नवीन लेखन...

एक आठवण / ती

कालचीच गोष्ट, कृषी भवन वरून ती मेट्रोत चढली. क्षणभराकरता नजरा भिडल्या. तब्बल तीस वर्षानंतर ती दिसली होती. रूप रंग बदलले असले तरी ही तिने मला ओळखले. एक मंद स्मित तिच्या चेहऱ्या वर उमटले. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, असे वाटले, वसंत ते शिशिराचा प्रवास क्षणातच घडला. तिने पाठ फिरवली आणि पुढच्याच अर्थात पटेल चौक स्टेशन वर ती उतरली. मी पाहताच राहलो. त्या वेळी सुद्धा ती अशीच आयुष्यातून निघून गेली होती, काही न बोलता.

पहिल्यांदा तिची भेट मंडी हाऊसच्या सरकारी वाचनालयात झाली. मला आठवते, वसंत कानिटकरांचे ‘प्रेम तुझा रंग कसा’ ह्या नाटकाचे पुस्तक चाळत होतो. हे पुस्तक मला मिळेल का, हळूच तिने विचारले. ‘लेडीज फस्ट’, या सिद्धांताचे अनुकरण करून, पुस्तक तिला दिले. थेंकस, तिचा मंजुळ आवाज कानात घुमला. तिला वसंत कानिटकरांची नाटके आवडायची. नुकतीच ती सरकारी नौकरीच्या निमित्याने नागपूर हून दिल्लीला आली होती. तिलाही वाचनाची हौस. आमच्या गाठी-भेटी सुरु झाल्या आणि आयुष्यात ही प्रेमाचा वसंत फुलू लागला.

कित्येकदा लंच टाईम मध्ये चाणक्य थियेटर मध्य पहिल्या रांगेत बसून आंग्ल भाषेतील न कळणारे अनेक सिनेमे बघितले, बहुतेक वेळा चित्रपटाचे नाव ही माहीत नसायचे, शिवाय अश्या वेळी सिनेमा पाहण्यात कुणाला रस? (सिनेमा किती ही हाउस फूल असला तरी चाणक्य थियेटरमध्ये, सिनेमा सुरु होण्याच्या अर्धातास आधी, पहिल्या दोन रांगांचे ६५ पैशाचे तिकीट मिळायचे, बहुतेक लंच मध्ये सिनेमा पाहणाऱ्या प्रेम करणाऱ्या सरकारी कर्मचार्यांसाठी केलेली सोय असावी). तिकीट नाही मिळाले तर समोरच्या ‘नेहरू पार्क’ मध्ये हातात हात घेऊन मनसोक्त हिंडायचो आणि तीन वाजे पर्यंत ऑफिस मध्ये परत. कुणालाही काही कळायचे नाही.

तो दिवस, मला चांगलाच आठवतो, ऑफिस सुटल्या वर सायंकाळी ती ‘आयएनए’ मार्केट वर भेटली होती. त्या वेळी तिथे आजच्या सारखी तिथे गर्दी नसायची. जवळ-पासच्या सरकारी कालोनीतले कर्मचार्यांचे परिवार तिथे खरीदारी करता यायचे. दक्षिण भारतीयांची संख्या ही त्यात मोठी. सहाजिक आहे, तिथे दक्षिण भारतीयांची इडली- दोस्याची तीन-चार दुकाने होती. साडे तीन रुपयात, साधारण डोस्यापेक्षा दुप्पट मोठा डोसा तिथे मिळायचा. दोन लोक मिळून एक डोसाच खाणार हे दुकानदारांना नक्कीच माहीत असेल. कित्येक सरकारी बाबूंचे प्रेम प्रसंग इथल्या डोस्यांवरच फुलले आणि कोमजले असतील. अर्थात आम्ही ही एकच डोसा मागवत असू व त्या नंतर एकच कप मद्रासी काफी मिळून पीत असू. (एका-दुसर्याला घास भरवत खाण्याचीही गम्मत फक्त प्रेम करणार्यांनाच कळू शकते). डोसा खाल्यावर दोघं दुकानातून बाहेर पडलो. मोगर्याचा सुगंध वातावरणात पसरलेला होता. सहज बघितल, एक पोरगा मोगऱ्याचे गजरे विकत होता. राहवले नाही, एक जोडी गजरा विकत घेतला.

ती म्हणाली हे काय?

मी: ‘तुझ्या काळ्याभोर केसांवर हा गजरा शोभून दिसेल’.

ती: ही दिल्ली, आहे आणि मला माहीत आहे, इथे कुंवाऱ्या पोरी गजरा नाही घालत.

मी: महाराष्ट्रात लहान पोरी सुद्धा गजरा घालतात, आपण मराठी आहोत.

ती: आपण दिल्लीत राहतो, घरी आईने विचारले तर काय उत्तर देणार?

मी: खरे काय ते एकदाचे सांगून टाक.

ती: लग्नाचे! तू करशील?

मी: नौकरी करणाऱ्या मुलीसोबत लग्न करायला मला निश्चित आवडेल.

ती: तुझी गाडी नेहमी पेश्यांवर येऊन का बरं अडकते. तू एकदम अरसिक आहे, तुला खूप खर्च करणारी आणि एक पै न कमविणारी मुलगी भेटली पाहिजे.

मी: ती, तू असेल तर मला आवडेल. ती चक्क लाजली. गजरा केसांत लावत ती म्हणाली, मी कशी दिसते. मी: मोगऱ्याच्या फुलांपेक्षा ही सुंदर.

त्या दिवशी मी आनंदात तरंगत-तरंगत घरी पोहचलो. दुसऱ्या दिवशी, ऑफिस सुटायचा आधी तिला फोन केला. दुसरी कडून, एक रुक्ष आवाज ऐकू आला, ‘उसकी ट्रान्सफर हो गयी है. कहाँ? हमें नहीं मालूम. कोई नंबर? नहीं मालूम. फोन ठेवला. पुढे कित्येक दिवस तिच्या फोनची वाट पाहत होतो. न फोन आला, न ती भेटली.

आज इतक्या वर्षानंतर ती भेटली आणि पुन्हा काही न वोलता निघून गेली. तिला आवाज द्यावीशी वाटत होती. दोन क्षण थांबली असती, बोलली असती तर काय झाले असते? गेलेला काळ आता परत येणार नव्हता. जास्तीस-जास्त सीपी मध्ये ‘कफे काफी डे’ मध्ये बसून एक कप काफी सोबत आयुष्याचा प्रवासाबद्धल बोललो असतो. तिच्या नवऱ्या- मुलांची विचारपूस केली असती आणि स्वत:च्या संसाराबाबत बोललो असतो. ती तिच्या संसारात सुखी असलेली पाहून, मला आनंदच झाला असता. ‘अगला स्टेशन उत्तम नगर ईस्ट है’ अनाउन्समेंट झाली. विचारांची तंद्रा भंग झाली. स्टेशन वर उतरलो. घरच्या दिशेने चालू लागलो. नेहमीच्या फूलविक्रेत्या कडून एक जोडी गजरा विकत घेतला. दुकानदाराने सहज विचारले, आज भाभीजी का जन्मदिन है क्या? मी नुसताच हसलो.

घरी आलो. सौच्या हातात गजरा ठेवला. हात-तोंड धुतले. नेहमीप्रमाणे सोफ्यावर बसलो. सौ. चहा घेऊन आली. तिने केसांत गजरा घातलेला होता. चहाचा कप हातात देत, तिने आपले मोठे आणि भेदक डोळे माझ्यावर रोखत विचारले, खरोखरच! हा गजरा तुम्ही माझ्या साठी आणला आहे का??? सौ. समोर खोट, बोलणे मला कधीच जमले नाही. मी म्हणालो, आज ती भेटली होती, पूर्ण कथा सांगितली. शेवटी म्हणालो गजरा घातलेली तू ही तिच्याच सारखी सुंदर दिसते आहे. सौ. ने हसत-हसत, खट्याळपणे विचारले. ती खरोखरची होती की कल्पनेतली?

मी नुसताच हसलो.

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..