नवीन लेखन...

अविस्मरणीय गांधीजयंती सप्ताह

आठवणींमध्ये रमण्याचा छंद सगळ्यांनाच असतो. ‘गुजरा हुआ जमाना’ आपल्याला नेहमीच वर्तमानापेक्षा अधिक रमणीय भासतो, कारण त्यात आठवणींचे गहिरे रंग भरलेले असतात. सुख-दुःखाचे प्रसंग, जुनी माणसं आठवताना आपलं मन भरून येतं.पण अप्रूप वाटावं त्या उत्सवाचं अर्थात हुतात्मा बाबू गेनू यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घोडपदेव विभागातील  श्रीकापरेश्वर मंदिराच्या प्रांगणात होत असलेल्या महात्मा गांधी जयंती सप्ताहाचं. मराठी मातीत वाढलेल्या, रुजलेल्या माणसासाठी *”महात्मा गांधी जयंती सप्ताह’* म्हणजे निव्वळ शब्दात व्यक्त न करता येणारा जिव्हाळ्याचा विषय. *‘वसुधैव कुटुंबकम‘*  हे मानणारी आपली भारतीय संस्कृती. अशाच काही व्रतस्थानी,मराठमोळी माणसं या भागात राहतात. त्यातल्याच काही उत्साही आणि रसिक लोकांनी एकत्र येऊन सुरु केलेला हा सप्ताह म्हणजे ‘आकाशी झेप घेरे पाखरा ….!’ समस्ताना प्रेरणा देणारा गांधी सप्ताह. बापुजींना मानणारे आणि न मानणारे दोन ही घटक होते. मलाही महात्मा गांधीविषयी आणि त्यांच्या आडमुठ्या हट्टापायी भारताला जे सोसावे लागत आहे त्या विषयी घृणा आहे. पण मला त्यात आत्मीयता नाही म्हणून इतरांची मते वेगळी असतात. असे काही अहिंसेच्या मार्गावरचे पुजारी या विभागात राहत होते. त्यांच्या योगदानामुळे  हा सप्ताह मुंबई शहरात नावारूपाला आला. एक दिवशीय औपचारिकता म्हणून गांधी जयंती साजरी करणारे शासनासहित विविध सामाजिक संस्था किंवा पक्ष आदिंनी गांधी सप्ताह कधी केला नाही. असो माझा विभाग या मध्ये आघाडीवर होता. याचा मला अभिमान आहे.

मला आठवतय लहान असताना सप्ताहात एक दर्जेदार नाटकातील एक संवाद आठवतोय ‘”गेले ते सुखाचे दिवस, आता ते परत कधीही येणार नाहीत‘. एक खिन्न आर्तता त्याच्या त्या सुस्कारा टाकून काढलेल्या उद्‌गाराचे प्रतीत आज मला कळतंय. खरोखर गेले ते गांधी सप्ताहाचे दिवस. किती सामर्थ्य ! किती चैतन्य ! तो सप्ताह म्हणजे बालमनावर सुसंस्कार करणारा उत्सव….! हुंदडण्याबरोबर ज्ञानार्जन देणारा उत्सव…! याच उत्सवात गीतगायन,नाटक, वकृत्व स्पर्धा  होत होत्या. विविध नाट्यमंडळे नाटक सादर करीत असत. दर्जेदार सादरीकरण …. त्या लाकडी फळ्यांच्या धडधडणाऱ्या रंगमंचावर धमाल यायची. पाहतच रहायचं.

भारतीय बेकरीच्या बाजूला राहणाऱ्या एक हांडे नावाच्या मुलीने मधुर आवाजात गायलेले ‘दो आँखे बारह हाथ’ मधील ‘ए मालिक तेरे बंदे हम’ गीतांनी समस्ताना रडविले होते. ‘गवताला जेव्हा भाले फुटतात’ या ऐतिहासिक नाटकात यशवंत तळेकर नावाच्या कलावंताने व्यासपीठावर यवनांशी लढाई करणाऱ्या प्रसंगात अशी गोल उडी जागच्या जागी मारली ते पाहून टाळ्यांचा कडकडाट  कितीतरी  वेळ चालला होता. या प्रसंगाचे वर्णन करायचं म्हणजे त्या कलाकाराला रसिक  प्रेक्षकातून ५  रुपयाचं बक्षीस दिले. त्यावेळेचे ५ रुपये कमी नाहीत.तेव्हा मिल कामगारांना महिना ६० रुपये पगार होता. दुर्लक्षित ऐतिहासिक  आणि काव्यमय असे वेगळे विषय अतिशय कल्पकतेने हाताळणारी नाट्यमंडळे आणि त्यांचा नाटक दर्जा, उत्कृष्ट अभिनय व्यावसायिक नाटकांना देखील मागे टाकत असे.वकृत्व स्पर्धेत अरुण पवार नावाच्या विद्यार्थ्याने इंग्लिश मध्ये भाषण करून नवा पायंडा पाडला होता. विशेष म्हणजे घराघरातून माणसं या स्पर्धकांना प्रोत्साहन द्यायला यायची. बक्षीसही देऊ करीत होती.

या सप्ताहात सात दिवस दारूबंदी असायची. सतत काहींना काही कारणास्तव होणाऱ्या राडेबाजीला मज्जाव म्हणजे गांधी सप्ताह. जेथे दारूचे धंदेच बंद तेथे मारामारी होत नसे. भांडण तंटे नव्हते. तरीही काही जन घराघरात भूश्याच्या गोणीतून दारू आणून विकायचा प्रयत्न करीत पण पोलीस ठाणे अशा मंडळींची वरात काढीत होते. नशाबंदी मंडळाचे दर्जेदार कौटुंबिक, राष्ट्राभिमान जागृत करणारे  चित्रपट पाहायला मिळत होते. यामुळे बाल्यावस्थेतील दैनंदिन वर्तनात परिवर्तन घडून येत होतं. मुलांना त्यावेळेस शाळा एके शाळा… कोचिंग क्लास नाहीत आणि घरी शिकवणी नाही कारण घरातलेच शिकलेले नव्हते त्यामुळे ते अभ्यास काही घेत नसत. मग आपल्याला मस्त उंडारण्याशिवाय दुसरं काम काय…! त्या उंडारण्यात मजा होती. विविध प्रकारचे खेळ खेळायला मिळत. अशा वेळी बालकांचे विविध कलागुण गांधी सप्ताहात पहायला मिळत. आपल्यातला कलावंत, बुद्धिवंत विभागात दिसू लागला.

ते अहिंसेचे मार्गावरचे पुजारी पिकल्या पानाप्रमाणे गळून पडू लागले आणि या उत्सवाची शान हळूहळू लोप पावत गेली. आज गांधी सप्ताह होत नाही. पण धाकु प्रभुजी वाडी सार्वजनिक मंडळाने महात्मा गांधी जयंती अव्याहतपणे सुरु ठेवली आहे. खरं तर या गांधी सप्ताह बंद होण्यामागे  राजकारण आहे . कुटनीती रचली गेली.पण त्या फंदात मला पडायचे नाही.

त्या मान्यवरांचे कष्टाचे,योगदानाचे, कौशल्याचे, आंनद देणारे क्षण अविस्मरणीयच म्हणजे अंधार फार झाला असतना  पणती जपून ठेवतो त्याप्रमाणे माझ्याच नव्हे तर आजही क्रित्येकांच्या हृदयात तेवत  आहेत.

अशोक भेके

 

Avatar
About अशोक मारुती भेके 13 Articles
मी लहापणापासून मुंबईतील घोडपदेव या श्रमजीवी भागात राहत असून सध्या मी बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत सेवेला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..