नवीन लेखन...

नमस्कार

 

नमस्कार करणं याला भारतीय संस्कृतीमध्ये प्रदीर्घ परंपरा आहे. नमस्काराचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि तेवढेच अर्थही. लहानपणी वडिलांकडे सातत्यानं माणसांचा राबता असायचा. दृष्टिभेट होताच सहजपणे ओठावर यायचं रामराम. अभिवादनाचा आणखी एक आविष्कार. मी लहान होतो; पण वडिलांकडे येणारी मंडळी मलाही म्हणायची रामराम. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून रामराम म्हणायला हवं; पण त्याचा सराव नव्हता. अनेक वेळा त्यावरनं बोलणीही खाल्ली आहेत. हाय, हॅलो, गुडमॉर्निंग यापेक्षा आजही नमस्कार म्हणणं मला जवळचं वाटतं. जपानला गेलो तेव्हा अभिवादनाच्या त्यांच्या पद्धतीनं भारावून गेलो होतो. किमान तीन वेळा कमरेत वाकून होणारा तो नमस्कार मला सांगायचा तुझं स्वागत असो, हृदयापासून स्वागत असो. कारण लवणारी मान आणि छातीशी जाणारा हात यालाही विशेष अर्थ होता. मी बुद्धीच्या बळावर नव्हे किंवा बुद्धीनं तोलून-मापून तुझं स्वागत करीत नाहीये. ते मी नम्र ठेवलंय आणि छातीवरचा माझा हात सांगतोय की हृदयाच्या तळापासून मी तुझं स्वागत करतो. एखाद्या कृतीची आपल्याला एवढी सवय होते, की त्या कृतीमागच्या भावना अनेक वेळा पोहोचतही नाहीत. जपानी अभिवादनाचा अर्थ कळल्यावर नकळत आपणही नम्र होतो. नमस्कारावरनं आठवली एक आठवण. त्या वेळी मी पुण्यातल्या हॅपी कॉलनीत राहत असे. तळमजल्यावर घर होत, अंगण होतं. आमच्या घरात एक बाई येत असत. घरकाम हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा मार्ग. बाई असतील चाळिशीच्या. त्या वेळी जवळपास माझ्याच वयाच्या. नऊवारी लुगडं, केसांचा घट्ट अंबाडा आणि कपाळावर ठसठशीत कुंकू. अतिशय स्वच्छ अशा या बाई कामातही तरबेज होत्या. घर स्वच्छ राखण्यातही आनंद आहे, असं मानून त्या काम करीत. आमची भेट फारशी होत नसे. झाली तर संवाद नसे; पण काही दिवस असे असत की त्या बाई माझ्यासाठी थांबत. काम आवरलेलं असलं तरी थांबत. मी आलो की त्या माझ्या पत्नीला बोलावून घेत.

दोघांना उभं करीत आणि मग आमच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करीत. मी त्यांना म्हणायचोही, मी काही खूप मोठा नाहीये. हा नमस्कार विचित्र वाटतो. त्या म्हणत, `आज एकादशी आहे. लक्ष्मी-नारायणाचं, विठ्ठल-रखुमाईचं दर्शन नको का घ्यायला. तुमच्या रूपानं तोच आशीर्वाद देतो.’ बाईंच्या पहिल्या नमस्काराच्या वेळी मी संकोचलो होतो. सारं शरीर आक्रसून घ्यावं की काय, असं वाटत होतं; पण पुढच्या वेळेला तसं झालं नाही. त्या वाकायच्या, माझ्या पायावर त्यांचं कपाळ असायचं अन् स्वाभाविक म्हणून मीही वाकायचो. हात त्यांच्या खांद्यावर जायचे. त्या उभ्या राहत त्या वेळी माझे हात जोडलेले असायचे, डोळे बंद असायचे. तो क्षणभर तरी तिच्या मनानतल्या विठ्ठलाचा मी विचार करायचो. वाकणं, नम्र होणं, नतमस्तक होणं याचा काय आणि कसा परिणाम होतो, हे मी त्या वेळी अनुभवत असायचो. नतमस्तक त्या होत असत आणि मीही. नमस्काराचा आनंद काय असतो ते कळायला लागलं होतं. आपण अनेक वेळा डोक्याजवळ हात नेऊन उडता नमस्कार करतो. त्याची प्रतिक्रियाही तशीच असते. रस्त्यानं जाताना दिसलेल्या किंवा न दिसलेल्या देवाला असा अनेक वेळा मी नमस्कार केला असेल; पण त्यातली व्यर्थता जाणवली ती या अशा नतमस्तक होण्यानं. पत्रकारितेत असल्याचे जसे काही लाभ असतात तसेच तोटेही. माणसं तुम्हाला आतून बाहेरून कळतात अन् मग एक वाक्य सहजी मनात येतं, `नमस्कार करावेत असे पायच आजकाल आढळत नाहीत.’ मी विचार करतो ज्या वेळी त्या बाईंनी मला नमस्कार केला तेव्हा तिच्या मनात का नाही हा विचार आला? मी तर काही सर्वगुणसंपन्न नव्हतो, नाही. तरीही तिच्या मनात दर्शनासाठीचे पाय योग्य आहेत का, हा प्रश्न आला नाही; कारण बहुधा तिचं मन माझ्यापेक्षा खूपच विशुद्ध असावं. मला नमस्कार करून तिला काय मिळालं याची कल्पना नाही मला; पण त्या नमस्कारानं काही काळ का होईना मी स्वच्छ होत राहिलो. मला वाटतं, नमस्काराचं हे बळ असावं. या घटनेपूर्वी मी घरात आई-वडिलांना नमस्कार करीत नव्हतो असं नव्हे; पण त्या नमस्कारात भावनांपेक्षा औपचारिकता अधिक असायची. एकदा आईच्या पायावर डोकं ठेवलं अन् चमत्कारच अनुभवला. आईच्या डोळ्यांतून अश्रुधारा होत्या आणि माझे डोळेही पाणावले होते. नागपूरला असताना एक जाणवलं, इथं कार्यालयीन कामासाठी येणारा माणूसही अनेक वेळा नतमस्तक होतो. त्याला सावरताना आपणही वाकतोच. माझ्यातला मी, माझ्यातला अहं क्षणकाळ तरी कमी होतो. यापेक्षा आणखी काय हवंय. परवाच्या इंडियन एक्प्रेसमध्ये ए. आर. रहेमान याची मुलाखत वाचत होतो. त्यानं म्हटलं होतं, `आपण अनेकांना भेटतो; पण त्या प्रत्येक भेटीत त्या माणसाच्या प्रतिमांचा विचार करतो; तो चांगला, वाईट अशी विभागणी करतो.’ असं जज्ज करीत राहिलो, तर माणसावर प्रेम करायला कधी आणि कसा अवधी मिळेल? एका नमस्कारानं मला नम्र व्हायला शिकविलं, प्रेम करायला शिकविलं. तुम्ही कधी कुणाला असा नमस्कार केलाय? तुम्हाला कोणी केलाय? सांगाल तुमचे अनुभव?

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..