नवीन लेखन...

पुनः एकदा पीसीओडी

मी पीसीओडीच्या मानसिक हेतुंबद्दल लिहायला सुरवात केली आणि छान मंथन झाले.
काही स्तुती करणाऱ्या, तर काही अत्यंत कटू जहाल, तर काही अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया मिळाल्या. काहींचा सूर फक्त स्त्री मुक्तीवादी होता, काहींना यात धार्मिक वास आला, तर काही अगदी गंमतीशीर होत्या. म्हणजे हे तुम्ही आम्हालाच का सांगता, पुरूषांना देखील सांगा ना ! इथपर्यंत !!

काल मी संप्राप्ती सांगण्याचा प्रयत्न केला, पण ही संप्राप्ती चुकीची / बरोबर असे कुणीही वैद्य बोललेच नाही.

स्त्रीत्व आणि मासिक पाळी पाळणं हे दोन्ही विषय वेगळे आहेत. आधी बंद होत आलेली मासिक पाळी सुरू तर होऊ देत, मग पाळायची /नाही पाळायची/ कशी पाळायची/ का पाळायची/ आम्हीच का म्हणून, हे विषय घेऊ चर्चेसाठी ! पीसीओडी हा विषय एवढा गंभीर आहे, असं मला म्हणायचंय !

असो.
एक विचार मंथन सुरू झाले ही चांगली गोष्ट आहे. काही छान विचार वाचायला मिळाले. ज्ञानात खरंच भर पडली.

मुळात हा आपल्या आयुर्वेद शास्त्रात अनुक्त प्रकारात बसणारा व्याधी.
त्याचे हेतु, त्याचे निदान त्याची चिकित्सा, त्याची दोषदूष्य संमूर्च्छना, संप्राप्ती भेद इ. वर आणखी सखोल विचार व्हायला हवाय.
एक अत्यंत गंभीर आजार ज्याचे उत्तर अॅलोपॅथीमधे आजतरी अंधेरे मे तीर असेच आहे.
पण आपण आयुर्वेदाचे दृष्टीकोन वापरला तर, हा पीसीओडी रोग थांबवू शकतो का ? त्याचे उत्तर “होय” असेच आहे. एखाद्या रोगाच्या हेतुशोधनापासून अपुनर्भवपर्यंत विचार कसा करावा, याचे प्रात्यक्षिक पहायला मिळेल.

मी “थांबवू” शकतो का असा शब्द मुद्दामच वापरला, विचारकक्षा आणखी वाढवल्या तर घालवू शकतो का ?, असा शब्दही वापरता येईल.

हाच विचार अन्य सर्व कधीही बऱ्या न होणाऱ्या व्याधींसाठी करावा लागेल.

जर रोगाचा हेतु शारीरिक असेल तर चिकित्सा शारीरिक
जर हेतु मानसिक असेल तर चिकित्सा मानसिक
जर हेतु आध्यात्मिक असेल तर उपाय आध्यात्मिक करावा लागेल. आणि हेतु सामाजिक असेल तर चिकित्सा देखील सामाजिक करावी लागेल. आणि सर्वच हेतु कारणीभूत असतील तर सगळ्या हेतुंचा विचार एकदम करावा लागेल.

जर आपले शास्त्र हे तीनही शामाआ. सा सुद्धा. मानत असेल तर त्याच्यापर्यंत पोचले पाहिजे. शारीरिक हेतुंचा विचार केला तर बदललेली जीवनपद्धती, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त पोषण, हेच शारीरिक हेतु मिळतात. जे सगळ्यांना माहिती आहेत.

मानसिक हेतुंचा विचार केला तर मी अगोदर म्हटले तसे, स्त्रीत्वापासून लांब जाणे, तिटकारा वाटणे, वाढता ताणतणाव, नोकरी छोकरी या दोन्ही आघाड्यांवर काम करणे, हे हेतु मिळतात.

आध्यात्मिक हेतुंचा विचारही करावाच लागेल, आध्यात्मिक हा आणखी एक वादाचा मुद्दा होईल, पण जे आहे त्याचा अभ्यास तर करायचाच हवा ना. आईने गर्भावस्थेमधे कुपथ्य करणे, नकोत तेवढ्या गोळ्या खाणे, इ. हेतुंमुळे मुलीला होणारा पीसीओडी हा त्या मुलीसाठी आध्यात्मिक दुष्टीहेतु ठरू शकेल. तिचा काहीही दोष नसताना, तिला पूर्ण आयुष्यभर हा रोग सांभाळत जगावं लागणं, हे तिचं नशीब, असे अनेक रोग आहेत, ज्याची कारणं आध्यात्मिक आहेत.

आणि नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या समस्या, जेवायला पुरेसा वेळ न मिळणे, किवा जेवणाची वेळ नोकरीमुळे पाळता न येणे, जीवनात शांतपणा नसणे, नवरा किंवा बाॅसची हुकुमशाही, घरातील काही कारणाने घ्याव्या लागलेल्या पाळी पुढे जाणाऱ्या गोळ्या, सक्तीने घ्याव्या लागलेल्या ओसी पिल्स, या सामाजिक कारणामुळे पीसीओडी दिसतो.

पाश्चात्य विचारसरणीच्या तज्ञांनी याचा विचार फक्त शारीरिकपुरता अधिक केला आहे. काही कारणाने होणारा हार्मोन्समधील बदल याचा विचार केला आहे. पण हे हार्मोन्समधील बदल घडवायला, मन, इंद्रिये, कारणीभूत आहेत, हा अधिकचा विचार आपणाला करता येणार आहे. कारण आपण तो शिकलोय. आणि त्याची चिकित्सा आपल्याला आपल्या पद्धतीने चांगली करता येणार आहे.

( मी असं म्हटलेलं नाही, की फक्त कुंकु, बांगड्या आणि पैंजण घालून पीसीओडी बरा होईल. पीसीओडीचा एक हेतु मन आहे, हे विसरून चालणारच नाही. आणि स्त्रीयांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे, हे मी आधी नियमितपणे लिहित असलेल्या आरोग्यटीप मधून आपल्या लक्षात आले असेलच.
ज्या मुली कुंकू, बांगड्या, पैंजण वापरतात, आणि ज्यांना पीसीओडीची लक्षणे दिसतात, त्यांचे इतर हेतु शोधावेच लागतील. अव्यायाम, रसायनांचा अति वापर, अवेळी जेवण, लवकर वयात येणे, जीवनशैली ही सर्व कारणे आहेतच ना ! त्याची वेगळी चिकित्सा करावी लागणारच !

मी गेली दहा वर्ष या आजारात जसे कारण (हेतु) तशी चिकित्सा देतोय. माझा संमोहन हा आवडीचा विषय असल्यामुळे मानस हेतु शोधणे, आणि मानस चिकित्सा देणे, त्यामधेही आश्वासन, योगासन, संमोहित अवस्थेत सूचना देणे, नंतर दररोज त्याचा रुग्णाला अभ्यास करायला लावणे, हे मला आवडते. याचा खूप चांगला परिणाम दिसून येतोय. काही रुग्ण मी मुद्दाम फक्त मनोवह स्रोतस शुद्धीचे वेगळे ठेवले आहेत, ज्यांना संमोहनाव्यतिरिक्त फक्त आहारातील पथ्ये आणि योगासने सांगतो. कोणतीही औषधे देत नाही. कुंकु, बांगड्या, पैजण त्याच रुग्णांना सुचवतो, ज्यांनी कधी ते घातलेच नाहीत. त्यांनी हे उपाय केले तरी परिणाम दिसतात. यांची पुढे मासिक पाळी नियमितपणे होताना दिसते.

शमन औषधांचा आणि शोधन चिकित्सेचा परिणाम सुद्धा दिसतो, पण तो काही काळच टिकतो, पुनः कुपथ्य झाले तर किंवा कालाच्या प्रभावाने पुनः अनुपशय दिसतो. जेवढे आपण सूक्ष्मत्वाकडे जाऊ तेवढी शक्ती वाढत जाते,या न्यायाने, शरीरापेक्षा, मन सूक्ष्म आहे, तिथे केलेली चिकित्सा लवकर परिणाम दर्शवते. आत्मा तर त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे. त्याचा अभ्यास गुरूकृपा झाल्याशिवाय सुरूच होत नाही. म्हणून मला असे वाटते,
( मला असे वाटते, म्हणजे मी अहंकाराने म्हणत नाही हो, ) की, सर्वच व्याधींचे हे तीनही हेतु शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हावा, मी जे काम करतोय ते आपणासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय.

पूर्वीच्या काळी देखील स्त्रीयांना मानसिक ताणांना जास्त सामोरे जावे लागत होते. पण पीसीओडीचे प्रमाण एवढे नव्हते. कारण, त्यांची शारीरिक कामेदेखील तेवढीच प्रचंड कष्टांची होती. विहिरीतील पाणी ओढून काढणे, ते घागरीतून कमरेवर घेऊन येणे, सरपण गोळा करणे, चुल फुंकणे, इथपासून, सडा सारवण, रांगोळी काढणे, वाकून केर काढणे, जात्यावर दळणे, कांडणे, उकीडवे बसून कपडे धुणे, भांडी घासणे, पाट्या वरवंट्याने वाटणे, गाई गुरांचे करणे, जमिनीवर डावी मांडी दुमडून जेवणे, ओणव्याने वाढणे, पुनः उष्टशेण करणे, हे सग्गळं तिला एकटीलाच करावं लागत होतं. कोणताही पुरूष मदतीला जात नव्हता. त्यात पोरांकडे तिलाच लक्ष द्यायचं होतं.
तिची करमणूक म्हणजे झिम्मा, फुगड्या, पिंगा, हे सर्व व्यायाम प्रकारच होते. वेगळे योगासनाचे क्लास लावावे लागत नव्हते.

या सर्व प्रकारात तिचे पोट अक्षरशः पिळले जात होते, पिळवटले जात होते, खऱ्या अर्थाने स्त्रीची “पिळवणूक” होत होती. अशा कामामुळे पीसीओडी कशाला होईल ? आज पीसीओडी वाढलेला दिसतोय कारण ही सर्व कामे बंद झाली. मी पुनः एकदा सांगतोय, स्त्रीला कामाला लावायचा माझा हेतु बिलकुल नाही, पण आपण हेतुंचा विचार करतोय, म्हणून जुन्या भारतीय कामांची फक्त आठवण करून दिली.

अन्नाचा दर्जाही उत्तम प्रतीचा होता. कमी खाल्ले तरी (आजच्या भाषेतील पोषणमूल्ये पुरेशी होती. मी आयुर्वेदाचा कट्टर पुरस्कर्ता असल्यामुळे मला म्हणे, असे माॅडर्न टर्मिनाॅलाॅजी असलेले शब्द वापरायची सुद्धा बंदी. ) पोटभर नसले तरी पुरेसे होते.

भरपूर काम करायचं आणि काय खायचं, असा एक जमाना भोगलाय स्त्रीनं. आणि आज हे समीकरण बदलत बदलत, व्यायाम-काम कमी करायचं, आणि काय काय खायचं, असा प्रश्न भरल्या घरात पडतोय. चीज, पनीर, चायनीज, पंजाबी या खाण्याबद्दल मी बोलतच नाही…..
एकंदरीत आज स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक कमी, आणि मानसिक जास्त असं झालंय.

म्हणजे पुनः स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक करा, असं शब्दशः मला म्हणायचं नाहीये.

आणि मी फक्त स्त्रीयांना म्हणतोय, कारण लेखाचा विषय पीसीओडी आहे. मी पुरूषांच्या बाजूने बोलतोय, असा (गैर) समज कृपया करून घेऊ नये.

आणि हो, ही सर्व फक्त आपल्या प्रिय भारत देशातलीच वैशिष्ट्य सांगतोय बरं का !

भारतात पीसीओडीचे थैमान आत्ता वीस पंचवीस वर्षातील. पण पाश्चात्य देशात हा आजार त्यांच्या यांत्रिक (सेडेंटरी) जीवनशैलीमुळे चाळीस पन्नास वर्षे तरी जुना असावा.

हा आजार भारतातून हद्दपार करणे, आपल्याला शक्य आहे, कारण त्यांचे निदान हेतू आपणाला आयुर्वेदानुसार शोधता येतील, माहिती आहेत.

गाडी जर चुकीच्या रस्त्याने गेली तर तसंच आणखी पुढे जायचं का ? ज्या रस्त्याचं भविष्य आपणाला माहितीच नाही. तिथून परत मागे फिरणे योग्य नाही का ?

हेतु सेवन बंद झाल्याशिवाय कायमचा संप्राप्तीभंग कसा होईल ? नाहीतर कायमच्या घ्याव्या लागणाऱ्या व्याधींच्या यादीत आणखी एक नाव अॅड होईल.
बघा विचार करून..

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग.

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..