नवीन लेखन...

दहशतवादाचे बदलते स्वरुप, एकटे दहशतवादी : गरज तरुणांशी संवाद साधण्याची

दहशतवादाचे स्वरुप अतिवेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाचा आधार घेत दहशतवादाचे जाळे फ़ार वेगाने विस्तारत आहे. तसेच एकट्याने दहशतवादी कृत्ये करण्याचा नवा प्रकार उदयास येत आहे. या प्रकारच्या दहशतवादाचा सामना करणे कठीण असते. त्यामुळे अशा दहशतवाद्यांच्या कारवायांचा पूर्ववेध घेणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची आणि प्रगत गुप्तचर माहितीची मोठी मदत होऊ शकते.

इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन ते भारतामध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दहशतवादी अतिशय हिंसक आहेत आणि एकट्याने काम करतात. याचे सर्वांत पहिले उदाहरण २००७ मध्ये नजरेस आले. ज्यावेळेला बंगलोरच्या डॉक्टर कुटुंबातील एका तरुणाने इंग्लडमध्ये एका रेल्वे स्टेशनवर गाडीचा वापर करुन आत्मघातकी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो त्यामध्ये अर्थातच मारला गेला. २०१४ मध्ये इसिसचा उगम झाल्यानंतर यांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली. तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा वापर करत असल्यामुळे ते भारतामध्ये किंवा जगामध्ये असलेल्या इतर कुठल्याही दहशतवाद्यांशी, त्यांच्या समर्थकाशी आपल्या घरामध्ये बसून संबंध ठेवू शकतात. बॉम्ब स्फोट कसे करायचे, बॉम्ब कसा तयार करायचा अशा प्रकारची माहिती सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या पाठवली जाते. हल्ल्याचे प्लॅनिंग हे इंटरनेटच्या माध्यमातूनच केले जाते. इंटरनेटची व्याप्ती प्रचंड असल्यामुळे फार मोठ्या संख्येमध्ये सगळ्यांशी संबंध ठेवता येतो. आपल्या कोणी पकडू नये म्हणून आपले इंटरनेटवरिल अकौंट बदलले जातात. इमेलचा पासवर्ड बदली केला जातो. वेगवेगळ्या नावांनी फेसबुकवर अकौंट उघडले जातात. बहुतेक अकौंट हे तात्पुरते उघडले जातात. काही दिवसांसाठीच त्याचा वापर केला जातो आणि लगेच त्याला बंद केले जाते. यामुळे अशा प्रकारच्या कोट्यवधी अकौंटवर लक्ष ठेवणे हे कठिण आहे. अशा प्रकारचे दहशतवादी आपल्या सुरक्षा व्यवस्थेच्या अनेक पाऊले पुढे असतात. या सगळ्यांचा सामना करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञानाची व्याप्ती ही एक पाऊल पुढेच घेऊन जावी लागेल.

गेल्या काही महिन्यांमध्ये पकडल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे पाहिल्यावर असे लक्षात येते की, हे तरुण साक्षरच नव्हे तर सुशिक्षित आहेत, तंत्रज्ञानवर त्यांची पकड आहे, चांगल्या पदांवर नोकरी करत आहेत, त्यांची मिळकतही चांगली आहे; पण तरीही ते दहशतवादाकडे वळत आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सोशल मीडियाच्या माध्यमातून या सुशिक्षित तरुणांना भडकावले जात आहे. धर्माच्या नावावर त्यांच्यात विद्वेष पसरवला जात आहे.

फ्रिलान्स जिहादी अथवा एकटे दहशतवादी
दहशतवादाचा आणखी एक नविन प्रकार पाहायला मिळत आहे, तो म्हणजे एकलकोंडे किंवा एकटे काम करणारे दहशतवादी अथवा दहशतवादी संघटनांशी संबंध नसणारे दहशतवादी. इंटरनेटवर किंवा वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांना बळी पडून काही तरुण अशा प्रकारचे एकटे जिहादी दहशतवादी बनलेले दिसतात. कोणत्याही संघटनेमध्ये सामील व्हायचे नाही, एकट्यानेच काम करायचे आणि एकट्यानेच समाजाचा बदला घेण्याचा प्रयत्न करायचा अशी यांची कार्यपद्धती आहे. अशा प्रकारच्या दहशतवाद्यांना पकडणे हे कठीण काम असते. एखाद्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अधिक जण सामील असतील तर त्यांना पकडणे वा त्यांचा शोध घेणे सोपे जाते. याचे कारण यापैकी एक दहशतवादी जरी पकडला गेला की इतरांबाबतची माहिती काढून घेता येते. पण दहशतवादी एकटाच असेल तर अर्थातच त्याला पकडल्याशिवाय नेमके काय झाले, का हल्ला केला, काय मागण्या आहेत याबाबतचा पत्ता लागत नाही. म्हणून अशा प्रकारच्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ,ह्यूमन इंटिलिजन्स वा तंत्रज्ञानाच्या मदतीने यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

असे दहशतवादी इंटरनेट अथवा वर्तमानपत्र, मासिके यांच्या माध्यमातून जिहादाविषयीची माहिती मिळवतात.त्यांचे मतपरिवर्तन होते. मग एखादा दहशतवादाचा पुरस्कर्ता अथवा गुरु मतपरिवर्तन झालेल्या युवकांशी संपर्क साधून त्यांना आणखी प्रोत्साहित करण्याचा वा चिथावणी देण्याचा प्रयत्न करतो. यानंतर तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांमध्ये पाठवले जाते. तेथे त्यांना शस्रास्रांबाबत, हल्ल्यांबाबत, प्रत्यक्ष दहशतवादी कारवायांबाबत प्रशिक्षण दिले जाते. असे प्रशिक्षण कॅम्प भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा इतर देशांमध्ये असू शकतात. सर्वांत महत्त्वाचे हा एकटाच दहशतवादी बॉम्बस्फोट कधी आणि केव्हा करायचे हे स्व:त ठरवतो. यापूर्वी दहशतवादी हल्ला होण्यापूर्वी दहशतवाद्यांना पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयकडून टार्गेट सांगितले जात होते. धोका असूनही त्यांना पकडणे कठीण होऊन बसते. अशी काही उदाहरणे समोर आहेत. एक म्हणजे मेहेंदी मसरुल विश्वास हा इसिस या संघटनेसाठी ट्विटर अकौंट हाताळण्याचे काम करत होता; तो एकांडा शिलेदार होता.अलीकडेच पोलिसांनी हैद्राबादमधून इसिसमध्ये सामील होण्यासाठी जाणार्या शोहीब अहमद खान आणि शहा मुझफ्फर यांना पकडले. ते एकटेच काम करत होते.

सीसीटीव्ही, लॅपटॉप, सॉफ्टवेअरच्या मदतीने दहशतवादी पकडा
आपल्याला विकसित, अत्याधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचीही गरज भासणार आहे. आज काही देशांकडे(अमेरिका,युरोप) उपयोगी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यानुसार आपण पकडू न शकलेल्या एखाद्या दहशतवाद्याचा फोटो उपलब्ध असेल, तर त्या फोटोच्या मदतीने हा दहशतवादी शोध मोहिमेच्या दौरान पकडला जाऊ शकतो.यासाठी हा फोटो संगणकावर घेऊन, सीसी टीव्हीच्या कॅमेर्याद्वारे दिसणार्या फुटेजमधून अचूकपणाने त्याचा शोध घेता येतो. यासाठी एका सॉफ्टवेअरची गरज भासते. हे सॉफ्टवेअर सदर फोटोशी मिळतीजुळती व्यक्ती अचूकपणाने सीसीटीव्हीच्या फुटेजमधून हेरते. अशा सॉफाटवेअरमध्ये आपल्या तपास यंत्रणांच्या यादीतील दहशतवादी, दहशतवाद्यांना मदत करणार्या व्यक्ती, माओवादी, बांगलादेशी घुसखोर,आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे फोटो समाविष्ट करून त्यांचा शोध घेता येणे शक्य आहे. गुप्तचर यंत्रणांकडून एखाद्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होणार असल्याची सूचना मिळते तेव्हा त्या परिसरात व इतरत्र सर्व वाहनांची तपासणी केली जाते. अशा वेळी एक सीसीटीव्ही कॅमेरा आणि एक लॅपटॉप यांच्या मदतीने या वाहनांमध्ये जर दहशतवादी आढळला तर त्याबाबत तात्काळ संदेश मिळणे शक्य आहे.

अशाच प्रकारे आवाज ओळखणारे तंत्रज्ञानही सध्या उपलब्ध आहे. अनेक वेळा दहशतवादी माध्यमांमधील काही प्रतिनिधींना अथवा कार्यालयामध्ये फोन करून काही माहिती सांगण्याचा, धमक्या देण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या आवाजाचा नमुना आपल्याकडे असेल तर त्याच्याशी फोनवरील आवाजाची पडताळणी करून तो आवाज नेमका कोणत्या दहशतवाद्याचा आहे हे समजणे शक्य आहे.

इंटरनेट कंपन्यांना भारतात सरव्हर प्रस्थापित करण्याची सक्ती करा
आपल्या देशाची आर्थिक शक्तीचा वापर करून गुगल आणि इतर इंटरनेट कंपन्यांवर त्यांचे सव्र्हर्स हे भारतात ठेवण्याबाबत दबाव आणण्याची गरज आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याचा मोठा फायदा आहे. याचे कारण सोशलमीडियावर जर एखाद्याने चुकीची माहिती वा धार्मिक द्वेष निर्माण करणारी माहिती अपलोड केल्यास, ते भारतातील कोणत्या भागातून करण्यात आले आहे हे तात्काळ समजू शकणार आहे. त्यातून त्या व्यक्तीला तात्काळ पकडणे शक्य होईल.

गुप्तचर माहितीची देवाणघेवाण वाढवा
दहशतवादाला प्रतिबंध करण्यासाठी भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या सीआयए आणि रॉ या गुप्तचर संस्थांमध्ये गुप्तचर माहितीची देवाणघेवाण संस्थात्मक पातळीवर होणार आहे. सध्या अशी माहिती अमेरिका केवळ युरोपमधल्या काही देशांशी तसेच इस्त्राईलशी आदानप्रदान करते आहे.
दहशतवादी ईमेल, एसएमएस किंवा पत्रांच्या माध्यमातून काही संदेश पाठवतात, संवाद साधतात. ते पूर्णपणे कोड करुन अथवा सांकेतिक भाषांमध्ये पाठवले जातात. अशा प्रकारचे कोडवर्डचे जर डिकोड करता आले, सांकेतिक शब्दांमधील संदेश शोधता आला तर दहशतवाद्यांचा, त्यांना मदत करणार्या व्यक्तींचा ठावठिकाणा समजणे, तसेच त्यांच्या भविष्यातील हल्ल्यांसदर्भातील योजनांची माहिती मिळणे शक्य होते. याबाबतचे तंत्रज्ञानही अमेरिकेकडे उपलब्ध आहे. तेही आपल्याला मिळण्याची शक्यता आहे.

महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून कट्टरवादाची पाळेमुळे नष्ट करण्याचा, तरुणांमध्ये देशभक्तीचा जागर घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये आपल्याला दहशतवादी युवकांच्या कुटुंबियांचा, समाजसेवी संस्थांचा, सुरक्षा यंत्रणांचा आणि समाजातील अभ्यासकांचा-विचारवंतांचा आधार घ्यावा लागेल.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..