नवीन लेखन...

मन कि बात – माणसं; मोठी आणि छोटी..

माणसं सर्व सारखीच असली, तरी आपण त्यांचं अगदी सहजपणे आणि नकळतपणे वर्गीकरण करत असतो. ही आपल्या मनाला लागलेली एक वाईट सवयचं असते. मोठा माणूस, छोटा माणूस, फालतू माणूस असं वर्गीकरण करायचे काही निकष आपण, म्हणजे आपण व समाजाने ठरवलेले असतात. हे निकष म्हणजे पद, पैसा, पत आणि प्रतिष्ठा. या लेखात मी फक्त छोट्या आणि फालतू समजल्या गेलेल्या माणसांचाच विचार करणार आहे, कारण मोठ्यांचा विचार सर्वच करतात व लहान माणसं विचार करण्याच्या लायकीची नसतात असं सर्वच समजतात. लहानांचा विचार करणंही तेवढंच गरजेचं आहे, कारण ती ही माणसंच आहेत व समाजाचा हिस्साही आहेत.

आपल्या साॅफिस्टिकेटेड समाजात माणूस मोठा, छोटा किंवा फालतू ठरतो तो त्याच्या पदामुळे, म्हणजे व्यवसायामुळे. याचा अर्थ पद नसलं, की पत, पैसा आणि प्रतिष्ठा या पुढच्या पायऱ्यांचा विचार करायचीही गरज राहात नाही. जेवढा व्यवसाय खालचा, तेवढा तो माणूस छोटा अथवा फालतू अशी आपली सर्वमान्य व्याख्या आहे. अर्थात सर्वच असं समजत नाहीत हे खरं असलं, तरी समाजातला एक मोठा वर्ग तसं समजतो हे ही खरंय. पुन्हा खालचं काम आणि वरचं काम यात पदसापेक्षता आहे. मोठ्या पदावरचा, त्याच्यापेक्षा खालच्या पदावरच्याला कमी समजतो तर तो खालचा पदवाला त्याच्यापेक्षा कमी पदवाल्याला. बॅंक, एलआयसी, सरकारवाले वाले इतर ठिकाणी काम करणारांना कमी समजतात तर हे सर्व मिळून केवळ श्रमांवर जगणाऱ्या आणि हातावर पोट असणारांना कमी समजतात. पोटासाठी केला जाणारा कोणताही व्यवसाय असा खालचा किंवा वरचा नसतो. प्रतिष्ठा असते ती कामाला, काय काम करतो याला नाही हेच आपण विसररलोय.

आपल्या सामाजिक श्रम-उतरंडीवर सर्वात खालच्या थरावर आहेत, ते वाॅचमन, रिक्शा/टॅक्सी ड्रायव्हर, नुसते ड्रायव्हर्स, हाॅटेलातील वेटर्स, हातगाडीवाले, मोलकरणी वैगेरे वैगेरे. घरच्या व दारच्याही कुत्र्या-मांजरांनाही नांव असतं, पण यांना नांव नसतं (मोलकरीण अपवाद पण हीला ही तिच्यासमोरच बऱ्याचदा ‘कामवली’ असं म्हचलं जातं), म्हणजे नांव असतं पण ते कुणीच विचारत नाही. वाॅचमन, अाॅटो, रिक्शा, टॅक्सी, शुक शुक, किस घेताना (लहान मुलांचा. गैरसमज नको.) येतो तसा प्चुक असा काहीतरी आवाज हिच यांची नांवं. यांना नांव वैगेरे काही विचारायचं असतं असं कुणालाच वाटत नाही. नांव काय विचारायचं, पैसे देतोय ना, मग झालं. बाकीच्या गोष्टी राहू दे, यांना एकदा नांव विचारून चर बघा, त्यांच्या तुम्हाला देत असलेल्या सर्व्हीसमधे जाणवण्याइतपत फरक पडतो की नाही ते..! आपल्याला कुणी शुक शुक करून बोलावल्यावर कसं वाटतं, तसं त्यानाही वाटतंच, कुणालाही वाटेल. पण कुणी आपलं नांव विचारून आपल्याला नांवाने (सोबत हुद्दा वैगेरे असल्यास आणखी उत्तम) बोलावल्यीस आपण किती सुखावतो ना, तसंच त्यांचंही असतं कारण ती ही माणसंच असतात.

प्रत्येकाला दुसऱ्याला काही सांगावसं वाटत असतं, आपल्यालाही वाटतंच की आपलं कुणीतरी ऐकावं म्हणून. ‘याचं काय ऐकायचं, हा काय सांगणार’ म्हणून आपण यांच्याकडे बघणंही टाळतो, तिथं बोलणं वैगेरे खूप दूरची गोष्ट. पण रस्त्यावर राबणारी, हातावर पोट असणारी ही माणसं एकदा बोलती करुन बघा, काय ज्ञान असतं त्यांच्याकडे ते..! अहो, विद्यापिठांची जमिनीपासून छतापर्यंत ग्रंथांनी गच्च भरलेली ग्रंथालयं फिकी पडतील यांच्या ‘रोकड्या अनुभवां’समोर. चालती-बोलती ‘ज्ञानपिठं’ आहेत ही. मला अशाच भेटलेल्या अनेक ‘छोट्या किंवा फालतू’ माणसांनी आयुष्याकडे बघण्याचा कितीतरी विविध दृष्टीकोन दिलेत जे मला शाळा-काॅलेजात किंवा पंडीत मैत्रीत काही सापडलं नव्हतं. रोजच्या जीवन जगण्यालाठी त्यांना पदोपदी व क्षणोक्षणी करावा लागणारा संघर्ष या तथाकथीक छोट्या किवा फालतू लोकांना विलऱ्क्षण समृद्ध बनवत असतो. ही समृद्धता किंवा ज्ञानाची रेडीमेड कॅप्सूल आपल्याला विनासायास मिळू शकते, अट एकच, त्यांचं नांव विचारा, त्यांच्याशी बोला..छोटे, अशिक्षीत, गरीब आणि म्हणून फालतू असं समजून त्यांच्याकडे बघू नका.

अशाच एका टॅक्सीवाल्याने मला रस्त्यावर राबणाऱ्या माणसाकडे आदराने बघायला शिकवलं होतं. गाडीचा हाॅर्न कुणासाठी असतो बे शिकवलं होतं जे मला कुठल्याच पुस्तकात किंवा गुगल, विकिपिडीयावर कळलं नसतं. एका रिक्शावाल्याने त्याच्या रिक्शाला ATM असं नांव दिल्याचं पाहून त्याच्या बुद्धीचं कौतुक वाटलं होतं. पैसे नाहीत, ‘काढ’ दोन तास रिक्शा चालवून पैसे. आपल्याला खात्यात पैसे असतील तरच ATM मधे मिळतात, त्याच्याकडे ही भानगडच नाही. यांच्यासाठी हवेत पैसे असतात, दम आहे तेवढे काढा. एका रिक्शाव्ल्याने जयललीताच्या आजारपणाचं ‘राजकीय’ कारण सांगीतलं होतं, ते आता तिच्या मृत्यूमंतर उद्भवलेल्या वादामुळे खरं ठरतंय असं वाटतं.

असाच एक गृहीत धरलेला प्राणी असतो तो आॅफिसचा पिऊन. याला काही ठिकणी नांवाने बोलावतात, नाही असं नाही, पण तो २५ चालअसो वा ५० चा ‘तो नारायण’ किंवा ‘तो राजू’च असतो. वयाचा मान ठेवायला तो कुठे मोठा आहे? एक आहे, काही जण पिऊनशीही आदराने वागतात, नाही असं नाही, पण तो अपवाद. पण अशा अपवादांकडेही विचित्र नजरेने पाहीलं जातं.

असाच एक राजू माझ्या जीवनात आला होता. शिक्षण नाही, सिगारेट, दारू, जुगार अशी सर्व प्रकारची व्यसनं आणि त्यामुळे कायमचा फाटकेपणा असुनही याच्यात एक गुण होता, तो प्रामाणिकपणाचा. कितीही पैसे समोर असोत किंवा कितीही किंमती वस्तू, व्यसनी असुनही याची नियत कधी फिरलेली मी अनुभवलेली नाही. चार चार महिने पगार नसूनही याची मती कधी फिरली नाही. पैसे लागले तर मागून घ्यायचे व जेंव्हा कधी आकडा लाहेल तेंव्हा परत करायचीही भल्या भल्यांत न दिसणारी दुर्मिळ मानसिकता. बाकीचं जाऊ द्या, पण याने मला एकदा माणुसकीचा धडा त्याच्याही नकळत दिला होता.
त्याचं झालं असं, की असाच एकदा याला चार महिन्यांचा पगार मिळलेला नव्हता. खायचे वांधे. त्यात याचा एक गांववाला नेमका दुपारच्या जेवणाच्या वेळेस याला भेटायला आला. जेवणाच्या वेळेस कुणी आलं, तर त्याला ‘या जेवायला’ म्हणायची आपली संस्कृती त्याच्या तोंडचा घासही काढून घेण्यापर्यतची विकृती कधी झाली हे आपल्यालाच कळत नाही अशा कलीयुगात राजूकडे मात्र ती अद्याप जुन्याच स्वरुपात टिकून होती. त्याने याला बहुतेक जेवायला बोलावलं व याची परिस्थिती माहीत नसणऱ्या त्याने ते आमंत्रण, निमंत्रण म्हणून स्विकारलं. आता याची पंचाईत झाली. घरात जेवण नाही आणि याच्या खिशात पैसा नाही. हा राजू माझ्यीकडे आला व माझ्याकडून तिस रुपये मागीतले. मी ही दिले. मला याची वर सांगीतलेली गाववाल्याची कथा माहित नव्हती. मला वाटलं हवे असतील पैसे दारूला किंवा आकडा लावायला, पण तो मागत असलेली रक्कम किरकोळ असल्यानं मी पटकन देऊन टाकली.

काही वेळाने राजू आॅफिसात परत आला. मी, त्याची आकड्याची सवय माहित असल्याने, त्याला विचारलं, की बाबा कुठला आकडा लागला आणि तिस रुपयांचे किती पैसे मिळले. त्यातले मलाही थोडे दे असंही मी मस्करीत नेहेमीप्रमाणे म्हणालो. पण त्याने जे पुढे सांगीतलं त्यामुळे मी किती कोत्या आणि राजू किती मोठ्या मनाचा आहे हे कळलं. तो म्हणाला, “साहेब, माझ्या गांववाल्या मित्राला त्या पैशांतून खायला दिलं. दुपारी आलेल्याला जेवल्याशीवाय कसं पाठवणार”. मी विचारलं, “तू जेवलास का?”. त्याचं उत्तर होतं, ” तो जेवला,माझं पोट भरलं. तो ही त्याच्या घरून मला कधीच जेवल्याशिवाय पाठवत नाही, त्याला मी उपाशी कसं पाठवू”. एक उपाशी त्याच्यानकळत मला सहजपणे शिकवत होता.

माझं तर मला हवंच, दुसऱ्याचंही मलाच हवं ही विकृती असलेल्या आणि आपली बायको-मुलं आणि नातेवाईकांच्या पलिकडे न पाहाणाऱ्या अब्जो-करोडपती असलेल्या तथाकथीत प्रतिष्ठीत साहेब माणसांपेक्षा त्या अशिक्षित राजू मधला माणूस, खऱ्या अर्थाने ‘माणूस’ होता. या राजूला त्या आॅफिसात नेहेमी हडतूड केली जायची तरी यांने माणूसकी सोडली नव्हती..

मोलकरणी, हातगाडीवाले, वेटर्सही असेच. यांचा दिवसभरात अनेक मानवी नमुन्यांशी संबंध येत असतो. त्यांना ‘जगण’ खऱ्या अर्थानं कळलेलं असतं आणि त्यांच्याशी बोलल्यावर तो अर्थ आपल्यालाही कळतो. आपल्या खोट्या प्रतिष्ठेची खोटी वस्त्र क्षणभर बाजूला ठेवून यांची नांवं विचारा, त्यांच्याशी बोला हो, त्यांच्या नजरेत आपण मोठे होते व आपणही किती समृद्ध होतो ते..! दोन शब्दच तर बोलायचेत, कुठं पैसे खर्च करायचेत?

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..