‘आरंभ’ एका यशोगाथेचा !

१४ ऑक्टोबर, २०१४ चा हा माझा लेख. ‘आरंभ’ च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा पोस्ट करतो आहे.

फेसबुकच्या कृपेने औरंगाबादमधील एका संस्थेचा त्रोटक परिचय झाल्यापासून ती संस्था सतत मला खुणावत होती. तिच्या विविध उपक्रमांची माहिती वाचत असतांना ‘ऑटिस्टिक’ या शब्दाचा आयुष्यात प्रथमच परिचय झाला. दुर्बलमनस्क, मतिमंद हे शब्द अगदी शाळकरी वयापासून कानावर पडले होते. ज्यांच्या घरात अशी मुलं जन्माला आली आहेत अशा काही परिचितांचं व काही मोजक्या मित्राचं आयुष्य व त्यांच्या घरातलं वातावरण खूप जवळून मला अनुभवायला मिळालं होतं. त्यांना भेटायला गेलो की एक प्रचंड खिन्नता व उदासीनता मला घेरून टाकायची व त्यानंतर अनेक दिवस मी अस्वस्थ असायचो. अशाच प्रकारच्या अस्वस्थतेतून एक दिवस मी औरंगाबादच्या ‘आरंभ’ या संस्थेच्या आवारात प्रवेश केला. त्या संस्थेतर्फे स्वमग्न मुला-मुलींसाठी जी शाळा चालवली जाते त्या शाळेच्या परिसरातील भयाण शांतता बघून मी बिचकलो. जिथे मुला-मुलींचे आवाज नाहीत तिला शाळा कसं म्हणायचं? संस्थेचे संस्थापक श्री. बाळासाहेब टाकळकर व सौ. अंबिका टाकळकर त्या शाळेच्या वातावरणाइतक्याच गांभीर्याने माझं स्वागत करतील अशी अपेक्षा बाळगत असतानाच त्यांनी माझं सुहास्य वदनाने व अत्यंत उत्साहाने स्वागत केल्यामुळे मी बऱ्यापैकी अवघडलो. एका वेगळ्या अर्थाने अ-सामान्य असलेल्या मुलांना सामान्य बनविण्याचं अत्यंत अवघड काम करत असताना यांना शारीरिक व मानसिक थकवा येत नसेल का? आणि येत असेल तर या दोघांमध्ये हा उत्साह कुठून आला? कोण देत असेल यांना प्रेरणा? माझ्या मनात प्रश्नांचं मोहोळ उठलं. चहा-पाण्याच्या औपचारिकतेनंतर आमच्या चर्चेला प्रारंभ झाला आणि दुर्बलमनस्क, स्वमग्न, ऑटीस्टिक, सेरेब्रल पाल्सी, एपिलेप्सी यासारख्या शब्दांचे अर्थ माझ्यासमोर हळूहळू उलगडू लागले. संस्थेच्या ऑफिसमध्ये बसून चर्चा करण्यापेक्षा त्या आगळ्यावेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाबद्दल जाणून घेण्याची मला उत्सुकता होती.

ज्याला शाळेचं आंगण म्हणता येईल अशा जागेत जेव्हा मला नेण्यात आलं तेव्हा त्या शाळेतील आश्चर्यकारक शांततेचं रहस्य अचानक उलगडलं. एका सतरंजीवर काही विद्यार्थी बसले होते आणि त्यांना दिलेल्या कामात ते पूर्णपणे गढून गेले होते. प्रशिक्षकाच्या सहाय्याने विविध आकाराच्या अत्यंत सुबक पणत्यांना रंग देण्याचं व त्यांना सजवण्याचं काम अत्यंत शिस्तबद्धपणे सुरु होतं. एकाग्रता तर येवढी की एकलव्यानेही लाजून मान खाली घालावी! दिवाळीत त्या विलक्षण आकर्षक पणत्या ज्यांच्या घरात जातील केवळ त्यांचीच घरं यंदाच्या दिवाळीत उजळून निघणार नव्हती तर त्या सुंदर पणत्या त्या मुलांचं भवितव्यही प्रकाशमान करणार होत्या !

एका क्लासरूमचा बऱ्याच वेळापासून बंद असलेला दरवाजा उघडण्यात आला आणि त्या शाळेतील मुला-मुलींचा गलका प्रथमच माझ्या कानावर पडला. त्यांच्याकडे बघून माझ्या बालपणाच्या आठवणी जागृत झाल्या. वयाच्या सहाव्या वर्षी मी ज्या प्रायमरी शाळेत शिकत होतो तिच्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर ‘दुर्बलमनस्क मुलांची शाळा’ असं नाव असलेली एक शाळा होती. मी व माझ्या वर्गामित्रांपेक्षा त्या शाळेतील मुलांमध्ये काहीतरी वेगळेपणा होता हे नक्की, पण त्याचं आकलन होण्याचं माझं वय नव्हतं. आज अनेक वर्षांनंतर तशा प्रकारच्या मुलांची ओळख करून घेण्यासाठी मी आलो होतो. ‘हा वेद सावजी.’ शाळेच्या संचालकांनी मला एका मुलाची ओळख करून दिली. तो केवळ स्वमग्नच नव्हे तर पूर्णतः दृष्टिहीन होता. या मुलाचं काय भवितव्य? मी विचारात पडलो असतानाच त्याने तोंड उघडलं आणि गीतेचे श्लोक अस्खलितपणे त्याच्या तोंडातून बाहेर पडू लागले. मी थक्क होऊन त्याच्याकडे बघू लागलो आणि संचालकांना विचारलं ‘हा मुलगा स्वमग्न आहे यावर कोणाचा विश्वास बसेल?’ हा स्वमग्नच आहे, पण केवळ एक वर्षात त्याची येवढी प्रगती झाली आहे. ज्या एका पराकोटीच्या अस्वस्थतेपोटी मी या शाळेतील मुलांना भेटायला आलो होतो त्या अस्वस्थतेची जागा आता आशेच्या किरणांनी घेतली !

नऊ महिने रात्रंदिवस एका गोंडस बाळाची स्वप्नं बघितल्यानंतर विलक्षण आनंदाच्या एका क्षणी त्याचा या जगात प्रवेश झाल्यावर तो स्वमग्न म्हणून जन्माला आला आहे हे कळल्यानंतर त्या आईचं काय होत असेल हे स्त्रीचा जन्म घेतल्याशिवाय या जगात कोणालाही कळणं शक्य नाही. ते बाळ सामान्य नाही हे मान्य करायला असामान्य धैर्य लागतं. ते धैर्य गोळा करून स्वमग्नपणाबद्दल वस्तुस्थिती जाणून घेतली तर ज्यांच्या घरात असं बाळ जन्माला येतं ते खचून जात नाहीत व योग्य वेळी योग्य कृती करून ‘आरंभ’सारख्या संस्थांची मदत घेतात. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय केवळ देणगीदारांच्या आधारावर वाटचाल करण्याचं धाडस करणाऱ्या ‘आरंभ’ला यंदाच्या दिवाळीत सर्वतोपरी मदत करून या अ-सामान्य मुला-मुलींचं आयुष्य आपण सर्वार्थाने प्रकाशमय करू या !

मदत करण्यासाठी संपर्क : श्री. बाळासाहेब टाकळकर : 95611 12758
सौ. अंबिका टाकळकर : 82752 84178 / 82752 84177
ई.मेल. : ambikanidhu@gmail.com

— श्रीकांत पोहनकर श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 लेख
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…