माझी कोकणची सहल – पावशीच्या जंगलात काढलेली एक रात्र

आमच्या हरकुळ खुर्दतल्या मंतरलेल्या रात्री नंतरच्या रात्रीचा मुक्काम कुडाळ तालुक्यातल्या पावशी गावातल्या जंगलात होता. आमचा इकडचा यजमान होता माझा रानवेडा मित्र डॉ. बापू भोगटे..

डॉ. बापू भोगटे हा जनावरांचा डॉक्टर. मुंबईतली चांगली ‘गोदरेज’ मधली नोकरी सोडून आपल्या गावी म्हणजे कुडाळ तालुक्यातल्या पावशी गावात स्थायिक झाला..थोडे पैसे गुंतवून काजू, बांबूची लागवड सुरु केली..वेळ मिळेल तसा खांद्यावर बंदूक लटकावून जंगलात घुसायच आणि मनमुराद भटकायचं हा याचा छंद..बंदूक स्व-संरक्षणासाठी, शिकारीसाठी नव्हे..असाच शहरतील काही मित्रांसमवेत एकदा जंगलात गेला असता त्याला जंगलात जंगलात मुक्काम करण्याची कल्पना सुचली व लगेच दुसऱ्या दिवशी बापूने ती अमलातही आणली. सोबत तेच शहरातले मित्र होते..ते तर जंगलातील मुक्काम ह्या कल्पनेनेच वेडे झाले होते व ती रात्र त्याची जंगलात काढली..त्याचे फोटो बापूने फेसबुकवर टाकलेले मी पहिले आणि एकदा तरी बापुसोबत जंगलत मुक्काम करण्याचा निश्चय केला आणि लगेच काही दिवसात तो अंमलातही आणला. हरकुळ खुर्दच्या नंतरचा मुक्काम आम्ही बापूकडे पावशीच्या जंगलात करण्याच ठरवल होत..

आजचा आमचा मुक्काम होता पावशी गावातल्या एका डोंगरावरच्या घनदाट जंगलात.. मुंबई-गोवा हायवेला लागून साधारण अर्धा किलोमिटरवर असलेल्या त्या डोंगरावरच्या जंगलाच्या दिशेने आम्ही निघालो..जस जसे आंत शिरत गेलो तास तसे जंगल घनदाट व्हायला लागलं. डिसेंबर मधल्या संध्याकाळी ६-६.३०ची वेळ असल्याने असंही अंधार पडत चालला होता. जंगलातली संध्याकाळ तर आणखी दाट होती..गर्द झाडी असल्याने जंगलात अंधार होता त्यापेक्षा जास्तच वाटत होता..जस जसे वर चढत होतो तसे पायवाट अधिकाधिक चिंचोळी व झाडी गर्द होत जात होती.. जंगलातल्या वृक्षांनी व त्यांना लपेटलेल्या मंगता एवढ्या जाड वेलींनी आता चित्र-विचित्र आकार धारण करायला सुरुवात केली होती..जे जे मनात वसत होते ते ते आकार त्या त्या वृक्षांमध्ये दिसत होते..अर्थात त्या दाट, गूढ संधीप्रकाशात मनात ‘रामा’चा आकार येण शक्य नव्हतच, जे जे मनात येई ते सर्व ‘रात्रीस खेळ चाले’ मधले आकारच होते. आता आता पर्यंत एका रांगेत चालणारे आम्ही आता रांगेच्या मध्ये येण्यासाठी नकळत प्रयत्न करत होतो..

अर्धा तास ती जंगलात हरवलेली पायवाट तुडवल्यानंतर आम्ही एकदाचे मुक्कामावर पोहोचलो. आमच्या एकूण १० जणांसाठी गच्च झाडीतील मधली काही जागा मोकळी करून बापूने तीन तंबू लावले होते..बाहेर बॅटरीवर चालणारी लहान लाईट लावली होती. तंबूच्या बाहेर बसायला प्लास्टीकचं कार्पेट व थंडी असल्याने पुढे काही अंतरावर शेकोटी पेटवलेली होती. जंगलात मुक्काम करताना थंडी असो वा नसो, शेकोटी पेटवावी लागतेच हे आम्ही पूर्वी डिस्कव्हरी आणि नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवर पाहून माहित होत.. कारण सरपटणाऱ्या प्राण्यापासून ते बिबळ्या सारख्या हिंस पशु पर्यंत सगळ्या प्रकारची जंगली श्वापदं फक्त आगीलाच घाबरतात. शेकोटीच्या ज्वाळांच्या प्रकाशामुळे आजूबाजूच्या झाडांनीही आमच्या मनात काहीसं भीतीदायक रूप धारण केले होते..आम्ही एकूण १० जण होतो..घनदाट झाडी व अंधारामुळे चार-पाच फुटांच्या पुढचंन काहीच दिसत नव्हते..खर सांगू का, मुळात झाडीत बघण्याचा धीरच होत नव्हता..

आता आमच्या गप्पा सुरु झाल्या. बापूने त्या जंगलातले वृक्ष-वेली, त्या जंगलात कोणते कोणते प्राणी आहेत, त्यांचा वास कुठे कुठे असतो याची अतिशय वेधक शब्दात माहिती सांगायला सुरुवात केली..माहिती सांगत असताना बापू मधेच थांबून सर्वाना अगदी शांत राहून काही आवाज ऐकायला शिकवत होता..दूर कुठून तरी कुत्रे भुंकण्याचा आवाजही येत होता व बापू कुत्र्याच्या त्या भूंकण्याच्या प्रकारावरून कुत्र्याला कोणत्या प्राण्याची चाहूल लागली असावी ते आम्हाला सांगत होता..सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या आमच्यासाठी ते सर्व आश्चर्याच होत..लहान मूळ ज्या कुतूहलान भूत खेताच्या गोष्टी ऐकताना त्यांच्या चेहेऱ्यावर जो भाव असतो, नेमका तसा भाव आमच्या सर्वांच्या चेहेऱ्यावर दिसत होता..चेहेऱ्यावर पडणाऱ्या शेकोटीच्या ज्वालांच्या हलत्या लाल-पिवळ्या प्रकाशात तर आमचे चेहेरे आणखीच गूढ-गंभीर दिसत असावेत बहुदा..बापूच्या सांगण्यानुसार त्या जंगलात अस्वल सोडल्यास हर एक प्रकारच्या प्राण्याचा अधिवास होता..

हरकुळ खुर्दच्या तलावाच्या कालच्या मंतरलेल्या रात्रीनंतरची पावशीच्या जंगलातली ही रात्र वेगळ्या अर्थाने गूढ होती. पशु-पक्ष्यांच्या गोष्टीवरून गप्पांची गाडी भूत-खेतांवर येणं अगदी साहजिक होत..साऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच भूता-खेतांची गूढ पार्श्वभूमी आहे. तलावात आम्हला यक्ष, गंधर्व उतरल्याचा भास होत होता तर या जंगलात कोकणातील देवचार, जागेवाला आणि राखणदार सारखे आजूबाजूला फिरत असल्याचा भास होत होता.. भूता खेतांच्या गोष्टी कोकणातल्या भूमीत जेवढ्या जिवंत होतात तेवढ्या क्वचितच अन्यत्र होत असाव्यात. त्यात आम्ही खोल जंगलात..आम्ही चांगले ५०-५० वर्षांचे बाप्ये असूनही बापूने आणलेल्या बंदुकीच्या आणि ती चालवता येणाऱ्या बापूच्या बाजूने कोंडाळ करून बसलो होतो..

गप्पा मारता मारता १० वाजले. बापूने चिकन मसाला व पावाचा बेत आखला होता. चिकन खाली गावातूनच करून आणल होत. तीन दगडांची चूल करून त्यावर तो चिकन मसाला गरम करून आम्ही गोल बसून जंगल भोजन केल व काही वेळ गप्पा मारून झोपी गेलो..

जंगलात, ते ही तंबूत, रात्र काढायची ही पहिलीच वेळ..पाठ जमिनीला लागली होती तरी कान मात्र बाहेरच्या आवाजाचा वेध घेत होते..नसलेले आवाजही ऐकू येत होते..दूर कुठेतरी कुत्र्याच अंधुकस भूंकणही ऐकू येत होत..सार कस गूढ गूढ होत गेल आणि मध्ये उत्तररात्री झोप केंव्हा लागली ते कळलं ही नाही..

पहाटेच अगदी ५-५.३० ला पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आलीं. जंगलातली रात्र जेवढी गूढ असते तेवढीच जंगलातली पहाट खरच खूप देखणी असते. ह्याचा अनुभव तर इथे प्रत्यक्षच जाऊन घ्यायला हवा..उठल्या उठल्या चहाची तल्लफ आली..बाहेर शेकोटी धगधगत होतीच..एक लहानसा टोप घेऊन सोबतच्या साहित्याने जमेल तसा चहा केला..बाकी सर्व आन्हिकं जमेल तशी जंगलात उरकून घेतली..आणि एक सर्वांगसुंदर अनुभव घेऊन आम्ही आमचे तंबू घडी करून पुढच्या मुक्कामाला निघालो..

कुडाळ शहरात आम्ही श्री. रासम यांच्या घरी जाऊन ब्रश, अंघोळ करून आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो..

आमचे पुढचे यजमान होते सावंतवाडीचे एक हरहुन्नरी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व श्री. नकुल पार्सेकर..त्याचा वृत्तांत पुढील भागात.

— नितीन साळुंखे
9321811091
astroganesh.in
salunkesnitin@gmail.com

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

UN-General-Assembly-300

संयुक्त राष्ट्राची आमसभा

संयुक्त राष्ट्रांच्या घटक सभासदांचे प्रतिनिधी वर्षातून एकदा एकत्र येतात.

जगातील गरिब, ...

kalsubai

कळसूबाई शिखर

राज्यातील सर्वोच्च शिखर म्हणून कळसूबाई शिखराची नोंद घेतली जाते.

सह्याद्री पर्वतावरील ...

Amboli-Hill-Station

अंबोली हिल स्टेशन

सावंतवाडीपासून ३५ किमी अंतरावर असलेले अंबोली हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून २२५० ...
sugar

साखर उद्योग

महाराष्ट्रात साखर उद्योग अतिशय झपाट्याने वाढतो आहे.

सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांची ...

Loading…

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश यांच्याविषयी... 158 लेख
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*