संयमाचा द्राविडी प्राणायाम

राहुल द्रविडच्या जागवलेल्या काही आठवणी. द्वारकानाथ संजगिरी यांच्या ‘थर्ड अंपायर’ या पुस्तकातून सारांशरूपाने!

बर्फापेक्षा थंड काही असू शकतं का ?
होय. होय. होय! राहुल द्रविडचं डोकं !!
याआधी आपण पाहिलंय की चेंडू फिरणाऱ्या खेळपट्टीवर त्याने इराणी कप मुंबईच्या हातून कसा पळवला ते! एक मुंबईचा खेळाडू मला सांगत होता, “अरे, तो फलंदाजीला जातानाच बरोबर बेडिंग, कपडे, टूथब्रश वगैरे घेऊन गेलाय, असं वाटत होत. त्या सामन्यात लक्ष्मण अप्रतिम खेळला, पण द्रविडचं अस्तित्व हा त्या विजयाचा पाया, ढाचा, कळस वगैरे सर्व होतं. मी तेव्हा त्याला फोनवर म्हटलं होतं, “आईकडून दृष्ट काढून घे. आपल्याकडे क्रिकेटमध्ये दृष्ट फार लवकर लगते.”
त्याच्या फलंदाजीला दृष्ट लागून चालणार नव्हतं.

सचिन-राहुल हे भारतीय संघाचे श्वास होते. दोघेही एक-एक नाकपुडी! एक चोंदली तर दुसरी प्राणवायू पुरवते. एकेकाळी सचिन गेला कि श्वास कोंडायचा. द्रविड असला की श्वास कोंडणार नाही, असं वाटायचं. २००३ च्या विश्वकपात सचिन बल्ल्याने काव्य लिहून जायचा, पण शेवटी निबंध कोणीतरी लिहावा लागतो. ती जबाबदारी राहुल पूर्ण करायचा.

हे पद्य आणि गद्य हेच आपल्या क्रिकेटचं अभिजात साहित्य आहे. तेच दोघांनी प्रसवलं.
बरं, द्रविड पूर्वीप्रमाणे बसची वाट पाहावी तसा एखाद्या धावसंख्येवर पुढच्या धावेची वाट पाहात ताटकळत उभा राहात नाही. धाव ही कष्टाने मिळणारी बस नाही. ती वाट पाहात उभी असलेली कॅब आहे आणि तरीही त्याच्या फलंदाजीएवढी शाश्वती भारतीय संघात कुणाचीही देता येत नाही. द्युतात धर्मराजाने राहुलची विकेट लावली असती तर शकुनी हरला असता… धर्मराज नाही. त्याची फलंदाजी हा ट्रान्समध्ये जाण्याचा प्रकार आहे. अभ्यासात तो हुशार आहे, असं त्याची आई सांगते. ‘अभ्यासाला बस’ असं राहुलला म्हणे कधी सांगावचं लागलं नाही. ‘राहुल द्रविड स्क्वेअर कट मारतो तशी त्याच्या गालावर कधी मारायला लागलीय का?’ माझ्या गालावरच्या जुना जखमा आठवून मी त्याच्या बाबांना विचारलं. ते म्हणाले, ”साधी रागावण्याची वेळसुद्धा त्याने कधी येऊ दिली नाही. तो क्रिकेट खेळायला लागल्यावर सुद्धा शेवटचे दोन महिने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचा. त्यामुळे क्लास मिळवायचा.” बारावीत राहुलने त्याच्यासमोर असलेले अनेक शैक्षणिक पर्याय टाळून क्रिकेटपटू व्हायचं ठरवलं. तिथंही ‘क्लास’ मिळवला. आपण कधीतरी अधून मधून द्रविड जास्त बचावात्मक झाला की वैतागायचो. त्याच्या आई-बाबांना काय वाटत असेल? ते म्हणाले, ”आम्ही वृत्तीने सर्वच शांत आहोत. राहुलचं शतक झालं की आनंद होतो, पण हुरळून जात नाही किंवा अपयश फार मनाला लावून घेत नाही. कधीतरी मी त्याला विचारतो ‘त्यावेळी असा का शॉट खेळलास? असा खेळायला हवा होतास’. तो फक्त हसतो. पण मला माहीत असतं तो यशापयशाचा अभ्यास करतो. ही त्याची अभ्यासू वृत्ती लहानपणापासूनच पाहिलीय. आजही तो विवेकानंद वाचत असतो.”

काही दोन-चार क्रिकेटर्सचा अपवाद सोडला तर इतरांना विवेकानंदांच्या फोटोखेरीज त्यांच्या बद्दल इतर माहिती नसावी.
राहुलच्या पेशन्सची एक गोष्ट. राहुलच्या आईने सांगितलेली. त्याच्या लग्नाच्या वेळी त्याच्या घरच्यांना असं वाटत होतं की लग्न हे साग्रसंगीत व्हावं. कारण त्याची मुंज साग्रसंगीत झाली होती. मुंजीत त्याला सोन्याचं जानवं सुद्धा घातलं होतं. पण राहुलचा आधी अशा विधींना विरोध होता. पण त्याच्या आईने त्याला सांगितलं की तेवढं माझ्यासाठी ऐक. हे विधी चार दिवस चालले होते. पण राहुल या खेळपट्टीवरून देखील हलला नाही.

कळलं तुम्हाला त्याचा पेशन्स कुठून आला?
मी आयुष्यात स्वतःच्या लग्नाचा अल्बम सोडून फक्त राहुलच्या लग्नाचा पूर्ण अल्बम पाहिलाय. एरवी लग्नाचा अल्बम म्हटलं की माझ्या अंगावर काटा येतो. त्या अल्बममध्ये मात्र फोटोफोटोत मला राहुलच्या पेशन्सच्या खुणा दिसत होत्या. शेवटी मैदानावरही लग्नच असतं. ते धावांशी असतं. मुंडावळ्यांऐवजी पॅड्स, ग्लोव्हज असतात. उलट मैदानावरचे विधी पेशन्सची जास्तच परीक्षा घेतात.

द्वारकानाथ संजगिरी
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-3878-Mumbai port

महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी ५० बंदरे

महाराष्ट्र राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. ७२० कि.मी. लांबीच्या संपूर्ण ...
p-3875-midc

महाराष्ट्रात २२५ हून जास्त औद्योगिक क्षेत्र

महाराष्ट्रामध्ये उद्योगांची वाढ व्हावी, या हेतूने महाराष्ट्र सरकारने १ ऑगस्ट ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
p-3863-Satpuda-Mountains-Range-300

सातपुडा पर्वतश्रेणी

महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर सातपुडा पर्वतश्रेणी आहे. तिच्या दक्षिणेस तापी-पूर्णा खोरे ...

Loading…

संजीव वेलणकर
संजीव वेलणकर यांच्याविषयी... 1043 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
संपर्कः फेसबुक

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*