नवीन लेखन...

जेष्ठ संगीतकार जयदेव

जयदेव यांचा जन्म ३ आॅगस्ट १९१९ रोजी झाला. काही गाणी पहिल्या भेटीत फक्त कुतूहल निर्माण करतात.. तर काही स्लो पॉयझनिंगसारखी आपल्यात भिनत जातात. काही त्यातल्या चमत्कृतीपूर्णतेनं आपले लक्ष वेधून घेतात. तर काही आपल्या माधुर्याने गारूड करतात. अशा काही गाण्यांबद्दल आणि त्यांच्या संगीतकारांबद्दल.. त्यांतले पहिले मानाचे पान जाते ते संगीतकार जयदेव यांना!

‘ये दिल और उनकी निगाहोंके साए’, ‘मैं जिंदगी का साथ’, ‘अभी न जाओ छोडम्कर’ यांसारखी सुरेख गाणी देणारे जयदेव एक अत्यंत प्रयोगशील संगीतकार. मा.जयदेव यांचा लुधियानात बालपण आणि मुंबईत कारकीर्द असा प्रवास असणाऱ्या जयदेव यांनी चित्रपटांत अभिनय करण्यापासून कारकिर्दीला सुरुवात केली. ‘वामन अवतार’, ‘काला गुलाब’ यांसारख्या चित्रपटांत काम केल्यावर ते उस्ताद अली अकबरखाँ साहेबांकडे सरोद शिकले. ‘आँधियाँ’, ‘हमसफर’ यांसारख्या खाँ साहेबांचं संगीत असलेल्या चित्रपटांसाठी संगीत साहाय्यकाचीही त्यांनी भूमिका निभावली. दरम्यान, सचिनदेव बर्मनदादांनाही ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘कालापानी’ यांसारख्या चित्रपटांच्या संगीतात सहाय्य केलं. जयदेव यांचं उर्दू-हिंदी काव्याचं ज्ञान, अनवट संगीतरचना श्रवणीय करण्याचं कसब बर्मनदा जाणून होते आणि ही जबाबदारी म्हणूनच त्यांच्यावर सोपवीत होते. (‘कालापानी’) ही रचना खरंतर जयदेव यांची.

गायकीला वाव देणाऱ्या अनवट जागा (phrases) आपल्या गाण्यात गुंफणारे, गीताचा ढाचा (Structure) मुळापासून बदलू शकणारे जे अत्यंत मोजके संगीतकार झाले, त्यात जयदेव यांची गणना करावी लागेल. नव्हे, त्यांचे स्थान मानाचे असेल. यासाठी लागणारी प्रतिभा, काळाच्या पुढे असणारी नजर आणि सौंदर्यदृष्टी पुरेपूर होती. त्यांच्याकडे नशिबाची साथ नसेल कदाचित (नव्हतीच), पण प्रतिभेने साथ सोडली नाही. अनेक संगीतकारांचा सृजनाचा आलेख हा पुढे ओसरता उतार दाखवतो, पण एस. डी.नंतर जयदेव हे असे एकमेव संगीतकार म्हणावे लागतील की, शेवटच्या चित्रपटापर्यंत (‘अनकही’) गाण्यांचा दर्जा आणि जयदेव टच कायम होता. मानवी भावसंबंध, नात्यातली गुंतागुंत, स्वभावातले कंगोरे, काळ्या-पांढऱ्या रंगांत रंगवणं जसं कर्मकठीण, तसेच हे सगळं सुरावटीत बांधणं किती अवघड असेल. मग झाली चाल अवघड त्याला काय करणार? म्हणूनच बर्मन सल्ला देत बहुतेक की, थोडी सोपी चाल बांध! जयदेव यांच्या चाली नेहमीच वेगळ्या अर्थानी आव्हानात्मक होत्या.. जिथे जिथे त्या सोप्या करता येऊ शकल्या असत्या असं वाटतं, तिथे हा मोह टाळलेला आहे. आपल्या गळ्यातून त्या जागा अलवारपणे जाव्या याचा ध्यास लागतो, असं काही विलक्षण या चालींमध्ये आहे. पाहा ना, ‘प्रभु तेरो नाम’ (‘हम दोनो’) सारखं गाणं, पुढच्या ओळीत- ‘तेरी कृपा हो जाए’- या शब्दांना दोन वेगळ्या चाली का? याला उत्तर नाही.

अंतऱ्यात ‘हर बिगडी बन जाए’मध्ये जाऽऽए वरची तान मोत्याची लड ओघळावी, तसे अनवट स्वरसमूह घेऊन येते. केवळ अप्रतिम! या प्रकारची त्यांची कितीतरी गाणी- ‘कभी खुदपे, कभी हालात पे’ या गाण्यात या ओळीलासुद्धा लगेचच वेगळ्या चालीत गुंफले आहे. शास्त्रीय संगीतातल्या improvisation (बढत) या सौंदर्यतत्त्वाचा हा किती सुंदर आविष्कार! जयदेवजींच्या गाण्यांतल्या, मुरक्या किंवा खास (phrases) हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय. काही जागा खास गायकी अंगाच्या! गमक, मींड, फिरत अशा गाणाऱ्याला स्वत:ची सारी आयुधं परजायला लावणाऱ्या जागा. किंबहुना ही आयुधं परजल्याशिवाय जयदेव यांच्या गाण्यांना हात (गळा) लावूच नये!

कितीतरी उदाहरणं ‘ये दिल और उनकी’मध्ये ‘उनकी’वरची जागा, ‘हर आस अश्कबार हैं’मध्ये ‘तेरे बगैर जिन्दगी’वरची जागा, ‘आपकी याद आती रही’मध्ये ‘आपकी’वरची मोहक करामत..

गाणं एका विशिष्ट तालात चाललेलं असतं. दादरा-केरवा आणि मध्येच एखादी ओळ त्या तालाच्या कचाटय़ातून पूर्णपणे सुटून पुन्हा, त्याच्या कवेत अलगदपणे विसावते. हे अप्रतिमच! अत्यंत कमी काळासाठी तालापासून घेतलेली ही फारकत इतकी गोड की पुन:पुन्हा गाण्याचा मोह पडावा. एखादी वेडी-वाकडी उडी मारून जिम्नॅस्टने दोन पायांवर नीट उभं राहावं, अगदी तसंच ‘तुम्हे हो ना हो’ (‘घरोंदा’)मध्ये अशी एक ओळ येते. ‘मगर फिर भी इस बात का तो यकीन है’- ‘तू चंदा मैं चाँदनी’ या गाण्यातही ‘अपने हाथों से पिया मोहे लाल चुनर ओढा’हीसुद्धा अशीच कसरत- लाजबाब.. जयदेव यांचं ‘गंधार’ स्वरावरचं विलक्षण प्रेम कधी कधी अवचित समोर येतं. कित्येक गाणी गंधाराचं प्राबल्य मुखडय़ात घेऊनच येतात. तो गंधार एखाद्या guiding star सारखा समोर येत राहतो. लुभावत राहतो. ‘आपकी याद आती रही’, ‘अल्ला तेरो नाम’, ‘सीने में जलन’ अशी कितीतरी गाणी.

गौडसारंग (‘अल्ला तेरो नाम’), धानी (‘रात भी हैं कुछ’), पहाडी (‘ये दिल और उनका’), तिलक कामोद (‘ये नीर कहाँ से बरसे हैं’), माँड (‘तू चंदा मैं चाँदनी’) असे राग भारदस्तपणे जयदेवजींच्या गाण्यांत डोकावतात, पण गाण्यांवरचा जयदेव ठसा हाच खरा त्या गाण्यांचा स्थायीभाव आहे.

काही काही स्वरसमूह जयदेवचे लाडके होते आणि विशिष्ट सेन्सुअस गाणी असली की हमखास हे स्वरांचं मोहोळ रंग जमवतं. दोन मध्यम आणि कोमल गंधाराचं हे अफलातून कॉम्बिनेशन ‘रात भी हैं कुछ, प्यास थी फिर भी तकाजा न किया’ (‘आलिंगन’), ‘जब से लगन लगायी’ (‘रेश्मा और शेरा’) या गाण्यात जादुई प्रभाव करते.

सुनील दत्तची कामुक नजर, वहिदाचं अप्रतिम सौंदर्य आणि हा स्वरसमूह यांचा एकत्रित परिणाम म्हणजे रोमांचकारी अनुभव आहे. ‘रात भी हैं कुछ भीगी भीगी’ हा स्वरसमूह दत्ता डावजेकरांच्या ‘चांदणे फुलले माझ्या मनी’ या गाण्यातही आढळतो. डीडी आणि जयदेव हे असोसिएशन होतंच नाही. तरी गाण्यांचा पोत, त्यांचा भाव, visualisation power गाणं प्रत्यक्ष पडद्यावर न पाहता निर्माण होणारं दृष्टिचित्र याबाबतीत या दोन प्रतिभावंतांमध्ये साधम्र्य आढळतं.
गाण्याच्या बंदिस्त चौकटीत मन न रमणाऱ्यांपैकी जयदेव असल्याने अनेकदा अंतरे, मुखडा यांच्या रचनेत वेगळ्याच कल्पना साकार होतात. पहिला अंतरा सप्तकाच्या खालच्या भागात lower middle बांधणं (जे जोखमीचं ठरू शकतं) ही अशीच एक धाडसी शैली. धाडसी अशासाठी की ऐकणाऱ्याचं लक्ष गाण्यावरून उडण्याची भीती अशा वेळी असते. जयदेव यांच्या समकालीन संगीतकारांमध्ये उंच पट्टीत मुखडे-अंतरे बांधण्याची लाट येत असताना हे धाडसच.
‘पहाडों की चंचल किरन चूमती है’ (‘ये दिल और उनकी’), ‘अभी अभी तो आई हो’ (‘अभी न जाओ छोडकर’), ‘इन भूलभुलैया गलियों में’ (‘दो दिवाने शहर में’), ‘संस्कृती के विस्तृत सागर में’ (‘कोई गाता मैं सो जाता’).

जयदेवजींच्या गाण्यांत अंतऱ्याची शेवटची ओळ मुखडय़ाला अशा अजोड, अतूट धाग्याने विणलेली असते की तो ‘जोड’ खटकू नये. ही काही गाणी जयदेव साहेबांची
‘अस्मानी, या आसमानी!
अस्मानी रंग की आँखों में
बसने का बहाना ढूँढते हैं- ढूँढते है।
आबोदाना, ढूँढते है, इक आशियाना ढूँढते है’ (‘दो दिवाने’)- (‘घरोंदा’).
‘कोई मेरा सिर गोदी में रख सहलाता – मैं सो जाता- कोई गाता मैं सो जाता’ (‘आलाप’).

सगळं कसं सलग-अव्याहत. अंतऱ्यातून मुखडय़ावर आलो कसे अलगदपणे- कळणारही नाही. वाद्यवृंदाचा orchestration वापर जयदेवजींनी अगदी नेमका केल्याचं आढळतं. जयदेव यांचे निधन ६ जानेवारी १९८७ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / लोकसत्ता

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..