चिरतरुण, चतुरस्त्र पार्श्वगायिका आशा भोसले

आजही एखाद्या विशीतल्या तरुणाला मागे पाडेल, एवढी प्रचंड ऊर्जा, लगबग त्यांच्यात आहे.त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. ८५ व्या वर्षीही त्यांच्यात गाण्याची, स्वर उंचावण्याची क्षमता एवढी आहे की, ऐकणारे थक्कच होतील. ‘ऐंशी वर्षांची म्हातारी बुढी अन् वय काय सांगते सोळा? आंधळा मारतो डोळा…’ या दादा कोंडकेंच्या गाण्यातील मर्म आशाताईंनी कर्तृत्वाने सार्थ करून दाखवले आहे. आशाताई अघोषित भारतरत्न’च आहेत, हे कोणताही संगीतरसिक नाकारणार नाही. लतादीदींसोबत कुण्याही गायिकेची तुलना होऊच शकत नाही, हे एकवेळ मान्य केले तरी,लतादीदींच्या तुलनेत आशा भोसलेंचे गानकर्तृत्व कुठेही मागे नाही. उलट आशा भोसले यांच्या सुरांना जी ‘शार्प धार’ आहे, जे माधुर्य आहे, शब्दफेकीची अनोखी नजाकत आहे, ते अन्य कोणत्याही गायिकेकडे नाही. गाण्यांची जेवढी व्हेरायटी; मग ते शास्त्रीय गीत असो, गज़ल असो, मादकगीत असो, भक्तिगीत-भावगीत असो, पॉपगीत-कॅबरेगीत असो,लावणी-ठुमरी असो वा कव्वाली असो; सादरीकरणाची खास शैलीतील विलक्षण हातोटी आशा भोसलेंनी जोपासली आहे, जी अन्य कुठल्याही गायिकेच्या वाट्याला आली नाही, याची पावती तर दस्तुरखुद्द लतादीदीही देतात! स्वतंत्र छाप आशाताईंनी संगीतविश्वााच्या सुरील्या दुनियेत उमटवली, तेही लतादीदींसह शमशाद बेगम, गीता दत्त, नूरजहॉं, सुरैया यांसारख्या पट्टीच्या गायिका फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असताना! सर्वांत मोठी गोष्ट अशी की, आशा भोसले यांना वैवाहिक जीवनात, चित्रपटसृष्टीत जो संघर्ष करावा लागला, तेवढा अन्य कुठल्याही गायिकेला नाही! तब्बल सहा दशके रसिकमनावर गारूड घालणार्याग व आज वय वर्षे ८४ असतानाही तोच मधुर स्वर आशाताईंकडे आजही कायम आहे. मात्र, ‘मेलोडी क्वीन’ आशाताई यांचा सहा दशकांचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण, खडतर असाच राहिलेला आहे. प्रारंभी अतिशय वाईट दिवस त्यांनी आयुष्यात अनुभवलेले आहेत. वयाने जवळपास दुप्पट असलेल्या ज्या व्यक्तीवर नितांत प्रेम केले व लतादीदींसह घरातील सर्वांचाच कडाडून विरोध असताना त्यांचा रोष पत्करून आयुष्याचा जोडीदार म्हणून घरातून पळून जाऊन ज्याची मोठ्या विश्वा साने निवड केली, त्याच्याचकडून म्हणजे गणपतराव भोसले यांच्याकडून विश्वायसाला तडा गेल्यानंतर जिव्हाळ्याचे सर्वच लोक गमावल्याचे जे दिवस आशाताईंनी अनुभवले व त्यानंतरही त्या न डगमगता कुणाच्याही सहकार्याविना केवळ आपल्या गानकौशल्याच्या बळावर ज्या धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या आणि प्रचंड यशस्वी झाल्या, त्याला खरोखरच तोड नाही!

‘संघर्षाचं प्रतीक’ म्हणूनही आशाताईंकडे पाहिल्यास ते वावगं ठरणार नाही. कारण ती वस्तुस्थिती आहे. त्यांच्या जागी अन्य दुसरी कुठलीही महिला राहिली असती, तर कदाचित कधीच आत्महत्या करून मोकळी झाली असती. कारण, पदरात दोन मुले टाकून व गर्भात एक बाळ सोडून गणपतराव भोसले व त्यांचे बंधू आशाताईंच्या जिवावर उठले होते.अतिशय घाणेरडी वागणूक मिळाल्याने आशाताईंनी ६० साली गणपतराव भोसले यांच्याशी घटस्फोट घेतला होता, हा सत्य परंतु कटु असा खाजगी इतिहास आहे. आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याच स्वीय सचिवासोबत लग्न केले म्हणून संपूर्ण मंगेशकर कुटुंबाच्या कर्त्या करवित्या लतादीदी यांचीही साथ-जिव्हाळा त्या गमावून बसल्या होत्या. गणपतराव हे लतादीदींचे स्वीय सचिव होते. लग्नाच्या वेळी आशाताईंचं वय १६ तर गणपतराव ३१ वर्षांचे होते. अशा कठीण दिवसांत आशाताईंनी कारकीर्द घडवायला प्रारंभ केला तेव्हा त्यांना अनेक खडतर, कटु अनुभवांचा सामना करावा लागला. कुणी गाणे गाण्याची संधी देत नसत, अन्य गायिकेने नकार दिलेली गाणी त्यांच्या वाट्याला येत असत, अल्प मानधनावर त्यांना टुकार गाणी गावी लागत असत. बी ग्रेड, सी ग्रेड नायिकांवर चित्रित असलेली गाणी त्यांना गावी लागत असत. हे सर्व आशाताईंच्या वाटेला प्रारंभी येत गेलं व आशाताईंनीही नशिबाचे भोग समजून ते स्वीकारलं. स्वीकारण त्यांना भागच होतं, परिस्थितीच तशी होती! मात्र त्यांनी, मिळालेल्या या प्रत्येक संधीचं सोन्यात रूपांतर केलं, असं की ‘देखनेवाले देखतेईच रह्य गये!’ प्रत्येक गाणं तन-मन ओतून असं काही तडाखेबाज गायलं की बस्सं़! आशाताईंच्या वाईट दिवसांमध्ये गुरुदत्त यांची पत्नी गीता दत्त, शमशाद बेगम, लता मंगेशकर या फिल्म इंडस्ट्रीतील टॉपच्या गायिका होत्या. पुढे पंचमदांची साथ मिळाल्यानंतर आशाताईंनी एकापेक्षा एक अशा गाण्यांची ज्या गोडव्याने बरसात केली, त्याने ‘चिंब’ झालेले रसिकमन कधीच ‘कोरडे’ होत नाही. लावणी, भावगीतं-भक्तिगीतं, गज़ल, पॉप, उडत्या चालीतली गाणी, लोकगीतं, कव्वाली, रवींद्र संगीत आदी सर्वांमध्ये आशाताईंनी अमिट मुद्रा उमटवली.
१९४३ साली ‘माझा बाळ’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चला चला नव बाळा…’या गाण्याने आशाताईंनी चित्रपट गायनाला प्रारंभ केला होता. ४८ साली हंसराज बहल यांच्या ‘चुनरियॉं’ या चित्रपटात ‘सावन आया…’हे गीत गाऊन आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.५३ साली बिमल रॉय यांनी ‘परिणीता’साठी आशाताईंना संधी दिली, ५४ साली राज कपूर यांनी ‘बूट पॉलिश’मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है…’ गायला दिलं. पुढे ओ. पी. नय्यर यांनी ५६ साली ‘सीआयडी’साठी संधी देऊन आशादीदींच्या पदरात मोठं यश दिलं.

५७ साली ‘नया दौर’मध्ये ओपींच्या उडत्या चालीवर रफीसाहाबसोबतचं ‘मॉंग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, हेमंतकुमार यांच्या संगीतातलं ‘जागृती’मधलं ‘दे दी हमे आझादी बिना खड्‌ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’, सी. रामचंद्र यांचा संगीतसाज आणि भरत व्यास यांनी रचलेलं ‘नवरंग’मधलं ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘तू छुपी है कहॉंऽ मै तडपता यहॉं’, जयदेव यांचं संगीत असलेलं देव आनंद-साधनावरचं ‘हम दोनो’मधलं रोमॅण्टिक ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’, ‘काला पानी’तलं देव आनंदला विनंती करणारं मधुबालाचं ‘अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना’,मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘मेरा साया’तलं ‘झुमका गिरा रे’, ओपी-कमर जलालाबादींचं ५८ सालच्या ‘फागून’मधलं ‘एक परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मिठा मिठा गम दे गया’, ‘तिसरी कसम’चं लोकगीतं ‘पान खाये सैया हमारो, सावली सुरतीयॉं होठ लाल लाल’, ‘किस्मत’मधलं शमशाद बेगमसोबतचं ‘कजरा मोहोब्बतवाला अखियों मे ऐसा डाला’, ‘पेईंग गेस्ट’मधलं चुलबुल्या नूतनला देव आनंद छेडतो तेव्हाचं ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘वक्त’मधलं ‘आगे भीऽ जाने ना तूऽ,पिछे भी जाने ना तू, जो भी है, बस यही एक पल है’, कोंबडी पकडणार्याव ‘बांगडू’ किशोरदांसोबतचं ‘हाल कैसा है जनाब का’, ‘हावडा ब्रिज’मधलं ‘आईयेऽ मेहरबॉं’, झीनतवरचं ‘हरे रामा’तलं ‘दम मारो दम’, ओपींचं ‘चॉंद उस्मानी-किशोरदां यांच्यावरचं ‘बाप रे बाप’मधलं ‘पिया पिया पिया मोरा जिया पुकारे, हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे’, शहरयार यांनी रचलेलं खय्याम यांनी संगीत दिलेलं ‘उमराव जान’मधलं ‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारों है’, ‘ये क्या जगहा है दोस्तो, ये कौनसा दयार है’, ‘तुमसा नही देखा’तलं ‘सर पे टोपी लाल, हाथ मे रेशम का रूमाल, हो तेरा क्या कहना’, ‘एक मुसाफिर एक हसीना’तलं ‘बहुत शुक्रिया बडी मेहरबानी’, नासिर हुसेन यांच्या ‘तिसरी मंझील’मधलं अतिशय गोड ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दुंगी जान जुदा मत होना रे’, ‘ओ हसीना जुल्फोवाली जानेजहॉं’, ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’, ‘आदमी और इन्सान’मधलं ‘जिंदगी इत्तफाक है’, ‘अनहोनी’मधलं ‘मैने होठो से लगाई तोऽऽ हंगामा हो गया’, ‘बांगडू’सोबतचं ‘आशा’मधलं ‘इना मिना डिका’, ‘काश्मीर की कली’तलं ‘इशारों इशारों मे दिल लेनेवाले’, गुलजार यांचं ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है’, हेलनच्या बहारदार नृत्यावरचं ‘कारवॉं’तलं ‘पिया तू अब तो आजा’, ‘मेरे सनम’चं ‘जाईये आप कहॉं जायेंगे, ये नजर लौटके फिर आयेंगी’, ‘ज्वेल थिफ’चं ‘रात अकेली है, बुझ गए दिये’, ‘शिकार’चं ‘पर्दे मे रहनें दो पर्दा ना उठाओ’, ‘द ग्रेट गॅम्बलर’मधलं अमिताभ-झीनतवरचं फॉरेनमध्ये होडीतलं रोमॅण्टिक ‘दो लफ्जों की हैऽऽ दिल की कहानी’,‘पुकार’मधलं ‘बचके रहना रे बाबाऽऽ बच के रहना रे’, परवीनबॉबीचं नृत्य असलेलं ‘जवानी जानेमन हसीन दिलरूबा’,‘हम किसी से कम नही’तलं ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना’, ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’, ‘मुकद्दर का सिकंदर’चं ‘ओ साथी रे तेरे बिना क्या जिना’, ‘लगान’चं ‘राधा कैसे ना जले’ अशी खूप मोठी गाणी आशाताईंची आहेत. मराठीत गदिमा-यशवंत देवांचं ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’, ‘सिंहासन’मधलं सुरेश भटांचं ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’, बहिणाबाईंचं ‘अरे खोप्यामंधी खोपा सुगडिणीचा चांगला’, खेबुडकरांचं ‘सतीचं वाण’ मधलं किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’, ‘फटाकडी’तलं नांदगांवकरांचं ‘लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा नि काश्मीरला, कुठं कुठं जायाचं हनीमूनला’, हेमंतकुमार यांच्यासोबत गायलेलं सुधीर मोघेंचं ‘हा खेळ सावल्यांचा’मधलं ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, पी. सावळाराम यांचं ‘भालू’मधलं ‘गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन’, सुधीर फडके उपाख्य बाबुजींसोबत गायलेलं खेबुडकरांचं ‘पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला’, भटांचं ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’, शांता शेळके यांनी रचलेलं ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’,भा. रा. तांबेंचं वसंत प्रभूंच्या संगीतसाजातलं बाबुजींसोबत गायलेलं ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’, ‘शापित’ मधलं सुधीर मोघेंचं गीत आणि बाब ‘राष्ट्रीय पुरस्कार’, असंख्य ‘फिल्मफेअर पुरस्कार’, मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’, ‘महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार’ आणि नुकताच २००८ मध्ये मिळालेला ‘पद्मविभूषण पुरस्कार’ – हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले आहेत.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने ‘जीवनगौरव पुरस्कार’ही त्यांना देण्यात आला. आशाताईनी आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांना आवाज दिला आहे. त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत. आपल्या समूहातर्फे मा.आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

आशा भोसले यांची गाणी.आशा भोसले यांची मराठी गाणी.महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
572-sevagram-bapu-kuti

बापू कुटीचे सेवाग्राम

वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले सेवाग्राम हे वर्धा ...
p-539-harihareshwar-kalbhairav-temple-shiva-temple

श्री श्रीहरिहरेश्वर

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील श्रीहरिहरेश्वर हे पुरातन धार्मिक स्थळ ...
bhau-daji-lad-sangrahalay

भाऊ दाजी लाड संग्रहालय

मुंबई शहरात इ.स १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय ...

Loading…

संजीव वेलणकर
संजीव वेलणकर यांच्याविषयी... 1299 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
संपर्कः फेसबुक

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*