नवीन लेखन...

रसास्वाद : ‘आर्यमा’ काव्यसंग्रहाचा

‘आर्यमा’ हा, श्रीमती चंद्रलेखा बेलसरे यांच्या कवितांचा संग्रह आहे. तो वाचल्यानंतर, त्यावर, एक रसिक वाचक म्हणून, कांहीं लिहावें, असा विचार केल्यामुळे, हा लेख. अर्थात्, त्या अनुषंगानें मनांत आलेल्या कांहीं गोष्टींचाही येथें ऊहापोह केलेला आहे . (सहज, जातां जातां म्हणून सांगतो, चंद्रलेखा बेलसरे या, ‘साहित्य चपराक’ मासिकाच्या उपसंपादक आहेत). प्रस्तुतचा मजकूर म्हणजे स्व-संवादच आहे म्हणा ना ! फक्त, त्यात तुम्हालाही प्रत्याप्रत्यक्षरीतीनें सामील करून घेतलेलें आहे, एवढेंच.

• हातीं आल्यानंतर ‘आर्यमा’ वाचून पूर्ण करायला वेळ लागला. त्याचें कारण मुख्यत: असे आहे की, काव्यसंग्रहाचें पुस्तक, कादंबरीप्रमाणें एका बैठकीत वाचायची गोष्ट नाहीं. ज्याप्रमाणें पंच-रसयुक्त भोजन चव घेत घेत, आनंद घेत घेत, आस्वादायचें असतें, त्याचप्रमाणें काव्यसंग्रह हळूहळू वाचायचा असतो, प्रत्येक कवितेचा समरसून आस्वाद घ्यायचा असतो, ती ऍब्झॉर्ब करायची असते, मनांत मुरवायची असते, असें माझें मत आहे; आणि अर्थातच, वाचतांना व वाचल्यावर, कवितांवर मनन-चिंतन हेंही आपोआपच होत जातें, व त्यालाही वेळ दिला जातो. त्यामुळे, मी रसास्वाद घेत घेत, मन:पूर्वक, समरसून, (हिंदीत म्हणतात तसें, ‘जम के’), काव्यसंग्रह वाचला. प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस (नुकत्याच, जानेवारी २०१६ मध्ये, पिंपरी-चिंचवड येथें पार पडलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) यांची प्रस्तावनाही मनन करत वाचली. प्रस्तावना ही मुख्य-पुस्तकाइतकीच महत्वाची असते, असे मला वाटतें.

• प्रा. सबनीस यांनी विस्तृत व खुलासेवार डीटेल्ड समीक्षा व रसग्रहण केलेलें आहे. त्यामुळे, मी वेगळें काय लिहिणार ? त्यातून, मी फक्त एक रसिक वाचक आहे, प्रोफेशनल-साहित्यिक नव्हे, विचारवंत नव्हे, समीक्षक तर नव्हेच. म्हणून मी, फक्त, काव्यसंग्रह वाचून, माझें त्याबद्दलचें ऍप्रिसिएशन, व त्या अनुषंगानें मनात आलेले काही विचार, एवढेंच लिहीत आहे. तसेंच, प्रा. सबनीस यांच्या स्टेटमेंटस् बद्दल संपूर्ण आदर व्यक्त करून, व त्यांची आधीच, इन ऍडव्हान्स, क्षमा मागून, मी एवढेंच म्हणतो की, कांहीं ठिकाणी माझ्या मनात काहीं भिन्न विचार आले; ते मी मांडत आहे. (त्यांच्या स्टेटमेंटस् वा विचारांचा अनादर करण्याचा कोठेही हेतू नाहीं, हें आवर्जून नमूद करणे मला आवश्यक वाटतें.)

• संग्रहाचें शीर्षक व मुखपृष्ठ या विषयाची चर्चा मी अखेरीस करणार आहे. काव्य वाचून मगच संग्रहाच्या शीर्षकाचा ऊहापोह करावा, हेंच मला उचित वाटतें. आधी, काव्यावरील विचार.

• कवयित्रीचें, एक स्त्री म्हणून, काव्यरूप प्रगटीकरण : एक माणूस म्हणून स्त्री व पुरुष हे दोघे ज़री समान आहेत, तरी जीवनात त्या दोघांना वेगवेगळ्या तर्‍हेचे अनुभव येत असतात. ‘परकायाप्रवेश’ घेऊन कवी लिहूं शकत असला, किंवा लिहायचा प्रयत्न करू शकत असला, ( ‘जो न देखे रवि । सो देखे कवि ।’ ) , तरी, फक्त एक स्त्रीच, स्वत:चें ‘स्त्री’ म्हणून असलेले अनुभव, किंवा विचार, इफेक्टिव्हली, परिणामकाररीत्या मांडू शकते, अन् तें तेवढ्याच परिणामकारकरीत्या, तेवढ्याच ताकदीने, करणें पुरुषाला फार-फार कठीण आहे, (व, vice versa), असे मला वाटतें. ‘यमाशी दोन हात करून पतीचे प्राण वाचवणारी सावित्री ही फक्त स्त्रीच असू शकते’ असे शब्द कॉन्फिडेन्टली, आत्मविश्वासपूर्वक, फक्त एक स्त्रीच लिहू शकते, कारण तिचा ‘स्त्री’ असण्याचा ‘इन-बॉर्न’ अनुभव. पुरुषाला असे शब्द सुचतील की नाहीं, मी साशंक आहे, आणि त्यानें ‘परकायाप्रवेश’ केला तरी त्याच्या स्त्री-भूमिकेतून लिहिलेल्या कवितांना तेवढी डेफ्थ व नॅच्युरलनेस, तेवढीच खोली व नैसर्गिकता, येईल कां, हा प्रश्नच आहे. ‘अरे संसार संसार। जसा तवा चुल्ह्यावर। आधी हाताला चटके। तवा मिळते भाकर’ असे परिणामकारक वर्णनाचे, ऍप्ट (apt, अगदी चपखल) अशा उपमा दिलेले शब्द फक्त एक स्त्री बहिणाबाईच लिहू शकतात, पुरुष नव्हे. महादेवी वर्मा ‘बीन भी हूँ मैं तुम्हारी रागिनी भी हूँ’ असें अगदी सहजपणें लिहून जातात. ‘परकायाप्रवेश’ करूनही एखादा पुरुष स्त्री-भूमिकेतून इतक्या सहजपणें असें लिहूं शकेल काय, मला शंका वाटते.

एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून, तर, बेलसरे बाईंनी कविता लिहिलेल्या आहेतच. त्या सामाजिक विषयांवरील आहेत, निसर्गावर आहेत; जीवनावर; यश-अपयश याच्याविषयीच्या ऍटिट्युडवर, जीवनातील-दृष्टिकोनावर आहेत; आणि एक कवि म्हणूनही, कवित्वाबद्दल व कवितेबद्दल आहेत . (‘कवी भाव भावनांचा राजा’, व ‘अंतर्मनातील अनुभूतीचा आविष्कार असते कविता’ , या ओळी मला भावल्या). पण मला विशेष उल्लेख करायचा आहे तो, एक स्त्री म्हणून कवयित्रीने लिहिलेल्या कवितांचा. त्या नारीची विविध रूपें दाखवतात, जसे, माहेराबद्दलच्या, आईपणाबद्दलच्या , सासू-सून या नात्याबद्दलच्या ; व अर्थातच, ‘per se नारीत्वा’शी संबंधित कविता ; आणि त्यातही काहीं तरल, तर काही समाजभान असलेल्या, तर काहीं विद्रोहात्मक किंवा मनातील ‘आक्रोशा’ला शब्दरूप देणार्‍या अशा. त्या कविता, माझ्यासारख्या एका पुरुषाला, एक नवीन पर्सपेक्टिव्ह, एक नवीन दृष्टी देतात ; नवीन विचारांशी परिचयही होतो. उदाहरणेंच द्यायची झाली, तर, ‘ती’, ‘लढाई’, अग्निपरीक्षा’, ‘आरक्षण’ वगैरे.

• संग्रहातील काहीं कविता गद्याकडे जास्त झुकलेल्या आहेत कां ? –
आजच्या एकूण मराठी कवितेतच, ‘फ्री-व्हर्स’ (Free-Verse) म्हणजे मुक्तकाव्याचा ट्रेंड आहे, लयबद्ध काव्यापेक्षाही खूपच अधिक ; अनलाइक उदा. उर्दू , जिच्यात गज़ल व नज़्म या दोहोंनाही महत्व आहे. मला स्वत:ला ग़ज़लसारखें लयबद्ध काव्य – वाचायला व लिहायला – जास्त आवडत असले, तरीही, माझें मत आहे की, आपल्याला जें मांडायचें आहे, त्यासाठी मुक्तकाव्य हा फॉर्म जास्त उपयुक्त होईल, असे जर कोणाला कधी वाटलें, तर त्याचा वापर करायला हरकत नाहींच. (मी स्वत: असेंच करतो.)

मुक्तकाव्य हा गद्याकडे झुकणाराच काव्यप्रकार आहे, कधी थोडा कमी, कधी थोडा अधिक. त्यानें तसा फरक पडत नाहीं, असे मला वाटतें. काव्यासारखे गद्य-लेख लिहिले, तर ते ‘गद्यकाव्य’ म्हटले जातात.
(किंवा, डॉ. राम पंडित यांच्या संज्ञेप्रमाणें, ‘काव्यात्मक गदय’). डॉ. श्रीधर रंगनाथ कुलकर्णी सांगतात की, एकनाथांची भारुडें ‘लयबद्ध गद्या’त आहेत (मात्र, ती पद्यबद्ध आहेत अशीच साधारणतया समजूत असते).

असें पद्यमय गद्य लेखन जर ऍप्रिशिएट केले जातें, आवडतें ; तर मग, काव्यात, टोकदार भावना काँपॅक्टपणें मांडत असतांना, तें गद्याकडे झुकलें तर काहींही हरकत नाहीं.

माधव जूलियन यांनी त्यांच्या ‘गज्जलांजली’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलें आहे की, वामनपंडित यांची ओवी म्हणजे जवळजवळ गद्यच आहे. वसंत बापट यांनी एका भाषणात सांगितले, (ज्याला मी हजर होतो), की ‘रामदासांचे विचार थोर असले तरी त्यांचे काव्य, ‘काव्य’ या निकषानें श्रेष्ठ नाहीं, कारण तें गद्यमयच आहे ; आणि, रामदास जर आजच्या काळात लिहीत असते तर त्यांनी त्यांचें लेखन गद्यातच केलें असतें’. ना. घ. देशपांडे त्याच्या ‘खूणगाठी’च्या प्रस्तावनेत सांगतात की, “रामदासांच्या ओव्या ‘गद्यघोषा’तच म्हणत असत”. म्हणजेच, तें काव्य गद्याप्रमाणेंच आहे, हें स्पष्ट आहे.

यमक-अनुप्रासादींचा वापर करणारे ट्रेडिशनल, पारंपरिक, धर्तीचे काव्य जर गद्यासमान असूं शकते, तर मग, मुक्तकाव्याबद्दल बोलायलाच नको; तें तर कमीअधिक प्रमाणात, गद्यासमानच असते. विविध भाषांमधे, कितीतरी कवींच्या, फ्री-व्हर्समधील, गद्याकडे झुकणार्या, ओरिजिनल व भाषांतरित कविता मी वाचलेल्या आहेत, व , केवळ त्या रूपामुळे कवितांच्या एक्सप्रेशनमधे कांहीं कमतरता आली आहे, असे मला तरी वाटलें नाहीं. अर्थातच, इंपॅक्ट होणें महत्वाचें.
मात्र, असें काव्य खूपच-‘गद्याळलेलें’ बनूं नये, एवढेंच. पुन्हां राम पंडितांचा रेफरन्स. त्यांचें म्हणणें असें की, मराठी कविता अत्यधिक गद्यात्मक होत चालली .. (आहे). ते असेंही लिहितात की, दुर्बोधता हा मराठी काव्यात दाखल झालेला अवगुण … (आहे). माझा अनुभव असा की, ‘मुक्तकाव्य’ असूनही लय असलेलें काव्य मी वाचलें-ऐकलेले आहे, खासकरून हिंदीत. याचा अर्थ असा की, मुक्तकाव्य ‘गद्याळलेलें’ असलेंच पाहिजे, असें नाहीं. आनंदाची गोष्ट ही की, ‘आर्यमा’ संग्रहातील मुक्तकाव्य ‘शब्दबंबाळ’, ‘गद्याळलेलें’ व दुर्बोध झालेलें दिसत नाहीं. थँक् गॉड ! (अँड थँक् दि पोएट् ).

• सामाजिक विचारांच्या कविता या संग्रहात आहेतच. त्यामधील कांहींमधे ‘विद्रोही’ सूर उमटला तर कांहींही अयोग्य नाहीं, असे मला वाटतें. दलित साहित्य नाहीं कां विद्रोही रूप घेऊन आलें ? शतकानुशतकें जर एखादी ‘जमात’, एखादा वर्ग, एखादा समूह, भरडला गेला असेल, तर, एक्सप्रेशन, प्रगटीकरण, विद्रोही शब्दांमधे होणारच. लोकसंख्येत ५० % स्त्रिया असूनही, त्यांना ईक्वॅलिटी मिळालेली नाहीं, बरोबरीचा दर्जा मिळालेला नाहीं, हें कटु सत्य आहे. त्यामुळे, स्त्रीच्या मनाची जी तगमग होते, तिला जी इनसिक्युरिटी येते, तिच्या मनात जो विद्रोहीपणा मनात येतो, त्याची कल्पना, मला वाटतें, पुरुषाला येणें फार फार कठीण आहे. १९४९ साली सिमॉन द बोव्हुए हिनें लिहिलेल्या ‘सेकंड सेक्स’ (‘जेंडर’, या अर्थानें), या पुस्तकात, तिनें त्या काळातील नवीन व विद्रोही समजला जाणारा असा विचार मांडला की, ‘पुरुष स्त्रीचें शोषण करतो कारण स्वत:ला तो आद्य-तत्व समजतो, तर स्त्रीला परतत्व, दुय्यम-तत्व समजतो’. या पुस्तकातील विचारांमुळे तिच्यावर खूप वैयक्तिक टीकाही झाली. परंतु, त्या अवास्तव टीकेमुळे तिचा सिद्धांत अयोग्य ठरत नाहीं ; तर उलट तें, टीका-करण्याचें-कृत्य, समाजाची अपरिपक्वताच दाखवते.
‘सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते’ असा सिद्धांत जेव्हां गॅलिलिओनें मांडला, तेव्हां चर्चला तो ‘विद्रोही विचार’च वाटला होता. अखेरीस काय झालें ? गॅलिलिओच खरा ठरला !

तसें म्हटलें तर, केशवसुतांच्या काळी त्यांची कविताही नवकविताच होती, व तिच्यातही विद्रोहाची
लक्षणे दिसून येतात. ‘नव्या मनूतिल नव्या युगाचा शूर शिपाई आहे । कोण मला वठणीवर आणूं शकतो तें मी पाहे।’ हा प्रस्थापित समाजव्यवस्थेला चॅलेंजच नाहीं काय? हा विद्रोहच की. परत, विसाव्या शतकाच्या मध्यावर नवीन, ‘नवकाव्य’ हें रूप साहित्यात आलें व तो ट्रेंड सुरू झाला. ती विद्रोहीच कविता होती. तिच्याबद्दल ना. घ. देशपांडे म्हणतात, ‘भ्रष्ट जीवनाविरुद्ध बंड करून नवकविता उठली ; यात वावगें कांहींच नाहीं.’

काव्यातील विद्रोही भावनेला जर आपण अयोग्य मानणार असलो, तर मग नामदेव ढसाळांसारख्यांच्या काव्याला नाकारायचें काय ? मराठीतील दलित साहित्याची पहिली उघड प्रशंसा पु.लं.नी खुल्या दिलानें केलेली आहे, आणि त्यानंतरच अनेक लोक तें साहित्य वाचूं लागले, दलितांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. हिंदीतले थोर कवी ‘निराला’ हेही विद्रोही कवी होते. ‘देता हुआ बुत्ता। बोला कुकुरमुत्ता । अबे सुन बे गुलाब । भूल मत गर पाई ख़ुशबू रंगोआब । ….. ख़ून चूसा खाद का तूने अशिष्ट । डाल पर इतरा रहा है कैपिटलिस्ट !’ हे निरालांच्या कवितेतील शब्द , समाजातील
पेकिंग्-ऑर्डर (pecking-order) च्या विरुद्ध विद्रोह, तिला दिलेला चॅलेंज, दाखवत नाहींत काय ? उर्दूतील २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या पाच-सहा दशकांमधील ‘प्रगतीशील’ शायरांची नज़्म ही विद्रोही नाहीं काय ? साहिर लुधियानवी यांच्या ‘जला दो इसे, फूँक डालो ये दुनिया’ या शब्दांवर काय प्रतिक्रिया द्यायची ?

अहो, हें तर हल्लीच्या काळचें झालें. संत एकनाथ जेव्हां म्हणतात, ‘संस्कृत भाषा देवें केली । मराठी काय चोरापासुन झाली ?’, तेव्हां त्या काळच्या परिस्थितीनुसार तें वचन विद्रोहीच नव्हतें काय ? एवढेंच नव्हे, तर पुरातन कालातील, अवैदिक तत्वज्ञान , ( त्या संदर्भातील शब्द : ‘नास्तिक दर्शनें’ ) , जसें की लोकायत (चार्वाकपंथीय), जैनमत, बौद्धमत वगैरे, हेंही विद्रोहीच होतें की.

लिहिलेले विद्रोही विचार वाचकाला रुचतील न रुचतील, पटतील न पटतील, पचतील न पचतील; मात्र त्या प्रवृत्तीला, त्यामागील कारणांना, समजून घ्यायलाच हवें. विद्रोही विचार हे फक्त काव्यातूनच एक्स्प्रेस होताहेत, नक्षलवाद्यांसारखे हिंसक कृतींमधून नाहीं ना ? झालें तर ! विद्रोही विचार उघड व निर्भीडपणें मांडले गेले, तरच समाजाची प्रगती होऊ शकते. परिस्थितीनुसार मनात विचार हे तर येणारच, मग ते कॉन्फॉर्मिस्ट असोत किंवा विद्रोही. पण विद्रोही विचार दाबून ठेवले, आवाज उठवला नाहीं, तर समाजातील अयोग्य प्रवृत्ती संपणार कशा ?

कवयित्री स्वत:ला ‘विद्रोही’ समजते, असें मात्र, संग्रहातील काव्य वाचून, मला वाटत नाहीं, कारण मूलत: या संग्रहातील कविता विद्रोही नाहीं. अर्थातच, या संग्रहातील कवितांमधे जो काहीं विद्रोहीपणा मधून मधून उसळतो, तो, कवयित्री ‘भरडल्या जाणार्या स्त्री-जातीची’ प्रतिनिधी म्हणून प्रस्फुटित करत आहे, व्यक्तिगत अनुभव म्हणून नाहीं, हें मला तरी स्पष्ट आहे.
कवयित्री जेव्हां लिहिते,
*‘रामा आज मलाही तुझी अग्निपरीक्षा घ्यायचीय’,
किंवा,
*‘आतां जन्म देणंच नाकारणार आहोत आम्ही’,
तर मला तें अयोग्य तर वाटत नाहींच, तो मला काव्यातील दोष वाटत नाहींच; तर, ते शब्द माझ्या हृदयाला चरचरून स्पर्शून जातात, ‘अरे !!!’ असा उद्गार ऑटोमॅटिकली, नकळत, मुखातून बाहेर येतो. मला ती, (कवयित्री जिला काव्यात रिप्रेझेंट करत आहे, त्या ), ऑप्रेस्ड-स्त्रीवर्गाची स्वाभाविक प्रतिक्रिया वाटते, स्त्रीच्या जिवंत अनुभवांचें व विचारांचें प्रतिबिंब वाटते, व ती मला अंतर्मुख व्हायला लावते.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..