नवीन लेखन...

गुळाची ढेप

आई सकाळीच म्हणाली, “चला चला बब्बड,लवकर लवकर आवरा. आज आपल्याला किनई वजन करायला जायचं आहे………………”
आई आणखी पण पुढे खूप काही बोलली. पण नेमकी त्याचवेळी कुकरची शिटी इतकी जोरात वाजली, की आईचं बोलणं मला ऐकूच आलं नाही.
मला कळेना “वजन करायचं म्हणजे नक्की काय करायचं?”
ऑफिसला जाताजाता बाबा धावत-धावत आले आणि म्हणाले,’कशाला हवंय वजन नी भजन? मी सांगतो,ही सहा किलोची ढेप आहे ढेप! गोड-गोड गुळाची ढेप!!
माझा गालगुच्चा घेत बाबा पुढे म्हणाले, आता भजन-वजन करतो,गोड गूळ खाऊन बघतो.”
माझी पापी घेत बाबा म्हणाले,“अं: व्वा! व्वाऽऽऽव्वा!! फारच छान!!!…”
“उशीर होतोऽऽऽय..” असा आईचा आवाज ऐकताच,बाबा पळाले.
पळता-पळता म्हणाले,“संध्याकाळी घरी आल्यावर,मी बब्बडचे हज्जार पापे घेणार आहे हज्जार!! बाय् बाय् बब्बड.”
मग मला कडेवर घेऊन आई गॅलरीत उभी राहिली. माझा हात हातात घेऊन तिने आणि मी बाबांना टाटा केलं.

बरं झालं.आता तरी मला समजलं,“वजन करायचं म्हणजे काय करायचं?”
(अंऽऽ तुम्हाला कळलं की नाही? काय म्हणता? नाही कळलं? कमालच आहे तुमची! अहो माझे बाबा एखादी कठीण गोष्ट इतकी सोपी करून सांगतात की लगेचच समजतं हो)
हं तर,वजन करायचं म्हणजे,“ज्याचं वजन करायचं त्याचं आधी भजन करायचं. मग त्याचा एक गालगुच्चा घ्यायचा आणि म्हणायचं,“गोड गूळ खाऊन बघतो हंठ नंतर त्याची पापी घ्यायची व म्हणायचं,“वाऽऽऽऽऽऽऽऽ व्वा! फारच छान!!”

आई जेव्हा म्हणाली,“चला बब्बड,डॉक्टरांकडे वजन करायलाठ तेव्हा मी खुदकन हसले. कारण डॉक्टर काय करणार ते मला माहितच होतं. पण…. पण….हे मला महित आहे,हे काही आईला माहित नव्हतं.
आम्ही निघालो वजन करायला. रस्यात भेटली आजी.
आजी म्हणाली आईला,“अगं,बब्बडचं वजन करताना,ते तिच्या अंगावरचं दुपटं काढून घ्यायला विसरू नकोस हं. बाय् बबडू.”
अरे व्वा! मला आणखी एक नवीन गोष्ट कळली. म्हणजे,“ज्याचं वजन करायचं आहे, त्याने जर काही कपडे पांघरले असतील तर ते लगेच काढून टाकायचे!’
मी मनातल्या मनात आजीला म्हणाले,“अगं आजी तू अजिबात काळजी करू नकोस. सकाळ ऑफीसला जाताना,तुझ्या शहाण्या मुलाने मला सगळं नीट समजावून सांगितलंय बरं!”
आम्ही दवाखान्यात पोहोचलो.

दवाखान्यात खूपच गर्दी. इटुकल्या-पिटुकल्या बाळांची; छोट्या-छोट्या मुलांची आणि त्यांच्या मोठ्या-मोठ्या आयांची. सगळीकडे गडबड-बडबड व बडबड गोंधळ!
म्हणजे आम्ही लहान मुले शांतच होतो,पण ह्या सगळ्या आया मात्र आपापसात नॉनस्टॉप बडबडत होत्या.
मी आईच्या खांद्यावर डोकं ठेवून पडले होते. ही सगळी गडबड बडबड लांबून पाहताना मला मजा वाटत होती. आमचा नंबर यायला अवकाश होता. मी दुपट्यातल्या दुपट्यात मस्त आळस दिला.
इतक्यात एक जाडजूड अब्दूल-गब्दूल काका धावत पळत दवाखान्यात आले. फास-फूस धापा टाकत माझ्या बाजूला बसले. मी हसले. त्यांनी टिप-टिप डोळे मिचकावले.
अब्दूल-गब्दूल काकांकडे पाहात डॉक्टर म्हणाले,“अहो काय हे वजन? आत जा आणि काट्यावर उभे राहा पाहू!”
अब्दूल-गब्दूल काका “हॅहॅहॅहॅहॅहॅऽऽ” करुन हसले. हसताना त्यांचे उशी एव्हढे पोट दुडूदुडू हलले. मग ते सावकाश खाली वाकले आणि पायातले बूट काढू लागले!
मी मनात म्हंटलं, “हे काका जरा विचित्रच दिसताहेत. अहो,पायात काटे जाऊ नयेत म्हणून लोकं बूट घालतात. पण हे काका,काट्यावर उभं राहायचं असेल तर बूट काढतात! कमालच आहे!! उद्या हे आंघोळसुध्दा कपडे घालून करतील आणि झोपताना चष्मा लावतील!
अब्दूल-गब्दूल काकांच्या पाठोपाठ डॉक्टर पण आत गेले. आम्हाला दिसू नये म्हणून त्यांनी दरवाजा अर्धवट बंद केला.
पण मला माहितच होतं,आता काय होणार…….
“अब्दूल-गब्दूक काका वजन करणार म्हणजे……..आधी डॉक्टर त्यांच भजन करणार.
मग डॉक्टर अब्दूल-गब्दूल काकांचा गालगुच्चा घेणार आणि म्हणणार,“गोड गोड गूळ खाऊन बघतो हं!’
नंतर काकांची पापी घेत म्हणणार,“व्वा! ही तर गुळाची ढेप आहे! गोड गुळाची ढेप!”
अय्या! एक सांगायचं विसरले की,“सगळ्यात आधी,अब्दूल-गब्दूल काका,त्यांनी पांघरलेले कपडे पटापट काढून ठेवणार!!”
मी असा विचार करते आहे, तोच काका बाहेर आले.
मला वाटलं, काट्यावर उभं राहावं लागलं म्हणून,काका आता लंगडतील. पणकसंच काय? काका टुण-टुण उड्या मारतच आले! पाठोपाठ डॉक्टर.
डॉक्टर त्यांना म्हणाले,“अहो वजन कमी करा.व्यायाम करा.”
मी मनात म्हणाले,“आमच्या पारवतीबाईंनी जर ह्या अब्दूल-गब्दूल काकांना रोज तेल चोळून आंघोळ घातली तर हे पोळपाटाएव्हढे काका,लाटण्या सारखे होतील!! हँऽ! पण आम्ही लहान मुलांनी सांगितलेलं मोठ्या माणसांना कळलं तर ना?”
इतक्यात माझ्या बाजूच्या मुलाला डॉक्टरांनी बोलावलं व म्हणाले,“चला,ह्याला इथेच काट्यावर ठेवा.”
बापरे!! मी तर घाबरलेच! इतक्या लहान मुलांना काट्यावर? हे डॉक्टर आहेत की हिरण्यकश्यपू?

मी घाबरून किंचाळलेच!
माझ्या किंचाळण्याने “तो मुलगा” दचकला! चमकून माझ्याकडे पाहू लागला.
मी काही बोलण्या आधीच,त्या मुलाच्या आईने त्याचं दुपटं काढलं.
मी मनात म्हंटलं, “चला,आता भजनाला सुरुवात होईल. तोच, त्याच्या आईने त्याला एका प्लॅस्टीकच्या ट्रे मधे ठेवलं.
पण डॉक्टरांनी भजन केलंच नाही.
त्याचा गालगुच्चा घेतलाच नाही.
त्यांनी गूळ खाल्लाच नाही.
त्यांनी पापी घेतलीच नाही.
तरीपण डॉक्टर म्हणाले,’व्वा! पाच किलो चारशे.”

माझा फार गोंधळ झाला. मला कळेना. बाबा सांगतात एक. आणि हे डॉक्टर करतात दुसरंच!! आता हे डॉक्टर,लहान मुलांना प्लॅस्टीकच्या ट्रे मधे ठेवतात; म्हणजे मोठ्या माणसांना पिंपातच ठेवत असणार की!
कुणाचं खरं? काय करावं? कुणाचं ऐकावं? की पाहावं-पाहावं अन् झोपूनच जावं? मी विचार करत होते.खंाद्यावर मान टाकून इकडे-तिकडे पाहात होते.
आमचा नंबर आला.
भजनाशिवाय वजन झाले.
डॉक्टर म्हणाले, “व्वा! बरोब्बर सहा किलो!!”
आणि…….
मला खूप खूप खूप आनंद झाला!!
मी आनंदाने हात पाय झाडले. फुर्र फुर्र करुन फुकी उडवली. पुचूक पुचूक करुन थुकीचे बुडबुडे काढले. डोळे मिचकावले. जिभा काढल्या. आनंदाने आईचे हात घट्ट धरले,कारण….
बाबांनी काट्याशिवाय केलेलं वजन अगदी बरोब्बर होतं हो!
मला आठवलं….
परवा बाबा मला म्हणाले होते,“बब्बड मी तुला चांगलं ओळखतो. अगं तुझं वजन मोजता येईल पण ह्या गुळाच्या ढेपेची गोडी नाही हो मोजता येणार!! पण, तुझ्या सगळ्या-सगळ्या गोष्टी मला ठाऊक आहेत बरं.”
पण…पण..माझं वजनसुध्दा बाबांना ठाऊक असेल,हे मला माहित नव्हतं.
हे सगळं कधी एकदा बाबांना सांगते. त्यांच्या कुशीत शिरते. त्यांच्या खरबरीत गालाची पापी घेते,असं मला झालं होतं.
माझी चुळबूळ सुरु होताच, आईने मला हळूवार थोपटलं, अलगद कुशीत घेतलं.
माझ्या मनातलं ओळखून आई हळूच म्हणाली, “बाबांची आठवण आली का ग बब्बड?”
हे ऐकताच माझे डोळे पाणावले. मी आईच्या कुशीत आहे की बाबांच्या? हे क्षणभर मला कळेचना.
खरंच, प्रेमाला, मायेला वजनासारखं मोजता येत नाही, हे मला त्या दिवशी कळलं!!

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..