नवीन लेखन...

याला जीवन ऐसे नाव भाग १७

वाग्भट सूत्र स्थान 5 मधे ग्रंथकार असे म्हणतात, आकाशातून थेट खाली येणारे पाणी हे सर्वोत्तम. याला गांगेय जल, ऐंद्र जल, अंतरीक्ष जल किंवा दिव्य जल असे म्हणतात.

जमिनीतून पण पाणी वर येते, जसे विहिरीतून येणारे. याला भूमीतून येते म्हणून भूमीज किंवा भौमजल म्हणतात.

या दोन्ही प्रकारच्या पाण्याला कोणतीही विशिष्ट चव नसते, रंग नसतो, वास नसतो, पण तरीही ते जीवनदान देणारे आहे, म्हणून त्याला जीवन म्हटले आहे.

बाह्यरूपावर एखाद्याचे गुणमुल्य ठरत नसते, त्याच्या उपयोगितेवर त्याची किंमत ठरत असते. हे आत्महत्या करू इच्छिणाऱ्या मंडळींनी जरा लक्षात घ्यावे. जर असे विचार येत असतील तर झरा, नदी, धबधबा, समुद्र, तलाव, कारंजा यांच्याजवळ जावे. काठावर शांत बसावे, पाण्याचे उडणारे तुषार अंगावर झेलावेत, मनसोक्त पाण्याशी खेळावे, आणि मनातली सारी जळमटं धुवुन टाकावीत.

“मी हा असा, मला काही जमत नाही, माझ्यात काहीही गुण नाहीत, माझी इथे आवश्यकता नाही, माझी कोणाला गरज नाही, माझ्यामुळे कोणाचेही काहीही अडत नाही, मग मी जगायचे तरी कशाला”, असे नकारार्थी विचार ज्यांच्या मनात येतात, त्यांनी या खळाळत वाहाणाऱ्या पाण्याकडे पहावे. पाणी असा विचार करतं का ? मी कशाला वाहायचे ? माझं पुढे काय होणार आहे. गटारातून समुद्रातच जाणार. तिथेही माझी वाफच होणार. ना मला रूप ना गंध, ना आकार. मग माझ्या जिंदगानीचा काय उपयोग होणार ?
पण हेच पाणी कोणत्याही अपेक्षाशिवाय वाहात असते. “ज्याला हवे असेल तो माझ्या काठावर येतो आणि अमृतकण घेऊन जातो, हेच माझं मोठेपण” असा सकारात्मक अहंकार बाळगून हे जल इतरांना तृप्त करण्यासाठी समुद्रात विलीन होऊन जाते.

मनाला प्रसन्न आणि शुद्ध करण्यासाठी देखील हे जीवन काम करते. जेव्हा प्रकुपित पित्तामुळे राग अनावर होतो, अंगाची आग होते, मनाचा तोल जातो, तेव्हा पाण्याचा एक घोट लगेचच शांतपणा आणतो. प्रवासाचा शीण आलेल्या पाहुण्यांचे पहिले स्वागत पाणी देऊनच केले जात असते. प्रवासाचा थकवा एक घोट पाण्याने लगेच निघून जातो ना !

घरात वारंवार होणाऱ्या भांडणात हे पाणी आग कमी करणारे ठरू शकते. बाहेरून दमूनभागूनचिडून आलेल्या पतीला अथवा पत्नीला, घरात आधी हजर असणाऱ्यांने, दारात पाऊल पडताक्षणी जर पाण्याचा एक ग्लास नेऊन हातात दिला तर ??? सारा थकवा, सारी दुःख, सारा राग, नाहीसा झाल्यासारखा वाटेल.

प्रत्येकाला, वेळेत घरी यावंस वाटेल, मला पाणी विचारणारं कोणीतरी माझी वाट बघतंय, ही भावनाच कौटुंबिक संबंध घट्ट करत असते.

म्हणूनच याला जीवन ऐसे नाव !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
24.12.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..