नवीन लेखन...

ओवाळूं आरती : भाग – ५/५

भाग – ५

आधुनिक काळात पारंपरिक आरत्या लिहिल्या जातातच, पण इतरही अनेक, भिन्नभिन्न वर्ण्यविषयांवर रचल्या जातात. जसें, शिवरायांसारख्या महापुरुषांवर, ( जसें ‘आरती शिवराया’, ही मी लिहिलेली आरती ). हल्ली, ज्यांना VIPs म्हणतात, अशा व्यक्तींवरही  आरत्या लिहिल्या जातात. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुर (टागोर) यांचें ‘जनगणमन’ ही एकप्रकारें आरतीच आहे. तें मूळ काव्य तत्कालीन ब्रिटिश राजपुत्र पंचम जॉर्ज याच्या भारतभेटीच्या वेळीं , म्हणजे विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळात, लिहिलें गेलेलें आहे. त्याच्या प्रथम पंक्तीचे मूळ शब्द आहेत : ‘जनगणमन-अधिनायक जय हे भारतभाग्यविधाता’ , हा जनगणमनाचा अधिनायक , हा भारताचा भाग्यविधाता म्हणजे पंचम जॉर्जच. बर्‍याच नंतर, त्या रचनेच्या प्रथम पंक्तीत, शब्द न बदलतां, केवळ थोडासा अन्य बदल करून, अर्थबदल केला गेला, व त्यामुळे त्या रचनेचा वर्ण्यविषय  ‘भारतवर्ष’ हा बनवलला गेला ; आणि तिचें प्रथम कडवें हें आपलें राष्ट्रगीत बनलें. ती पहिली पंक्ती आतां अशी आहे, ‘ जनगणमनअधिनायक जय हे भारत  भाग्यविधाता’. (‘भारतभाग्य-विधाता’ व ‘भारत  भाग्यविधाता’ या दोन शब्दांमधील फरक कृपया ध्यानात घ्यावा). म्हणजेच, आतांच्या संदर्भाप्रमाणें , हा जनगणमन-अधिनायक, हा भाग्यविधाता म्हणजेच आपला ‘भारतवर्ष’ देश , असा अर्थ होतो. पण, त्या काव्यातील ‘वर्ण्यविषय’ पंचम जॉर्ज असो किंवा भारतवर्ष असो, दोन्हीही आधुनिककालीन आरत्याच आहेत, असें म्हणायला हवें. म्हणूनच, हिच्या अंतर्गत पंक्तीत जयकार आहेच, पण अखेरीस ‘जय हे जय हे जय हे, जय जय जय जय हे’ असा multiple जयजयकार आहे.

आझाद-हिंद फौजेत गाइलें जाणारें गीत ‘सब सुख चैन की बरखा बरसे भारत भाग्य है जागा’ हें, जनगणमन या गीतावरूनच रचलेलें उघडच  दिसतें. ती वंदना जरूर आहे, पण त्याला आरती म्हणता येणार नाहीं . तसेंच, स्वातंत्र्यपूर्व काळात अतिशय प्रसिद्ध असलेले, व स्वातंत्र्यसैनिकांना स्फूर्ती देणारें गीत ‘वदे मारतम्’ हेंही वंदनागीत आहे, त्याला आरती म्हणता येणार नाहीं .

‘गाऊं त्यांना आरती’ , ‘निरांजन पडलें तबकात’ अशी भावगीतें आहेत, त्यांना जरी ‘आरती’ असें अभिधान देतां येत नसलें तरी, ती आरतीशी संबंधित आहेत, हें विशेष. सिनेमातही, ‘मैं तो आरती उतारूँ रे संतोषी माता की’ अशा आरत्या लिहिल्या व वापरल्या जातात. सिनेमातीलच, ‘जहाँ डाल डाल पर सोने की चिड़ाया करती है बसेरा । वो भारत देश है मेरा ।’ ही एकप्रकारें भारताची आरतीच आहे , तिच्यात ‘जय भारती’ असे शब्द वापरलेले आहेत. प्रसिद्ध हिंदी काव्य ‘क्या पूजा क्या अर्चन रे’ यातही पूजा-अर्चा-आरती यांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध आहे. राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांचें ‘भारत-भारती’ हें हिंदी काव्य, आरतीच्या उल्लेखानेंच सुरूं होतें. त्याची पहिली ओळ आहे, ‘मानसभवन में आर्यजन जिस की उतारें आरती’ .

अशा तर्‍हेनें, आपल्याला आरती फक्त देव्हारा-मंदिर-उत्सवमंडपातच नाहीं, तर इतरत्रही दिसते, व त्यावरून, आरत्यांची लोकप्रियता ध्यानात येते.

काव्याला विषय अनेक असतात. आतां, अभंग, भजन, कीर्तन  हें काव्यरूपही वेगवेगळ्या विषयांसाठी वापरलें जात आहे. ‘रिवायती’ (पारंपरिक) गझल ही पूर्वी फक्त ‘महब्बत, इश्क़’ ( प्रीती ) याच्याशी संबंधित विषयांवरच लिहिली जात असे. पण आतां, गझलही वेगवेगळ्या विषयांवर लिहिली जाते.  त्याचप्रमाणें, हल्ली, अन्य अनेक वर्ण्यविषयांवर रचलेल्या आरत्या आतां पहायला मिळतात व मिळत रहातील. त्या प्रकारच्या कांहीं माझ्याही आहेत, जसें की ‘आधुनिक विज्ञाना’वर ( ‘आरती नूतन-विज्ञानाची’), ‘जग सोडून गेलेल्या पत्नी’वरील (‘आरती प्राणप्रियेची’), वगैरे. गणपतीवरही, विज्ञानयुगीन अर्थ लावून, ‘स्पेस्-ट्रॅव्हल्’च्या संदर्भानें वैज्ञानिक-आरती मी लिहिलेली आहे. (‘अंतराळयात्रिकासारखा धारुन गणवेश । व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।’ ). ‘व्यंगकाव्य’ म्हणून कां होईना, पण ‘प्रदूषणा’वरही आरती आहे    (‘जय जय प्रदूषणा’ ). थोडक्यात काय तर, विषय वेगवेगळे, आरतीचा format, बाज तोच. ( इथें, मी काय लिहिलें आहे, हें महत्वाचें नसून, आरतीतील वैविध्याचा उल्लेख करण्यासाठीची ती उदाहरणें दिलेली आहेत, याची नोंद घ्यावी).

उपास्य / आराध्य / वर्ण्यविषय कांहींही असो, पण, आपण आधी बघितलें आहे की आरत्यांची खरी मजा, त्या मोठ्यानें म्हणण्यातच आहे, आणि इतरांबरोबर एकत्र म्हणण्यातच आहे.  एकत्र म्हणण्यानें, घुमणार्‍या नादाचा ( rasonating sound) परिणाम तर होतोच,पण समूहभावनाही ( Unity as a Group ) वाढीला लागते.

वैदिक ऋचाचेंही समूहपठण होतें; तसेच अथर्वशीर्ष, शतचंडी इत्यादी मंत्रांचें-स्तोत्रांचेंही. भजनांचें व प्रार्थनांचेंही पुष्कळदा सामूहिक गान होते. कीर्तनांमधील जयकारही सामुहिक होतो, जसें, ‘जय जय रामकृष्ण हरी’ चा घोष. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, प्रभातफेर्‍यांमध्ये व इतरत्र अशी अनेक समूहगानें होत असत व ती लोकांना स्फूर्ती देत; जसें की, ‘…. साथी गाती एका आवाजात । ध्येयाचें हें गीत घुमवूं अवघ्या अवकाशात ।’ . घोषणांचें तर समूहगर्जनच होतें, उदा, ‘भारतमाता की जयऽ’ ही घोषणा. राष्ट्रगीताचेंही समूहगान होतें.  समूहभावनेतून सामाजिक उत्थान व राष्ट्रप्रेम चेतवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी १८९३ सालीं सार्वजनिक-गणेशोत्सव सुरूं केला. त्यानंतर तर आरत्या अत्याधिक , व एकत्रितपणें ,  म्हटल्या जाऊं लागल्या, त्या अधिकच लोकप्रिय झाल्या, अगदी तरुणांमध्येसुद्धा.

माझ्या लहानपणीं, आम्ही घरीं किंवा गणेशोत्सवादि प्रसंगीं मोठमोठ्यानें आरत्या म्हणत असूं. त्याची मजा औरच होती. गेली बरीच दशकें मला आरती म्हणण्याचा प्रसंग आलेला नाहीं,  मात्र लहानपणीं म्हणून-म्हणून आपोआप पाठ झालेल्या आरत्या मला अजूनही आठवतात, आणि त्या जुन्या काळाची स्मृती तर अजूनही अगदीऽ  ताजी आहे.  माझा एक ५० हून अधिक वर्षें अगदी-जवळचा-मित्र असलेला गृहस्थ त्याच्या बालपणीं मुंबईतल्या गिरगांवात रहात असे. तो सांगतो की, त्या काळीं, गणेशोत्सवात, अगदी  मोऽठ्ठ्याऽनें , स्वर उंचाऽवूऽऽन , आणि लांबवूऽऽन म्हणण्याची, वाढत्या-वयाच्या मुलांमध्ये व तरुणांमध्ये अहमहमिका लागत असे. अजूनही, तें सर्व सांगतांना त्याचा स्वर हळवा होतो, तें स्मरणरंजन (nostalgia) त्याला आनंदी करतें.

अखेरीस   :   एक गोष्ट नक्की. ती ही की, आरत्या या श्रद्धेशी संबंधित असल्यानें, जोवर मानव-मनात श्रद्धा कायम राहील, तोंवर आरत्या रचल्या जातील, म्हटल्या जातील, व सश्रद्ध जन त्यांतून आनंद व मन:शांती मिळवत रहातील.

शुभम् भवतु  ।

(समाप्त )

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

सांताक्रुझ (प), मुंबई.  Santacruz (W), Mumbai.

Ph-Res-(022)-26105365.  M – 9869002126

eMail   : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

 

 

 

 

लेखकाचे नाव :
सुभाष स. नाईक
लेखकाचा ई-मेल :
vistainfin@yahoo.co.in
सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..