नवीन लेखन...

मला भेटलेली माणसं – दिल्लीचा सचिन

बरोबर एक वर्षापूर्वी मी माझ्या कुटुंबासहीत दिल्ली-हरीद्वार-ऋषिकेशची अक छोटीशी सफर केली होती. ट्रेनमधून जाताना दिसलेल्या जाहिरातीं व त्यातून मला उमगलेल्या तिथल्या लोकांच्या मानसिकतेवर मी एक लहानसं भाष्यही केलं होतं..ते काहीसं नकारात्मक होतं, पण चाच प्रवासात एक सकारात्मक गोष्टही घडली होती आणि मी ती साफ विसरूनही गेलो होतो. चांगल्या गोष्टी माणसं लगेच विसरतात आणि वाईट मात्र लक्षात ठेवतात या सर्वसामान्य मनुष्यस्वभावाला अनुसरून मी वागलो..ती चांगली गोष्ट सांगणं माझं कर्तव्य आहे..

झालं असं की, आम्ही आमची सहल आटोपून ‘राजधानी एक्सप्रेस’ने मुंबईला यायला निघालो. गाडी सायंकाळची, त्यातही उत्तरेतले डिसेंबरचे दिवस त्यामुळे बाहेर जरा लवकरच अंधारून आलं होतं. त्यात जाताना पाहिलेल्या बाहेरच्या ‘जाहिरातीं’चा अनुभव असल्यामुळे बाहेर काही पाहण्यासारख नाही हे समजलं होतं. राजधानी एक्सप्रेसचं एक बरं असतं, खाण्या-पिण्याचा एवढा मारा होतो की खाण्याव्यतिरीक्त इतर कशाला तोंड उघडण्याची संधीच मिळत नाही. माझ्यासारख्या अनोळखी लोकांशी बोलण्यास आवडणाराची मग पंचाईत होते. रात्री ८-८.३० ला जेवण झालं आणि मी दोन डब्यांमधल्या मोकळ्या जागेत म्हणजे बेसीनपाशी जाऊन उभा राहीलो. माझ्या अगोदर तिकडे आणखीही दोघं-तिघं उभे होते. सर्वांचा हेतू काॅमन, म्हणजे सिगरेट ओढायला काही संधी मिळते का हे पाहाणे हा होता.

इथेच त्याची न् माझी पहिली ओळख झाली. त्याची म्हणजे सचिनची..! वय असावं २५-३० चं पण बोलका. आडनांव माहीत नाही. त्यानंही सांगीतलं नाही. असंही उत्तरेत कुमार, सिंग यांच्या मांदियाळीत आडनांवाला फारसं महत्व नसतंच..

सचिन चांदणी चौकातला एक स्त्रीयांचे तयार कपडे, ड्रेस मटेरीयल, इमिटेशन ज्वेलरी, फॅशनेबल चपला विकणारा एक लहानसा व्यापारी. चांदणी चौकात त्याचं लहानसं दुकान होतं.. मी कुठे कुठे फिरलो, काय काय पाहिल याची त्याने चवकशी केली. त्यावर मी काय चुकवलं हे ही त्याने आवर्जून सांगीतलं. मी सर्व दिल्ली पाहिली पण लाल किल्ल्याच्या दारात समोरच असलेला सुप्रसिद्ध ‘चांदणी चौका’तला बाजार काही आम्ही पाहिला नाही हे ऐकून तो चुकचुकला..”तो फिर साब आपने दिल्ली कहॉं देखी?” असा प्रश्न मला विचारून पुढच्या वेळेस याल तेंव्हा मला फोन करून या मग मी तुम्हाला अस्सल दिल्ली दाखवेन असं म्हणून सचिनने मला त्याचा नंबरही दिला व माझाही नंबर आवर्जून घेतला..

एव्हाना त्या चिंचोळ्या जागेत आमच्या गप्पा रंगल्या होत्या. राजधानीसारख्या उच्चभ्रू गाडीत खाण्यासाठीच उघडलेलं तोंड बोलण्यासाठीही उघडण्याची संधी क्वचितच मिळते, तशी ती मला मिळाली. मी कुठे राहातो, काय करतो, सोबत कोण कोण आलंय, दिल्लीवा पहिल्यांदाच की पूर्वीही आलात ही चवकशी करून झाली. मी ही त्याची चवकशी केली. तो मुळचा दिल्लीवाला नव्हे तर व्यापारानिनित्त दिल्लीवा आलेला. गांव दूर कुठेतरी उत्तराखंड की झारखंडकडचं.. आई-वंडील तिकडेच गांवी दोघं. ही दोघं भावंडं. हा आणि याची एक बहीण. बहीण लग्न करून सासरी मुंबईला राहाणारी. हा बहिणीला भेटायला मुंबईला चाललेला व म्हणून आमच्या गाडीला आलेला.

मग त्याने त्याच्या सीटजवळ नेलं. बॅग उघडून त्याच्याकडचे लेडीज ड्रेस मटेरीयल, कान-नाक-गळ्यातले शोभेचे दागीने दाखवायला सुरूवात केली. मला वाटलं की त्याच्यातला व्यापारी जागा झाला. त्याच्याकडच्या वस्तू होत्याही सुंदर. मी बायकोला बोलावलं व तिला सांगीतलं की बघं, तुला काय आवडलं तर घे..तेवढ्यात सचिनने मला थांबवलं. म्हणाला, “गनेशजी, यह बेचने के लिए नही. मै मेरे बहन के पास जा रहा हू, यह सब उसके लिए है”. बहिणीसाठी प्रेमाने घेतलेल्या गोष्टीचा काही थोडक्या रुपयांसाठी सौदा न करण्याचा त्या ‘व्यापाऱ्या’चा ‘अ-व्यापारी’ स्वभाव माझ्या मनाला स्पर्शून गेला. “अगली बार दिल्ली आओगे तो मेरे पास आना, आप जो चाहेंगे वह चीज मै आपको दुंगा..एकदम सस्ती..” असं म्हणून तो विषय बंद केला..मग आम्हीही आमच्या बर्थवर जाऊन झोपलो..!!

माझ्या दृष्टीने हा विषय इथे संपला होता. सकाळी गाडी बोरिवलीला पोहोचली आणि माझ्या डोक्यातून तो विषय निघून गेला. दुसऱ्या दिवश्पासून नेहेमीच्या रुटीनला लागलो.

काल एक जानेवारीलाच सचिनचा फोन आला. नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला आणि आज बरोबर आपल्या भेटीला एक वर्ष झालं हे सांगायला. मी इथे हललो. आपणंही प्रवास करताना अनेक सहप्रवासी भेटत असतात. आपण त्यांच्याशी आणि ते आपल्याशी बोलतात, एकमेकांचे पत्तेही दिले-घेतले जातात पण प्रवास संपला की आपण आणि ते ही विसरून जातात. आपलं फोन बुक चेक केल तर अनेक नंबर का आणि कशासाठी घेतले हे ही नंतर आठवत नाही. आपली ही अशीच परिस्थिती असेल..

माझ्या कथेत तसं झालं नाही. सचिनने बरोबर एक वर्षाने आम्ही भेटलेल्या दिवशी आणि भेटलेल्या वेळीच मला फोन केला आणि भेटीची आठवण करून दिली. तसा तो व्यापारी असल्याने सारखा प्रवास करणारा. हजारो लोक त्याला भेटत असणार, त्यांचे नाव-नंबरही तो घेत असणार पण बरोबर लक्षात ठेवून त्याच दिवशी, त्याच वेळी त्याने मला फोन करणं माझ्या मनाला स्पर्शून गेलं. “आपके बीबी के लिये ड्रेस लेने है तो आप दिल्ली कब आ रहे हो?” त्याने मला प्रश्न विचारला. पुढे म्हणाला. “ इस बार सात-आठ दिन लेकर आईये, मेरे घर पे रहिये और मै मेरे खर्चेसे आपको पुरी दिल्ली घुमाऊंगा..” कोण बोलतो हो कोणासाठी येवढं? ते ही ट्रेन मधल्या कही वेळेच्या भेटीच्या जीवावर?

सचिनचा हा आपलेपणा माझ्या मनाला स्पर्शून गेला. मी तर त्याचा नाव-नंबरही सेव्ह केला नव्हता परंतु त्याने आठवणीने माझं नाव आणि नंबर सेव्ह केला होता. नुसता सेव्ह केला नाही तर त्याने मला फोनही केला..असं काय मोठ मी त्याच्यासाठी केलं होतं? नुसतं आपुलकीन बोललो होतो एवढच, ते ही ट्रेन मधला वेळ जावा म्हणून..पण काल सचिनच्या आलेल्या फोन मुळे मी पुढील आयुष्यभर त्याचा झालो..शेवटी पैसा –संपत्ती पेक्षा प्रेम आणि आपुलकीच आपली सोबत करते पुन्हा सिद्ध झालं..

— नितीन साळुंखे
9321811091
astroganesh.in
salunkesnitin@gmail.com

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..