राजपुत्राचा नातेवाईक..फुकटातला आनंद..

ब्रिटनचे राजपूत्र चार्लस यांचा लेक प्रिन्स विल्यम हा भारतीय वंशाचा असल्याचा शोध डीएनए संशोधकांनी लावल्याचे वृत्त आले आणि आमच्या घरी आनंदोत्सव सुरु झाला.आमच्या सौभाग्यवतीनं सगळया कॉलनीस पेढे वाटले.संतोषी मातेच्या मंदिरात जाऊन नारळ फोडला.तिच्या चेहऱ्यावरचे तेज नुसते ओसंडून वाहत होते.

मला पहिलं प्रमोशन मिळालं तेव्हा सुध्दा तिला इतका आनंद झाला नव्हता.तिच्या बहिणीला फॉरेनमध्ये मोठया कंपनीत नोकरी करणारा नवरा मिळाला तेव्हा सुध्दा तिला एवढा आनंद झाला नव्हता.आमचे सासरे पंचायत समितीचे सदस्य झाले तेव्हा सुध्दा हिला एवढा आनंद झाला नव्हता.मग आताच अनलिमिटेड आनंद होण्याचे काय बरे कारण असावे?मी अनंत बाबींची उलट सुलट जुळवणी करुन बघितली.पण माझ्या प्रश्नाला उत्तर मिळण्याऐवजी ते प्रश्न आयपीएल फिक्सिंच्या प्रश्नासारखे अधिकाधीक गडदच होत गेले.अखेर न राहावून मी माझी शंका तिच्यासमोर ठेवलीच.

तरी मला कालपासून वाटतच होतं की,यांचा उंट अजूनपर्यंत कसा हलला नाही.सौभाग्यवती कुत्सितपणे म्हणाल्या.असे प्रसंग जेव्हा जेव्हा येतात तेव्हा ती माझा उध्दार प्राणी जगतातील उंट हत्ती,घोडा,अस्वल अशा श्रेष्ठ आणि जेष्ठ प्राण्यांच्या उदाहरणानेच कां करते हे कोडे मला अद्यापही सुटलेले नाही.या प्राण्यांना जर यदाकदाचित त्यांचं आणि माझं असं रिलेशिनशिप जोडलं जातं हे कळलं तर ते नक्कीच पाच-पन्नास दिवस डोळे बंद करुन मौनातच जातील.

सौभाग्यवतींनी मला उंटाची उपमा दिली असती किंवा उंदराची दिली असती तरी मी कमल कपूर सारखं हॅ हॅ हॅ च केलं असतं.तसं मी करुन तिच्यापुढे संपूर्ण शरणागती पत्करली.

त्यामुळे सौभाग्यवतींचा आनंद मंगळाएवढा झाला.

प्रिन्स विल्यमचा डीएनए भारतीय निघाला याचा तिला झालेल्या आनंदाचं कारण तिने विदित केलं.तिच्या म्हणण्याप्रमाणे, हे कधीना कधी होणारच होतं.(कसं ते मात्र मी तिला विचारण्याची हिम्मत करु शकलो नाही.)कारण त्याचे घारे निळे डोळे(ते तर कपूर खानदानाचे सर्वात मोठे वैशिष्ट आहे.),कारण त्याची उंच ी(बच्चन खानदानीची मक्तेदारी आहे.) त्याच्या गालावर पडणारी खळी,(अशी खळी दीपिका पडुकोन आणि शाहरुख यांच्या गालावरही पडते.)कारण त्याचे कुरळे केस (सचीन तेंडूलकर आणि आमचे बॉस मोहनराव वनारसे यांचेही केस कुरळेच आहेत की.)कारण त्याचे रुंद कपाळ,त्या कपाळावरील स्पष्ट दिसणाऱ्या रेघा (आठ्या),चाफेकळीसारखे लांबोळे नाक, नाकावरील फुटकळी (हिला कधी आणि कुठे दिसली?)खांद्याची ठेवण,चालण्याची ढब सारे काही सारे काही..सांगता सांगता सौभाग्यवतीला दम लागला.सांगण्याचा उत्साह मुंबई मॅराथॉनच्या शेवटच्या टप्प्यावर पोहचल्यावर जसा स्पर्धकांचा होतो तसा झाला होता.तो उत्साह तसाच कायम ठेवत मी सौभाग्यवतीस पुढे बोलते केले..

ती म्हणाली,सारे काही माझ्या माहेरच्या माणसारखेच हो..प्रिन्स विल्यमचा डिएनए भारतीय निघाला पण भारतीय म्हणजे कोण,तामीळ,मल्याळी,केरळी की आपला महाराष्ट्रीय,हे महत्वाचं नाही का?त्यामुळे मीच काल रात्रभर प्रिन्स विल्यिमचा फोटो नि माझ्या माहेरच्यांचे फोटो निरीक्षण करीत होते.पाच तासाच्या सुक्ष्म निरीक्षनानंतर प्रिन्स विल्यमचा डीएनए महाराष्ट्रात येतो नि तिथूनही तो माझ्या माहेरच्या घरापर्यंतच पोहचतो बरं का.हे सूर्यप्रकाशाच्या पहिल्या किरणासारखं स्पष्ट झालं.सौभाग्यवतीनं अतिव आनंदात सांगितलं..

मी तिच्याकडे बघतच काय राहिलो.माझ्याच्याने शब्दच सुचेना. प्रिन्स विल्यिमची नाळ बायकोच्या माहेरी जर जातच असेल तर त्याच्या नात्यात मी सुध्दा नाही का येणार?

राजपुत्राचा नातेवाईक,या व्हर्च्युएल आनंदाच्या डोही मीही तरंगू लागलो.महागाईच्या काळात असा फुकटातला आनंद मनावला काय हरकत आहे,नाही का?

— सुरेश वांदिलेAbout सुरेश वांदिले 7 लेख
श्री. सुरेश वांदिले हे महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागात संचालकपदावर आहेत. महाराष्ट्र शासनाच्या “लोकराज्य” या मासिकाचे ते संपादक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…