नवीन लेखन...

आहारातील बदल – चवदार आहार – भाग १

शाकाहारी आहारात जी विविधता आहे, ती मांसाहारामधे नाही.
मीठापासून ते अगदी लिंबू, लोणचे, कोशिंबीर, चटणी, सोलकढी, पापड, कुरडया, भजी, वडे, दही, हे सर्व पदार्थ शाकाहाराची शान आहे. आणि भारतीय मांसाहारात वर्ज्य नाहीत.
डाव्या बाजुला असणारे हे चटकमटक पदार्थ जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण एखादा मुख्य पदार्थ जर ढेपाळला तर, पूर्ण जेवणाला सांभाळून घ्यायचे महत्वाचे कामही करतात. आहार परिपूर्ण होण्यासाठी हे पदार्थ आवश्यकच आहेत.

आहारातील सहा चवींपैकी तीन चवी या डाव्या बाजुलाच आहेत. आंबट, खारट, कडू. जेवताना या चवींचा वापर युक्तीने करायचा असतो. यातील एकही चव कमी होता नये, तरच आहार परिपूर्ण होतो. हे लक्षात ठेवावे.

या प्रत्येक चवीचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. ते जेवताना जपले पाहिजे. एखादा पदार्थ बंद केला तर तो आहार पूर्ण होणार कसा ? पुनरूक्ती दोष स्विकारून लिहितो,
मधुमेह झाला तर गोड बंद केले जाते.
पित्त वाढले तर आंबट, तिखट बंद.
रक्तदाब वाढू नये म्हणून खारट बंद.
आवडत नाही, म्हणून कडू पण बंद.
राहिली फक्त तुरट चव. ज्यातून पोषण काही होत नाही.

मग आपले जेवण परिपूर्ण कसे बनणार ?
आणि पॅथाॅलाॅजीचे रिपोर्ट पण परिपूर्ण कसे येणार ? एखादी चव इकडेतिकडे झाली कि त्याचा परिणाम रिपोर्टमध्ये दिसणार. त्याची पूर्तता करायला एखादी गोळी कायमची सुरू होणार.
त्यापेक्षा आपले नेहेमीचे जेवणच संतुलित ठेवावे. हा सोपा उपाय.

एखाद्या चवीचा पदार्थ काय गुणाचा, अवगुणाचा आहे, हे शास्त्रकारांनी ग्रंथात वर्णन केले आहे.
म्हणजे खारट पदार्थांनी केस गळतात, कडू चवीने धातुक्षय होतो, गोड पदार्थ खाल्ले की चरबी वाढते इ.इ.
याचा अर्थ ती चव अवगुणीच आहे, ती कायमची बंद करा, असे मात्र नक्कीच नव्हे.

तात्पुरत्या बिघडलेल्या दोषांवर विजय मिळवण्यासाठी त्याचे सर्व गुणअवगुण परिचित असावे लागतात, म्हणून त्यांना साम्यावस्थेत, म्हणजेच पूर्वपदावर आणण्यासाठी काय युक्त्या योजाव्यात, याचे दिशादर्शन वैद्यांना होते. म्हणून ग्रंथ शिकायचे असतात. त्यांना प्रमाण मानायचे असते, पण व्यवहारात मात्र स्थळ काळ वेळेनुसार यात बदल करण्याचे सर्व अधिकार ग्रंथकारांनी वैद्यांकडे दिलेले आहेत.

एखादा मुलगा वांड असतो, एखादा अवगुण त्याच्यात असतो, म्हणून आई बाबा त्याला झिडकारत नाहीत, तर युक्तीने त्याचा अवगुण कसा कमी करता येईल, हे पहातात. काहीवेळा प्रेम करून, काहीवेळा समजावून, कधीतरी थोडीफार शिक्षा करून, तो अवगुण काढण्याचा प्रयत्न करणे याला जीवन ऐसे नाव !

इथे तर कोणीच परिपूर्ण नाही. जेवणात आणि जीवनात देखील ! कुठेतरी कोणीतरी कमी अधिक असणारच.

परिपूर्ण तर नवीन सुन पण नाही, आणि अनुभवी सासु पण नाही. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचे गुण अवगुण जाणणे, एकमेकांच्या चवी समजून घेणे, हे घर सांभाळण्यासाठी, अत्यंत आवश्यक आहे. तरच उत्तम संसार होतो.

मनापासून प्रेम करणारी, पण बाहेरून तत्वांसाठी भांडणारी, अवखळ फटकळ बहिण भावासाठी बाहेरून आंबट, पण आतून मधुर असते, पण नणंद या भूमिकेतून तिखट वाटते. मेहुणीचे मात्र तसे नसते हो, ती सदाबहार मधुर असते.

तसेच या चवींचे आहे.

कोण जास्त तिखट आहे, कोण कडू बोलतंय, हे इतरांनी समजून गोडपणा वाढण्यासाठी, काय करायचं हे ठरवावं लागतं. आमटी तिखट असली तर त्याला बॅलन्स करणारा आंबट आणि गोड पदार्थ वाढवावा, की झाले. तिखट आमटी टाकून देण्याची आवश्यकता नाही.
हे ज्या घरातील सासु सुनाना कळते ते घर सुदृढ होते.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021

01.11.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..