नवीन लेखन...

वीरचक्र विभूषित योद्धा सुभेदार रतन सिंग

सुभेदार रतन सिंग १० ऑगस्ट, २०१६ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळाने मरण पावले. आमच्या प्रसारमाध्यमांनी बारीकशी बातमी दिली. साहजिकच आहे. वाचकांच्या मनात थोडीदेखील राष्ट्रीय भावना निर्माण होता कामा नये, असंच आपल्या माध्यमांचं अलिखित धोरण आहे. विविध प्रकारच्या राजकीय, सामाजिक खर्याा-खोट्या ‘कॉन्ट्रोव्हर्सीज’ उभ्या करायच्या आणि लोकांचं चित्र त्यात गुंतवून ठेवायचं; ‘नॉन-इश्यूज’ ना ‘इश्यूज’ बनवायचं आणि खर्याय ‘इश्यूज’ पासून जनतेचं लक्ष दूर न्यायचं, हे खरं अलिखित धोरण आहे.

तेव्हा, सुभेदार रतन सिंग कोण, हे तपशीलावर सांगितलं, तर लोकांच्या मनात पराक्रमाची भावना निर्माण होईल ना! त्यांचे बाहू फुरफुरू लागतील, मनगटं शिवशिवू लागतील. छे:! छे:! असं होता कामा नये. कारण भारतच जर राष्ट्रीय एकरस भावाने सरसावून उभा ठाकला, तर अ-राष्ट्रीय लोकांनी कुठे बरं जावे? त्यांना आणि त्यांच्या फुटीर तत्त्वज्ञानाला जगात कुठेही थारा नाही.

सुभेदार रतन सिंग हे १९७१च्या भारत-पाक युद्धातले वीरचक्र विभूषित योद्धा होते. भारताकडे १२० सैनिक आणि पाकिस्तानकडे दोन हजार सैनिक अशा स्थितीत ३ डिसेंबर, १९७१च्या मध्यरात्री लोंगेवाला इथे भीषण रणकंदन झालं. सुभेदार रतन सिंग त्या लढाईतले एक शिलेदार होते. लोंगेवालाची ही लढाई सामरिक डावपेचांच्या दृष्टीने इतकी महत्त्वाची होती की, ब्रिटनच्या इम्पिरियल जनरल स्टाफच्या प्रमुख सेनापती फील्डमार्शल कार्व्हर हा लंडनहून धावत आला. तो मुद्दाम लोंगेवालाच्या रणक्षेत्रावर गेला आणि मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांच्याकडून त्याने प्रत्यक्ष सगळी माहिती करून घेतली. जेम्स हॅटर या ब्रिटिश लष्करी तज्ज्ञ लेखकाने तर लोंगेवालाच्या लढाईला थर्मोपिलीच्या लढाईची उपमा दिली. इराणचा सम्राट झर्सेस याने ग्रीसवर प्रचंड सैन्यानिशी आक्रमण केलं, तेव्हा अथेन्स या ग्रीक गणराज्याचा सेनापती लिओनिडासने थर्मोपिली या खिंडीत त्या सैन्याला अडवलं. कमालीचं शौर्य गाजवून अखेर लिओनिडास आणि त्याचं छोटं पथक पूर्णपणे ठार झालं. तेव्हापासून युरोपच्या इतिहासात थर्मोपिलीची लढाई चिरस्मरणीय झालेली आहे.

अनेक युरोपीय लेखक पावनखिंडीच्या लढाईलाही थर्मोपिलीची उपमा देतात. पण पावनखिंड, लोंगेवाला आणि थर्मोपिली यांच्यात एक फारच महत्त्वाचा फरक आहे. पावनखिंडीत बाजीप्रभू पडले, पण शिवराय सुरक्षित विशालगडावर पोहोचले. थर्मोपिलीत लिओनिडास पडल्यावर झर्सेस अथेन्सवर तुटून पडला आणि त्याने ते पार उद्ध्वस्त केलं. लोंगेवालामध्ये तर भारतीय सैनिकांनी कमालच केली. भारताचे फक्त दोन सैनिक आणि पाच उंट ठार झाले व एक रणगाडाविरोधक तोफ निकामी झाली, तर पाकिस्तानचे २०० सैनिक ठार, ३४ रणगाडे उद्ध्वस्त झाले आणि ५०० चिलखती गाड्या निकामी झाल्या. शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करतानाच स्वत:चं कमीत कमी नुकसान होऊ देतो, तो खरा उत्कृष्ट सेनापती, हे युद्धशास्त्रातलं सूत्र मेजर कुलदीपसिंग चांदपुरी यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवलं. सुभेदार रतन सिंग हे या लढाईत जीपवर बसवलेली १०६ मि.मि. रिकॉईललेस गन म्हणजे एक विशिष्ट प्रकारची रणगाडा व चिलखती वाहनविरोधी तोफ चालवणारे गनर होते. या तोफेने त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांीनी पाकिस्तानचे चिनी बनावटीचे बारा टी-५९ रणगाडे उडवले.

लोंगेवाला या नावामुळे अनेकांना कदाचित पंजाबच्या खलिस्तानवादी आंदोलनातले एक नेते संत हरचरण सिंह लोंगोवाल यांची आठवण झाली असेल. त्यांचा इथे काही संबंध नाही. हे लोंगेवाला गाव भारत-पाक सीमेवर राजस्थानात आहे.

१९७१चं युद्ध हे मुख्यतः पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांगलादेशाच्या मुक्ततेसाठी झालं. जनरल जगजितसिंग अरोरा आणि जनरल जेकब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेना अतिशय वेगाने राजधानी ढाक्याच्या दिशेने निघाला होत्या. पूर्व आघाडीवरचा दबाव कमी करण्यासाठी पश्चिम आघाडी उघडण्याचा निर्णय पाकिस्तानी सेनाश्रेष्ठींनी घेतला. त्यासाठी काश्मीर किंवा पंजाब सीमेवरील त्यांनी राजस्थानची निवड केली.

p-32257-1राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातल्या लोंगेवाला या गावातून धडक मारीत रामगड गाठायचं आणि चकित झालेलं भारतीय सैन्य सावरेपर्यंत आणखी पूर्वेला घुसून सरळ जैसलमेर गाठायचं, असा पाकिस्तानी पायदळाचा बेत होता.

हा सगळा भाग राजस्थानच्या प्रसिद्ध थर वाळवंटाचा आहे. भारताच्या पंजाब रेजिमेंटची २३ वी बटालियन लोंगेवालाच्या १७ किमी अलिकडे साधेवाला इथे तैनात होती आणि या बटालियनमधली फक्त एक कंपनी लोंगेवालामधल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर उपस्थित होती. रेजिमेंट म्हणजे सुमारे अडीच हजार सैनिक. बटालियन म्हणजे नऊशे ते एक हजार सैनिक आणि कंपनी म्हणजे १२० ते २५० सैनिक लोंगेवाला चौकीवर. १२० भारतीय सैनिक आणि त्यांचे सेनापती मेजर कुलदीपसिंग चांदपुरी येथे होते.

३ डिसेंबर, १९७१च्या रात्री लोंगेवाला चौकीच्याही पुढे वाळंवटातल्या अगदी सरहद्दीवर गस्त घालणार्याि लेफ्टनंट धर्मवीर आणि त्याच्या २० लोकांच्या तुकडीला पाकिस्तानी हद्दीतून खूप गडबड ऐकू येऊ लागली. पायदळ, रणगाडे आणि चिलखती वाहनं फार मोठ्या संख्येने सरहद्दीकडे चालून येतं असल्याचा तो आवाज होता. दाट अंधारात दिसत मात्र काहीच नव्हतं. लेफ्टनंट धर्मवीरने ताबडतोब मेजर कुलदीपसिंगना संपर्क केला. त्यांनी अर्थातच आपल्या वरिष्ठांशी संपर्क केला. बटालियन हेडक्वार्टरने तातडीने एकंदर स्थितीचा आढावा घेतला. हेडक्वार्टरमधून ताबडतोब पायदळ किंवा चिलखती गाड्या पाठवणं शक्य नव्हतं. मग पर्याय वायुदलाचा. पण वायुदलाकडे रात्रीच्या अंधारात शत्रूला टिपण्याची विशेष यंत्रणा नव्हती. त्यामुळे वरिष्ठांनी मेजर कुलदीपसिंगना दोन पर्याय सुचवले. एक म्हणजे सरळ माघार घेऊन रामगड गाठायचं किंवा दुसरं म्हणजे लोंगेवाल चौकी रात्रभर लढवायची. वायुदल फक्त सूर्योदयाची वाट पाहतंय. सूर्याचा पहिला किरण थरच्या वाळवंटावर ज्या क्षणी पडेल, त्या क्षणी वायुदलाची हॉकर हंटर आणि मरूत ही विमानं पाकिस्तानी रणगाडा दलाचं पारिपत्य करायला तिथे पोहोचलेली असतील. तोपर्यंत चौकी लढवायची की, आताच जपून सांभाळून माघार घ्यायची, हे तुम्ही ठरवा.

मेजर कुलदीपसिंगनी पर्याय निवडला युद्धाचा! पंजाबी सैनिकांच्या भाषेत सांगायचं, तर हे पाकिस्तानी म्हणजे ‘लाहौर दा नाली ने गंदे कीडे’! यांच्यासमोर माघार घ्यायची? छे: छे:! कधीच नाही!! कधीच नाही!! मेजरने लोंगेवाल चौकीचा उत्तम बंदोबस्त केला आणि संपूर्ण कंपनी पूर्णपणे सज्ज होऊन पाकिस्तानी आक्रमणाची वाट पाहात राहिली.

p-32257-2रात्री ठीक १२.३० ला पाकिस्तानी आक्रमण सुरू झालं. ६५ रणगाडे लोंगेवाला चौकीच्या रोखाने निघाले. ते मार्या०च्या टप्प्यात येताक्षणी सुभेदार रतन सिंगांची रिकॉइललेस गन आग ओकू लागली. दोन्ही बाजूंनी जबर भडिमार सुरू झाला. थोड्या अवधीतच पाकचे बारा रणगाडे पेटले. लोंगेवाला-रामगड- जैसलमेर एवढा पल्ला गाठायचा म्हणून या रणगाडा दलाने डिझेल-पेट्रोलचे जादा डबे घेतले होते, ते धडाकून पेटले. त्या प्रकाशात भारतीय गनर्सना इतर चिलखती वाहने दिसू लागली. मग ती टिपण्याची स्पर्धाच लागली जणू. पाक लष्कराला एवढा कडवा प्रतिकार अपेक्षित नव्हता. त्यांची चाल थबकली. पाक सेनापतीने लोंगेवाला चौकीला वेढा घालण्याचा हुकूमदिला आणि हा फार मोठा मूर्खपणा ठरला. थरचं वाळवंट म्हणजे अरबस्तानचं वाळवंट नव्हे. इथली वाळू चिकट आहे. वेढा घालण्यासाठी चारी बाजूंना पसरलेले पाक रणगाडे वाळूत फसले. रणगाडा चालकांचे लक्ष लढाईपेक्षा आपलं वाहन वाळूतून सोडवण्याकडेच लागलं आणि समोरून भारतीय सैनिकांच्या मशिनगन्स कडकडतच होत्या.

या सगळ्या धुमश्चक्रीत सूर्योदय झाला आणि खरोखरच सूर्याच्या पहिल्या किरणांबरोबरच भारतीय वायुदलाची मरुत आणि हॉकर हंटर्स पाकिस्तानी रणगाड्यांवर तुटून पडली. काकड्या कापाव्यात तसे पाहता-पाहता ३४ रणगाडे आणि ५०० चिलखती गाड्या उद्ध्वस्त झाल्या. पाकिस्तानला जबर पराभव आणि त्याहीपेक्षा मोठी नामुष्की पत्करून मागे हटावं लागलं. भारतीय सैन्याच्या या भीमपराक्रमाने जगभरचे लष्करी तज्ज्ञ थक्क झाले. सुभेदार रतन सिंग त्या लढाईतले एक वीर होते

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..