नवीन लेखन...

मराठा आरमार दिन – भाग १

‘२४ ऑक्टोबर’ हा दिवस ‘मराठा आरमार दिन’ म्हणून साजरा करूयात .

भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. शिवरायांच्या पूर्वीही हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होते. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे भारतात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला. एवढेच काय तर समुद्र उल्लंघायला देखील बंदी करण्यात आली. याचा फायदा पोर्तुगीज-इंग्रज-डच-फ्रेंच-सिद्दी यांनी उठविला आणि आपल्याला अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली. त्यावेळचे बलाढ्य सम्राट मोगल-आदिलशाह-निजामशहा-कुतुबशाह इ. यांनीदेखील प्रबळ असे लढाऊ आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही.

मात्र शिवाजी महाराजांनी कोकणाचा मुलुख ताब्यात आल्यानंतर तेथील समुद्र पाहून, सिद्दी व युरोपियनांच्या उचापती पाहून लढाऊ आरमार उभे केले. एवढेच नाही तर अत्यंत कमी कालावधीत उत्तमोत्तम सागरी किल्ले बांधले.धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आपल्या मावळ्यांना बलाढ्य युरोपियनांविरुद्ध लढण्याची नवी प्रेरणा दिली. आणि… आणि मग पुढच्या पिढीने आपल्या समुद्रावरील युरोपियनांची सत्ता खिळखिळी करून टाकली.पोर्तुगीज तर स्वतःला हिंदी महासागराचे मालकच समजत. समुद्रामध्ये बाहेर पडणाऱ्या कोणत्याही जहाजांना मग ते बलाढ्य मोगलांचे असले तरी त्यांना पोर्तुगीजांकडून कार्ताझ (परवाने) विकत घ्यावे लागत. मोगलांची हि स्थिती तर आपली काय ? त्यावेळच्या सागरी किनारपट्टीवरील बलाढ्य शाह्यांपुढे मराठयांची नव्याने उदयास आलेली सत्ता अगदीच छोटी होती. मात्र शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी आरमाराची गरज ओळखली.

शिवरायांच्या आरमारासंबंधी एक कवी म्हणतो-

देशी भार्गव क्षेत्र सागर तिरी नाना स्थळे योजिनी
बंदी दुर्ग अनेक डोंगर शिरी बेटे बाले पाहुनी
जहाजे आरमार भर जलधि दुष्टांसी शिक्षा करी
बारा मावळ देश पर्वत दरी बांधोनि किल्ले गिरी

हा झाला आपला इतिहास, मात्र आपण तो कदापी विसरता कामा नये.

शिवाजी महाराजांनी इ.स. १६५६ मध्ये जावळी काबीज केली. जावळीमध्ये कोकणाचा बराचसा भाग येत असल्याने राजांचा कोकणात प्रवेश झाला. ४ नोव्हेंबर १६५६ पूर्वी मराठ्यांच्या सिद्दीशी अनेक झटापटी झाल्या. ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ या कालावधीत शिवरायांनी १०० किमी. लांबीचा समुद्रकिनारा व मुलुख मिळविला. मिळविलेल्या या नव्या मुलुखाच्या संरक्षणासाठी व सिद्दीच्या कुरापती थांबविण्यासाठी व त्याला समुद्रमार्गे मिळणारी रसद तोडण्यासाठी नाविक दल (लढाऊ आरमार) असणे गरजेचे होते. त्यासाठी योग्य अशी जागा / तळ असणे गरजेचे होते. *ऐन समुद्रामध्ये नौका बांधता येत नाहीत. लष्करीदृष्ट्या समुद्रामधून आत घुसलेली खाडी हि जहाजबांधणीसाठी उत्तम जागा असते.

आणि अखेर तो दिवस उजाडला….. दि. २४ ऑक्टोबर १६५७ रोजी ऐन दिवाळीत (धनत्रयोदशी) कल्याण, भिवंडी काबीज केली. आणि कल्याण, भिवंडी व पेण येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली. _यावर्षी या घटनेस ३५९ वर्षे पूर्ण झालेली आहेत._ हि आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

अशा शुभमुहूर्तावर शिवरायांनी आरमाराची उभारणी केली, म्हणून ‘२४ ऑक्टोबर’ हा दिवस ‘मराठा आरमार दिन’ किंवा ‘भारतीय आरमार दिन’ म्हणून आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करूयात …….

 

स्वतंत्र्य आणि सार्वभौम आरमारनिर्मिती हा हिंदवी स्वराज्याचा ठळक विशेष होय.तीन बाजूंनी सागराने वेढलेल्या हिंदुस्थानचे संरक्षण करण्यासाठी आरमार(नौदल) हे अत्यंत महत्वाचे अंग असल्याचे महाराजांनी ओळखले होते.विशेष म्हणजे ज्या काळात मुघल साम्राज्याजवळ सार्वभौम आरमार नव्हते,त्या काळात महाराजांनी स्वतंत्र्य आरमाराची उभारणी जाणीवपुर्वक केलेली आहे.पश्चिम किनार्यावरील सागरी संरक्षणाचे कार्य औरंगजेबाने जंजिरेकर सिद्दीवर सोपवले होते.पुर्व किनार्यावर मुघल आरमार होते पण ती जहाजे चालवणारी खलाशी फिरंगी असत व त्यासाठी वार्षीक चौदा लक्ष रुपये खर्च करी.अशाप्रकारे मुघली आरमार परावलंबी होते.मात्र महाराजांनी गलबते स्वत: बांधुन त्यावर आपलेच खलाशी ठेवले.हाच मुघली व मराठी आरमारातील ठळक फरक होता.

मराठ्यांच्या आरमाराची सरकाररित्या संस्थापना छत्रपती शिवरायांनी केली.महाराजांनी स्वतंत्र्य आरमार उभारण्याचा हुकुम दिला.असा उल्लेख “मराठे व इंग्रज” या ग्रंथात आहे.दिसामासाने वाढणारे स्वराज्याची सिमा समुद्र किनार्यालाही लागून आहे.किनारपट्टीवर सत्ता अधिकार प्राप्त करुन घेतल्याशिवाय आपली कोकणपट्टी सुरक्षित नाही,याची खात्रीही पटली होती.बसरुरच्या मोहिमेनंतर आलेल्या अनुभवाने शिवरायांना आरमारी प्रतीकारासाठी काही नवीन उपाययोजना करण्याची निकड वाटली.

शिवाजी महाराजांनी परदेशी पोर्तुगिज अभियंत्यांना जहाज बांधणीसाठी कामास ठेवले.
“लैतांव व्हियेगस” व त्याचा मुलगा “फेर्नांव व्हियेगस” यांच्या नेतृत्वाखाली शिवरायांनी पहिली वीस लढाई गलबते बांधण्यास सुरुवात केली.हा जो “लैतांव व्हियेगस” होता त्याच्या हाताखाली जवळपास ४०० माणसे होती. शिवरायांमध्ये हे एक चाणाक्ष नौसेनानी होण्याचा सर्व गुण होते आणि ह्या आरमारापासुन आपल्याला भविष्यात धोका निर्माण होणार हे पोर्तुगिज विजरई पु्र्ण पणे जाणुन होता त्यामुळे आरमार पुर्ण बांधुन होण्यापुर्वीच त्याने एक जाहिरनामा काढला की शिवरायांच्या आरमारात नौकरीस असलेल्या सर्व पोर्तुगिज लोकांनी स्वदेशी परत जावे.त्यामुळे एके दिवशी सर्व कारागीर महाराजांची नौकरी सोडुन गुप्तपणे पळुन गेले.

शिवरायांचे आरमार दिवसेंदिवस वाढत होते.इतके की पोर्तुगिजांना मराठी नौदलाची भिती वाटत होता. महाराजांच्या आरमाराविषयी सन १६६७ च्या अखेरीस पोर्तुगालच्या राजास “विजरई कौंदि द सांव्हिसेंति” याने कळविले होते.विजरई लिहितो की, “शिवाजीचे नौदल मला भितीदायक वाटते.कारण त्याच्याविरुद्ध आम्ही सुरुवातीपासुनच कारवाई न केल्यामुळे त्याने किनार्यावर किल्ले बांधिले आणि त्याच्या जवळ पुष्कळ तारवे आहेत,पण ती तारवे मोठी नाहित. शिवाजीराजे व संभाजीराजेंनी यांनी स्थानिक लोकांच्या कर्तबगारीचा सदुपयोग करुन पाश्चात्यांच्या मोठ्या आरमाराला तोंड दिले व आपल्या लोकांच्या समुद्रपर्यटनाबाबतच्या धार्मिक समजुतीत मोठी क्रांती घडवुन आणून त्यांना दर्यावर्दीपणात व आरमारी युद्धकलेत अल्प कालावधीत आघाडीवर नेऊन बसविले.

व्यापारी धोरण:-

स्वतंत्र्य आरमाराची स्थापना करुन शिवाजी महाराजांनी महारष्ट्राच्या इतिहासाला जी कलाटणी दिली तिच्या मागे आधुनिकिकरणाचे तत्वज्ञान होते.त्यांनी पश्चिम किनार्यावरील दरवाजा उघडुन पाश्चात्य सुधारणेचा कालवा इकडे आणण्याची तजवीज चालविली होती.परकिय व्यापारास उत्तेजन तर द्यायचेच सोबत आपल्या आरमाराचे नियमन करावयाचे असा दुहेरी बेत शिवरायांनी आखला.त्यांना पाश्चात्यांच्या नौकानयनाची पुर्ण जाणीव होती.त्यांनी डच,इंग्रज,पोर्तुगिज ह्यांच्याकडुन बर्याच कल्पना उचलल्या.मराठी राजवटीत शिवराय हे एकमेव राजे आहेत ज्यांनी तारवांतून स्वारी केली,ही गोष्ट याबाबत विसरण्यासारखी नाही.शेतीप्रमाणेच सरकारी उत्पन्नाचे दुसरे महत्वाचे साधन म्हणजे व्यापार व उद्योगधंदे.पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे म्हणजे एका अर्थी व्यापाराच्या रक्तवाहिन्या होत्या.इथूनच सर्वदूर मालाची आयातनिर्यात केली जाई.या मालावरील जकाती म्हणजे सरकाराते प्रंचड उत्पन्न होते.महाराजांच्या वेळी पोर्तुगीज,इंग्रज,डच,फ्रेंच,अॅबिसिअन,चिनी व बेहेरोनी,आर्निनियन,तार्तार,ग्रीक,अरब हे परदेशी व्यापारी भारताशी व्यापार करीत.स्वराज्यात फारसा माल तयार होत नव्हता,तरी राजापुरी पंचा व लोटा तसेच भिवंडीची हातमागावरील वस्त्रे व चौलचे रेशमी कापड,मीठ,आंबे,सुपारी,नारळ इ.वस्तुंची निर्यात लक्षणीय होती.

महाराजांनी परदेशी व्यापार धोरण राबवण्यास सुरुवात केली.”साॅल्ट फ्लीट “(Salt flit) म्हणजे मीठ वाहुन नेणार्या बोटींचा तांडा मराठ्यांकडे होता.मुलखातील चौल,दाभोळ,कल्याण,भिवंडी,वेंगुर्ला,पेण हि ठिकाणे चांगलीच भरभराटीस आले.चौल हे दख्खनेतील सर्वात मोठी बाजार पेठ होती.पश्चिम किनारपट्टी महाराजांच्या ताब्यात येताच त्यांनी भरपुर व्यापारी उत्पन्न मिळू लागले.शिवाय मीठाच्या व्यापारही प्रंचंड असुन त्याचे उत्पन्न दांडगे होते.काही मिठागरे पोर्तुगिज हद्दीत होते.पुष्कळदा व्यापारी स्पर्धा चाले.गोवेकरांच्या स्पर्धेमुळे स्वराज्यातील मीठ व्यापार धोक्यात आला बरीच मिठागरे ओस पडली अशा वेळेस ह्या व्यापाराय संरक्षण देण्याच्या दृष्टीने मीठावर जबर कर बसवला. अर्थशास्रामध्ये ह्या धोरणास’policy of protection” असे म्हणतात.मीठ वाहतुकीत बचतीसाठी त्यांनी कारंजाहुन मीठ आणण्याऐवजी ट्राॅंम्बेहुन मीठ आणण्याचा हुकुम नौदलास दिला.त्यामुळे ४०० खंडी मीठ आधी १०० आण्यास विकले होते तेच मीठ आता ४६ आण्यास विकले.

अरबस्तानाशी व्यापार करण्यासाठी मजबुत व अवजड अशी दोन जहाज बांधली व ती जैतापुर मार्गे मोखा येते पाठवली. लढाऊ गलबतांवर मोठ्या व लहान तोफा,बंदुकी,हुक्के ही शस्त्रे असत.इंग्रज व पोर्तुगिजांकडून महाराजांनी तोफा विकत घेतल्या.इंग्रजांच्या पितळी तोफेचे प्रमुख गिऱ्हाईक महाराजाच होते.

मराठा आरमार दिन
२४ आॅक्टोबर

(उद्या भाग-२ मध्ये महाराजांनी दुरदृष्टीने निर्माण केलेल्या आरमाराचा वारसा सांभाळणार्या पाश्चात्य शक्तींना नामोहरम करणार्या मराठा नौसेना अधिपती सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पराक्रम पाहु)

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..