजून दृष्टीक्षेपात आलेलं नाही. मध्यंतरी जिल्ह्यात ‘लेक माझी’ नावाने मोठी मोहीम उभारली गेली होती. समाजसेवी डॉक्टर, सामाजिक कार्यकतें यांच्या या टीमने अनेक अवैध सोनोग्राफी केंद्राचा परदाफाश केला. परंतु कालांतराने ‘लेक माझी’ चळवळ ही थंडावली. शासनाच्याही विविध मोहिमा निघाल्या, पण त्यांचाही अपेक्षित परिणाम समोर आला नाही.  एखादी अशी घटना समोर आली कि दोन दिवस त्यावर चर्चा होते. तपासण्या कारवाईच्या एक दोन मोहिमा पार पडतात. आणि पुन्हा काहीजण आपला गोरखधंदा सुरु करतात, हे उघड गुपित आहे. रोहिणखेडच्या घटनेनंतर बेकायदेशीर गर्भपाताच्या माहिती देणाऱ्यास दिल्या जाणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत तीन पटीने वाढ करत ही रक्कम एक लाख करण्यात आली आहे. निश्चितच यामुळे अजून काही अशी बेकायदेशीर केंद्रे उघड होण्यास मदत होईल. परंतु समश्या संपणार नाही.

‘तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाही वाद आपणासी’ या वचनातून तुकाराम महाराजांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला आज समाजाने तद्वातच डॉक्टर मंडळींनी आत्मसात करण्याची गरज आहे. आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहोत का ? याचा शोध घेतलेला तर उत्तर सहजपणे सापडू शकेल. अर्थात, संपूर्ण समाजाचं भ्रष्ट होत चालला असताना, आम्ही एकट्यानेच सोवळे का राहायचे, असा सवाल काही डॉक्टर मंडळी उपस्थति करतीलही, पण अशानी वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य लाखात घेतले पाहिजे. डॉक्टर होतेवेळी घेतलेल्या शपथेचेही समरण केलं तर पुरेसं ठरेल. ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद अंगीकारून, व्यवसाय नव्हे तर एक मिशन म्हणून काम करणाऱ्या ध्येयनिष्ठ डॉक्टरांची संख्या आजही कमी नाही. त्यामुळे समाज आजही डॉटरांना देवच मानतो. पण अशा काही अपप्रवृत्तीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राकडे बोट दाखविल्या जाते, हे दुर्दैव.. त्याचमुळे वैद्यकीय ‘सेवा’ करणाऱ्या डॉक्टरांनी मेव्याची अभिलाषा ठेवणाऱयांचा प्रतिबंध घालण्यासाठी येणाऱ्या काळात पुढाकार घेण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आता या क्षेत्रातील डॉक्टरांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे..!!

अँड.हरिदास उंबरकर

बुलडाणा

9763469184

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..