नवीन लेखन...

आपणच असतो विठ्ठल आणि आपणच रुक्मिणी…!

सकाळ उजाडली. विठ्ठल अजून झोपलाच होता. एकादशी आळसाच्या पांघरुणात गुरफटली होती. बाहेर पाऊस पडत होता मस्तंपैकी… आणि तेवढ्यात ढोल ताशांचा आवाज कानावर पडला. विठ्ठल ताडकन उठला. आजी बसलेली बाजूला… ‘ढोल ताशे का वाजताहेत?’, त्याने आजीस विचारले. आजी म्हणाली, ‘आज आषाढी एकादशी नाही का… सकाळी शाळेतल्या मुली नव्वारी नेसून नटून थटून गेल्या इथून… आणि आमचा विठ्ठल अजून  अंथरुणातच…
‘गप गं… सुट्टी टाकलीये आज तर झोपू दे ना जरा… ‘
‘मी कुठे उठवलंय… तूच उठलास ताडकन…’
शेवटी विठोबा उठलाच… अचानक एकादशी जागी झाली त्याच्यातली… उठून दात घासून साबुदाण्याची खिचडी खाल्ली… चहाबरोबर बिस्कीटाचा डबा उघडला आणि जणू काही झाकणाच्या आवाजाचीच वाट बघत असणारी आज्जी बाहेरुन ओरडली, ‘उपास आहे आज… बिस्कीटं खाऊ नका आजच्या दिवस’… ‘चालतं गं आजी… आपणच विठ्ठल असतो’ … ‘विठूला बिस्कीटं आवडतात पण त्याच्या आज्जीला आवडत नाहीत म्हणून विठू आज बिस्कीटं खाणार नाही…’, स्वत:पाशीच पण आजीला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात त्याने जाहीर केलं…
चहा-खिचडी खाऊन गेला आंघोळीला… स्वत:शीच बोलत… ‘चला आज जरा माझ्यावर रचलेले अभंग ऐकूया अंघोळ करता करता..’
आंघोळ करुन आजीला म्हणाला, ‘आज्जी विठू-रुकू’च्या देऊळात जाऊन येतो जरा…’
‘अरे पण तूच विठ्ठल आहेस असं म्हणालास नं मगाशी?? मग आरश्यासमोर जाऊन नमस्कार कर की…’
‘अगं आजी, एकाच वेळेस कमरेवर हात ठेवून नमस्कार नाही करता येत… आणि अजून रुकूपण नाहीये माझ्याकडे… म्हणून चाललोय देवळात… चल बाय.’विठोबाची होणारी रुक्मिणी बाहेर येऊन बुलेटवर त्याची वाट बघत उभी होती… हा गेला धावत आणि बसला मागे… रुक्मिणी निघाली…
‘कुठे जायचं गं?’
‘आधी पेट्रोल भरु. मग तिथून विठू-रुकूला भेटायला… मग नदीवर जाऊन येऊ एकदा’
‘भेटलो ना एकमेकांना आता… देवळात जाण्याची काय गरज?’
‘दोघं एकमेकांना भेटलोय. स्वत:ला भेटायला जायचंय देवळात…’, ती उत्तरली…
‘बरं चल…’
विठ्ठल कमरेवर हात ठेवून बुलेटवर रुक्मिणीच्या मागे बसला होता…
आजच्या दिवस त्याने मोबाईल घेतला नव्हता… हात कमरेवर ठेवायचे होते आणि लेंग्याला खिसाही नव्हता नेमका…
पेट्रोल भरुन दोघं देवळात गेले… शहरातल्या प्रसिद्धं विठ्ठल मंदिरांपैकी ते नव्हतं. त्यामुळे तिथे हे दोघंच होते…
देवळात गेले… दोन काळ्या मूर्ती समोर कमरेवर हात ठेवून उभ्या होत्या… कुणीतरी सकाळी सकाळीच येऊन त्यांना स्वछं पाण्याने न्हाऊ घातलं होतं बहुदा… पाण्याचा दमटपणा मूर्तिंत जाणवत होता अजून… दोघेंही उभे राहीले स्वत:समोर… पण आता दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोडून छातीशी ठेवले होते. कमरेवरचे हातवाले समोर उभे होते कारण… डोळे मिटले दोघांनी… काही क्षण शांत उभे होते चौघेही… देवळाबाहेर सुसाट वारा सुटला होता… आणि पावसाचा कोसळणारा आवाज येत होता… पण तरीही वातावरण शांतच होतं… काही वेळाने दोघे बाहेर आले… पुन्हा बसले बुलेटवर… दोघेही नि:शब्दं… ठरल्याप्रमाणे नदीवर गेले… कुणीच कुणाशी बोलत नव्हतं…
शांतपणे बसले दोघं नदीकाठी…
तेवढ्यात पाण्यातून अचानक बुडबुडे आले वर… दोघांचही लक्षं एकाच ठिकाणी गेलं… आणि समोरच्या काठावरुन किंकाळी ऐकू आली… दोघांनीही पाण्यात उडी घेतली…
काहीवेळ सगळ्या चित्रात फक्तं निसर्गच दिसत होता… आणि काही क्षणांनंतर पलीकडच्या किनार्यावर विठ्ठलाच्या मांडीत एक अल्लड मुल बेशुद्धावस्थेत पडलं होतं आणि रुक्मिणीच्या मिठीत त्या मुलाची माय रडत होती… यमाने कडेवर घेण्याआधी विठूने त्याला कडेवर घेतलं होतं…
मुल शुद्धीवर आलं… विठूने त्याला त्याच्या जीवाच्या आईकडे सोपवलं…. त्या मातेने विठू आणि रुकूकडे बघून हात जोडले… दोघंही कमरेवर हात ठेवून उभे होते…
नदीवरुन घरी येण्यास निघाले… रुक्मिणीने विठोबाला घरी सोडलं… घरी आजीने दार उघडलं…  ‘काय मग? भेटले का विठ्ठल रुक्मिणी?’
‘आजी, आपणंच असतो गं विठ्ठल… आणि आपणंच रुक्मिणी… कारण ते एकरुप झालेत अगं… आई मुलात… नवरा बायकोत… तुझ्या माझ्यातही अगदी… संपूर्ण स्रुष्टीत…विठ्ठल रुक्मिणी…'”रुक्मिणीलाही रस्त्यात सगळ्या काळ्या मुर्त्याच दिसत होत्या घरी जाताना….!”
— श्रुती आगाशे.

 

1 Comment on आपणच असतो विठ्ठल आणि आपणच रुक्मिणी…!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..